भाष्य : आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाची दिशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

turkey earthquake

तुर्की व सीरियात सोमवारी भल्या पहाटे नागरिक निद्राधीन असताना ७.८ रिश्‍टर क्षमतेचा भूकंप आणि त्यानंतर दोनशे भूकंपोत्तर धक्के (आफ्टरशॉक) यामध्ये सदतीस हजारांवर नागरिक मृत्यूमुखी व हजारोंनी भूकंपग्रस्त झाले.

भाष्य : आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाची दिशा

- डॉ. अर्चना ठोंबरे

नैसर्गिक आपत्तीने माणूस आणि एकूण समाजव्यवस्था अंतर्बाह्य हादरलेली असते. वित्तीय, व्यवस्थात्मक पातळीवर गाडी रुळावर आणण्यापेक्षाही आपत्तीग्रस्तांचे मानसिक, सामाजिक आणि शारीरिक पुनर्वसनाचे आव्हान मोठे असते.

तुर्की व सीरियात सोमवारी भल्या पहाटे नागरिक निद्राधीन असताना ७.८ रिश्‍टर क्षमतेचा भूकंप आणि त्यानंतर दोनशे भूकंपोत्तर धक्के (आफ्टरशॉक) यामध्ये सदतीस हजारांवर नागरिक मृत्यूमुखी व हजारोंनी भूकंपग्रस्त झाले. भूकंपासारखे संकट आणि त्याचबरोबर गोठणबिंदूखाली असलेले तापमान, प्रचंड थंडी, पाऊस यामुळे तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. स्थानिक बचाव पथके आणि विविध देशातील मदतकार्य पथके भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचावाचे कार्य करीत आहेत. या भूकंपाबाबतच्या बातम्या, आपल्या भारतातील सप्टेंबर १९९३मधील लातूर भूकंप, जानेवारी २००१मधील कच्छ भूकंप, डिसेंबर २००४ मध्ये हिंद महासागरातील भूकंपामुळे आलेले त्सुनामीचे तांडव इत्यादींची आठवण ताजी झाली.

पृथ्वीच्या गर्भात नेहमी उलथापालथ होत असते. पृथ्वीच्या आतील स्तर (प्लेट्‌स) एकमेकांवर आदळतात व त्यामुळे भूकंप होतो. जगभरातील भूकंप मापन केंद्र दरवर्षी भूकंपाचे साधारणतः वीस हजार धक्के नोंदवितात. आपल्या देशात इंडियन टेक्‍टोनिक प्लेट व तिबेटन प्लेट एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे प्रचंड दाब निर्माण होऊन भूकंप होतात. भारतात चार वेगवेगळे झोन भूकंपाला कारणीभूत ठरत आहेत. झोन पाच सगळ्यात सक्रिय आहे. ज्यामध्ये मुख्यतः काश्‍मीर खोरे, उत्तराखंडचा पूर्व भाग, हिमाचल पश्‍चिमी भाग, गुजरातचा कच्छ, बिहारचा उत्तर भाग, ईशान्येतील सर्व राज्ये, अंदमान-निकोबार द्विपसमूह आहेत.

समस्यांची मालिका

भूकंपानंतर एक ते तीन दिवस हे भूकंपग्रस्तांना वाचविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. अशा स्थितीत मदत व बचाव कार्य अतिशय महत्त्वाचे असते. अशावेळी किंवा त्यानंतर जास्तीत जास्त जीवितहानी टाळण्यासाठी तेथील हवामान, वातावरण, त्यांना मिळणारे अन्नपाणी आणि ते कोठे व कशा प्रकारे अडकले आहेत यावरही अवलंबून असते. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व कार्यक्षम लोक एकत्र येऊन मदत व बचावकार्य करीत असतात.

यानंतर भूकंपग्रस्त नागरिकांत आपत्ती ही कोणत्या प्रकारची (नैसर्गिक, मानवनिर्मित), आपत्तीची तीव्रता (तुर्की व सीरियात पहिला भूकंप ७.८ आणि दोनशे भूकंपोत्तर धक्के (७.५) रिश्‍टर क्षमता अशी तीव्रता होती.), त्यामुळे बचावकार्यात अडथळा, नागरिकांमध्ये भय-भीती निर्माण होऊन प्रतिसाद अवलंबून असतो. याचबरोबर तेथील राजकीय नेतृत्व (गृहयुद्धाची काही वर्षांपासून झळ सोसत असलेला हा प्रदेश आहे.), निर्वासित छावण्या या कच्च्या घरांमध्ये आहेत. जिथे चाळीस हजारांवर नागरिक राहत होते.

मोलाचा मानसिक आधार

भूकंपग्रस्त नागरिक हे पूर्वपदावर किती लवकर येतात हे वरील गोष्टींवर जितके अवलंबून असते, तितकेच अशा आपत्तींचा सामना करण्याची तयारी, पूर्वानुभव हा पण महत्त्वाचा असतो. याचबरोबर त्यांचे वय, शिक्षण, शारीरिक, मानसिक आरोग्य, प्रतिकूल स्थितीचा सामना करण्याची क्षमता, त्यांना मिळणारा सामाजिक आधार, कोणत्या प्रमाणात व स्वरूपात त्यांचा तोटा झाला आहे. उदा. स्वतः आणि जवळच्यांना झालेल्या शारीरिक इजा, कुटुंबातील व नातेवाईकांची जीवितहानी, आर्थिक नुकसान इ. गोष्टींवर अवलंबून असते. अगदी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या वाट्याला आलेले परावलंबी जीवन हे पण मानसिकदृष्ट्या त्यांना खचवत असते. अशा नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही अगत्याचे असते. त्यांच्या धर्म, संस्कृतीनुसार हे कार्य पार पाडावे लागते.

मदत व बचाव कार्यामध्ये वैद्यकीय मदत ही महत्त्वाची बाब आहे. ती सातत्याने भूकंपग्रस्त नागरिक पूर्वपदावर येईपर्यंत लागत असते. याचबरोबर सुरक्षित पिण्याचे पाणी व अन्न हेही तितकेच महत्त्वाचे असते. सुरक्षित निवारा केंद्र, त्यामध्ये लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुले-मुली, स्त्रिया यांचे खासगीपण आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. निवारा केंद्रातील स्वच्छता (सॅनिटेशन व हायजिन व्यवस्था), तिथे संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून डास, माशा, उंदीर यांचा प्रतिबंध हेही तितकेच महत्त्वाचे असते.

भूकंपग्रस्त व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला आपले आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी पुनर्वसन- निवारा केंद्रातच, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण, मदत, मुलांसाठी शाळा, लसीकरण, गरजा पूर्ण करण्यासाठी जवळपास बाजारपेठ, वाहन व्यवस्था, चांगली संप्रेषण (कम्युनिकेशन) सुविधा, मनोरंजन सुविधा, सामाजिक, मानसिक, नैतिक मदत (कौन्सिलिंग) महत्त्वाचे असतात. निवारा केंद्रांमध्ये बाधितांना खूप महिने राहावे लागले तर अन्य अत्यावश्‍यक सुविधा देखील पुरवाव्या लागतात. वैद्यकीय सुविधा देत असतानाच महिला आणि मुलींकरता वैयक्तिक स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड, नॅपकिन्स यांचा पुरवठा करावा लागतो. तसेच या काळात महिलांची निर्धोकपणे प्रसूती होणे, त्याकरता त्यांना मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा द्याव्या लागतात. प्रसुती पश्‍चात वैद्यकीय मदत द्यावी लागते. प्रजनशील वयाच्या महिलांमध्ये गर्भनिरोधक पद्धती लक्षात घेऊन साधनेही पुरवावी लागतात.

मानकांमुळे परिणामकारक कार्य

स्पिअर प्रोजेक्‍ट-१९९७ मध्ये जगभरातील मुख्यत्वे मानवतावादी संघटना, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेट मुव्हमेंट यांनी किमान मानके (मिनिमम स्टॅंडर्ड) अशा चार जीवनावश्‍यक बाबी आपत्तीत विभागून ठरविल्या आहेत.

१) पाणीपुरवठा, स्वच्छता व स्वच्छतेबाबत जागरूकता. २) पोषण सुरक्षा व पौष्टिकता. ३) निवारा- वसाहत करणे व वस्त्र, झोपण्याची व्यवस्था व घरगुती सामान. ४) आरोग्याची व्यवस्था. उदा. माणशी प्रतिदिन ७.५-१५ लि. पाणी (प्रतिदिन २.५-३ लि. पिण्यासाठी, २.६ लि. स्वच्छतेसाठी, ३-६ लि. स्वयंपाकासाठी).

मदत व बचावकार्याच्या वेळेपासून ते जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत समाजविघातक गोष्टी आढळून येतात. या भूकंपातही सीरियातील तुरुंगात असलेले वीस कट्टर दहशतवादी पळून गेले आहेत. भूकंपामुळे भिंती व दरवाजे खराब झाले, याचा गैरफायदा घेतला गेला. तसेच व्यसनाधीनता, घरगुती हिंसाचार वाढणे, गरजेपोटी मुली व स्त्रियांचे शोषण, जीवनावश्‍यक वस्तूंचा काळाबाजार आणि त्या महाग मिळणे इ. म्हणूनच अशा संकटप्रसंगी चांगले होण्यासाठी आणि वाईटाचा प्रतिबंध होण्यासाठी संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेले वचन म्हणजे ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ किती योग्य आहे याची प्रचिती येते.

(लेखिका वैद्यकीय अधिकारी असून, आपत्कालिन व्यवस्थापन या विषयाच्या तज्ज्ञ आहेत.)