जुने ते सोने, पण तरीही नवे ते हवे!

डॉ. अनिल लचके
गुरुवार, 15 मार्च 2018

विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील.

ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात लेसर, ट्रान्झिस्टर, संगणक, इंटरनेट, जीपीएस, उपग्रह, एमआरआय असे विषय होते. श्रोत्यांच्या शंकांचं समाधान करावं, अशीही संयोजकांची अपेक्षा होती. व्याख्यान झाल्यावर प्रश्न विचारले गेले. एका शिक्षकांनी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला- ‘विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये सर्वसामान्य माणसासाठी येत्या पाच वर्षांत काय घडेल?’ मला अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा विचार आठवला- ‘मी भविष्याचा विचार करत नाही. कारण ते अपेक्षेपेक्षा खूप लवकर तुमच्या समोर येतं!’ येथे मात्र भावी काळाबद्दल सांगणं क्रमप्राप्त होतं. या संदर्भात मी मिशिओ काकु आणि इतरांचेही विचार वाचले होते. त्या आधाराने मी प्रश्नाचं उत्तर दिलं.  

सध्या लॅपटॉप, आय-पॅड, संगणक किंवा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या उपकरणांमध्ये सामायिक म्हणजे त्याचा ‘डिस्प्ले’(पडदा). यावरील चित्र दिसण्यासाठी ‘लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले’ वापरला जातोय, तो २०२० पर्यंत दिसेलच. तथापि, मोठ्या प्रमाणात लोक कागदासारखा पातळ, गुंडाळी करता येईल असा पारदर्शी, हलका ‘डिस्प्ले’ वापरतील. त्याच्या पृष्ठभागावर की-बोर्डची आकृती असेल. लोक त्यांचा स्मार्टफोन केवळ ‘स्टिकर’च्या स्वरूपात वापरतील. तो मनगटावर चिकटवला जाईल. साहजिकच तो सतत त्यांच्याबरोबर राहील. हरवण्याची शक्‍यता नाही! नव्याची नवलाई नऊ दिवस असते. यामुळेच तर तरुणांसाठी सतत नवनवीन उपकरणे तयार होतील.

चालकाविना वाहन याची आपण कल्पना करू शकत नाही. पण ‘गुगल’नं असं वाहन तयार केलंय. ड्रायव्हर नसलेली खासगी मोटार-कार, टॅक्‍सी, बस आणि सायकलही रहदारीचे नियम पाळून रस्त्यावर धावतील. अशी वाहनं स्वतःहून योग्य जागी पार्क होतील. त्यांच्या अनेक चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. उदाहरणार्थ, एका चालकविना मोटारीने सॅन फ्रॅन्सिस्को ते न्यूयॉर्क हा ५४५० कि.मी.चा प्रवास नऊ दिवसांत निर्विघ्नपणे पार पाडला. तरीही अनपेक्षितपणे एक अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे ‘चक्रधर’ नसलेल्या वाहनात बसण्याचं धैर्य असणारे प्रवासी फार कमी आहेत. अनुभवी ड्रायव्हर असूनही जिथं अपघात होतात, तिथं विनाचालक बससाठी प्रवासी मिळणं कठीणच! अशा एक कोटी मोटारी २०२०पर्यंत रस्त्यावर अवतरतील.     
येत्या दहा वर्षांत रस्त्यावरून धावणाऱ्या ३० ते ४० टक्के मोटारी पेट्रोलऐवजी विजेवर धावतील. त्यासाठी लागणारी बॅटरी लवकर चार्ज (विद्युतभारित) होईल. ते वाहन एक हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा पल्ला पार करेल.

चंद्रावर पुन्हा माणूस केव्हा जाणार, असं लोक विचारतात. पण त्याऐवजी यंत्रमानवाकडून चंद्रावर तळ उभारला जाईल. त्यात जपान आघाडी घेऊ शकेल. स्पेस-एक्‍स कंपनीचे संचालक इलॉन मस्क अंतराळाकडे ‘बाजारपेठ’ म्हणून पाहत आहेत. वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यांमधील स्वप्ने सत्यसृष्टीत येतील असं त्यांना वाटतं. त्यांनी चंद्राकडे जाणारं अतिशक्तिशाली रॉकेट तयार केलंय. ‘टेक-ऑफ’ घेताना ते १८ जंबोजेट एवढी शक्ती वापरतं! त्याचं ‘बूस्टर रॉकेट’ अत्यंत महाग असल्याने पैसे वाचवण्यासाठी परत ते अलगद पृथ्वीवर उतरवलं जातं. (समुद्रात विसर्जित होणार नाही!) इलॉन मस्क यांचा उद्देश काय, तर ज्यांना परवडेल त्यांना चंद्र-मंगळावर पाठवणे; निदान अंतरिक्षात वजनविरहित अवस्थेचा अनुभव देणे असा आहे. रिक्षात बसणाऱ्या सर्वसामान्य माणसालाही अंत‘रिक्षा’त भ्रमण करावंसं वाटतं. त्यामुळे त्यांना बरेच प्रवासी मिळतील.  

‘गुगल’नं चष्म्याच्या काचेतच इंटरनेट आणि इलेक्‍ट्रॉनिक पडदा बसवलाय. त्यामुळे वेगळ्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनची गरज नाही. कधी तरी अचानक आपल्यासमोर एखादी व्यक्ती येते. तिचा चेहरा आपण ओळखतो, पण नाव आणि संदर्भ विसरतो. चष्म्यातील ‘पडद्या’त त्या व्यक्तीचं नाव आपोआप येईल. ओशाळून जायचं कारण नाही! चष्म्याची काडी म्हणजे ‘की-बोर्ड’. त्यावर बोट फिरवून चष्म्यातील संगणक चालवता येईल. भावीकाळात कृत्रिम, पण उच्च बुद्धिमत्तेचे यंत्रमानव आपली अनेक कामं न सांगता करतील.   

टीव्हीचा पडदा मोठा (अर्धगोल) होऊन अर्धी खोली व्यापेल. होलोग्राफीक प्रतिबिंबामुळे (चष्म्याविना) त्रिमितीचा आभास होईल. क्रिकेट सामना पाहताना खेळाडूंसमवेत आपण हिरवळीवर बसलोय असं वाटेल. चेंडू आपल्या दिशेनं फटकावला गेला, तर आपण दचकून जाऊ. हा सर्व आभास ‘व्हर्च्युअल रियालिटी’च्या उच्च तंत्रामुळे साध्य होईल. वैद्यकशास्त्रात बरीच क्रांती होणार आहे. मानवी शरीरासाठी उपयुक्त आणि अत्यंत दर्जेदार असे कृत्रिम अवयव घडवण्यात यश आलंय. अपंगांसाठी कार्यक्षम हाता-पायांचे कृत्रिम पंजे तयार झालेत. ते थेट मेंदूला इलेक्‍ट्रॉनिकली जोडले जातील. त्यासाठी शस्त्रक्रियेची गरज नाही. कृत्रिम स्वादुपिंड, यकृत, हृदयाच्या झडपा, नाक आणि कानाचा बाह्यभाग, मूत्रपिंड आणि मूत्राशय प्रयोगशाळेत तयार झालंय.

गुगलच्या संशोधकांनी ‘नॅनोपार्टिकल पिल’ तयार केली असून ती अब्जांश कणांनी घडलेली आहे. प्रत्येक कणाला चुंबकीयशक्ती असून प्रथिनवर्गीय ‘अँटीबॉडीज्‌’ जोडलेल्या आहेत. याला ‘बायोमार्कर’ म्हणतात. कण पोटात गेल्यावर ते प्राथमिक स्थितीतील कर्करोग किंवा हृदयरोगाची माहिती देऊ शकतात. परिणामी रोगनिदान सहजपणे लवकर होऊन लागलीच उपचार सुरू करता येतील. या ‘पिल’ची चाचणी चालू आहे. जंगलात वणवा पेटल्यावर वृक्ष झपाट्यानं जळून खाक होतात. अशी भयाण आग विझवण्याचे प्रयत्न फोल ठरतात. त्यासाठी ‘ड्रोन’ विमानांची योजना केली जाईल. झाडाच्या शेंड्याजवळ आग लागल्यास ‘ड्रोन’ तेथे पोचून विशिष्ट ध्वनीलहरी प्रक्षेपित करेल. मग तेथील हवेमधील प्राणवायू विरळ होऊन आग शमेल. खरं तर असे अनेक शोध लागत आहेत. कारण विज्ञान- तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. तो रेंगाळत जाणारा नाही. साहजिकच ज्येष्ठ नागरिक आता ‘जुने ते सोने’ असं म्हणण्याऐवजी तरुणांच्या आवाजात आवाज मिसळून म्हणतात-‘नवे ते हवे!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr anil lachke writes walk article in editorial page