शस्त्रक्रियेविना कर्करोग निदान 

डॉ. अरविंद नातू 
Wednesday, 1 January 2020

विज्ञान-तंत्रज्ञानाची वेगाने होत असलेली प्रगती सतत अनुभवाला येत आहे; किंबहुना काळाच्या या टप्प्यावर हाच बदलांचा मुख्य शक्तिस्रोत ठरतो आहे. या क्षेत्रातील नवनव्या प्रवाहांची नोंद घेणारे हे दैनंदिन सदर.

विज्ञान संशोधनाची विलक्षण वेगाने चालू असलेली वाटचाल आपण अलीकडच्या काळात अनुभवत आहोत. आपले सगळे जीवनच त्याने जणू व्यापून टाकले आहे. इतके, की आपल्यासमोरची संकटे आणि आव्हाने यांना तोंड देताना आशेने नि अपेक्षेने आपण पाहतो, ते विज्ञानाकडे. कर्करोग (कॅन्सर) हे असे एक मोठे आव्हान माणसासमोर आहे आणि त्याच्या मुकाबल्यासाठी अथक संशोधन सुरू आहे. 
कर्करोगाच्या बाबतीत असे सांगितले जाते, की जेवढ्या लवकर निदान होईल, तेवढ्या लवकर रोग आटोक्‍यात आणता येईल. एखाद्या अवयवात झालेला कर्करोग दुसऱ्या अवयवात पसरला आहे का, याचे उत्तर देणे कठीण आहे. त्यामुळे सतत टांगती तलवार रुग्णाच्या डोक्‍यावर असते. त्यातून मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती खचण्याची शक्‍यता असते. त्यामुळेच निदानपद्धतीवरील संशोधनाला आत्यंतिक महत्त्व आहे. सध्या अस्तित्वात असलेली पद्धत म्हणजे कर्करोगग्रस्त झालेल्या भागाचा एक तुकडा कापून घ्यायचा आणि त्याची सूक्ष्मदर्शकातून तपासणी करायची. याला "बायोप्सी' असे म्हटले जाते. ती काहीशी वेदनादायी असते आणि त्यातूनही काही वेळा अचूक निदान करणे कठीण जाते. या पार्श्‍वभूमीवर जर ही दोन्ही कामे एकाच वेळी काही तासांतच करता आली तर? नव्या संशोधनामुळे ते उद्दिष्ट आवाक्‍यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून केवळ रक्‍त तपासणी (5 मिलि.) करून त्यायोगे रोगनिदानाचा सोपा मार्ग उपलब्ध झालेला आहे. या पद्धतीत अनेक जैविक खुणांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ- पसरणाऱ्या कर्करोग पेशी (सर्क्‍युलेटिक ट्यूमर सेल-सीटीसी), पसरणारा ट्यूमर डीएनए, प्लाझ्मामध्ये पसरणारे डीएनएचे तुकडे इत्यादी. 
रक्तातील निदानाच्या या पद्धतीत प्रथम एका अभिनव अशा सूक्ष्म चुंबकीय पदार्थाने "सीटीसी' शोधून गोळा केले जातात. त्यात नंतर "सायटोकेरॅटिन' या प्रथिनाचे प्रमाण निश्‍चित केले जाते. घटकांचे विश्‍लेषण करून त्यावरून निदान केले जाते आणि तेही शस्त्रक्रियेविना. याचे व्यावहारिक उपयोगही बरेच आहेत. एकतर तपासणी आणि निदान जलद होते. कर्करोग पुन्हा होणार की नाही, याविषयीची माहितीही या निदानपद्धतीतून कळते. वेळोवेळी फकत रक्‍ताचे नमुनेच घ्यायचे असत्याने ही पद्धती सुलभ मानली जाते. 
सध्या अस्तित्वात असलेल्या निदान पद्धतीतील आणखी एक त्रुटी म्हणजे हे निदान ज्या शरीराच्या भागातून ऊती काढली असेल तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. त्यामुळे टांगती तलवार कायमच राहाते. कर्करोग पसरतो त्याला "मेटॉसॅरिस' अगर रोगसंक्रमण म्हणतात. कर्करोगाच्या पेशी रक्तप्रवाहाद्वारे वेगवेगळ्या अवयवात पोचतात. "सीटीसी'चे बीज "क्रॉस लिकिंग'द्वारे वेगवेगळ्या अवयवांत रुजले जाते आणि कर्करोगाची वाढ होते. ही वाढच बहुतांशी मृत्यूला कारणीभूत असते. आत्तापर्यंत हे "सीटीसी' शोधणे कठीण होते, याचे कारण त्यांची संख्या अत्यंत कमी असते. लाख श्‍वेताणूंमध्ये एखादाच "सीटीसी' असतो. फुफ्फुसे, ग्रंथी, आतडी यांच्या कर्करोगाच्या पूर्वनिदानातील "सीटीसी'चे महत्त्व वाढले आहे. 
नवी पद्धत "सीटीसी' शोधते आणि त्याची संख्याही मोजते, त्यामुळे नेमक्‍या कोणत्या टप्प्यावर रोग आहे, हे कळते. हे सर्व कमालीच्या अचूक पद्धतीने आणि नेमकेपणाने होते. रक्ताच्या कर्करोगाच्या बाबतीत मात्र ही पद्धत अद्याप तरी यशस्वी ठरलेली नाही. 
हे संशोधन आणि त्याचा उपयोग, निदानपद्धतीला अमेरिकी "एफडीए'ने मान्यता दिली आहे. परंतु सध्या तरी ह्या परीक्षेसाठी सत्तर ते ऐंशी हजरा रुपये खर्च येतो. भारतातही त्याच्या सर्व चाचण्या घेऊन 2019मधेच याला मान्यता मिळाली आहे. "टाटा हॉस्पिटल'मध्ये घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष जागतिक स्तरावर मान्य झाले आहेत. याचे प्रायोगिक परीक्षणही सुरू आहे. कमी किमतीत निदान सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय संशोधन प्रयोगशाळेतून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या अुपयोगी पडावे. याचे कारण विज्ञानाचे अंतिम ध्येय समाजहित हेच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr. arvind natu writes about cancer diagnosis without surgery