esakal | मर्म :  मराठी संशोधकाची झेप
sakal

बोलून बातमी शोधा

मर्म :  मराठी संशोधकाची झेप

भारतीय विज्ञान अकादमीचे सदस्य डॉ. अतीश दाभोलकर यांची इटलीतील ‘आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्रा’च्या (आयसीटीपी) संचालकपदावर निवड झाली असून, हा मोलाचा बहुमान आहे.

मर्म :  मराठी संशोधकाची झेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भारतीय विज्ञान अकादमीचे सदस्य डॉ. अतीश दाभोलकर यांची इटलीतील ‘आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्रा’च्या (आयसीटीपी) संचालकपदावर निवड झाली असून, हा मोलाचा बहुमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सैद्धांतिक भौतिकी संशोधनात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या संस्थेवर मराठी माणसाची निवड होणे, ही आनंदाची आणि अभिमानाचीही बाब. मूलभूत संशोधनाबरोबरच जगभरात वैज्ञानिक क्षमता विकसित करण्यात या संस्थेची मोठी भूमिका आहे. इटली सरकार, आंतरराष्ट्रीय परमाणू ऊर्जा संस्था, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार कार्यरत असणारी ‘आयसीटीपी’ ही ‘युनेस्को’ची प्रथम श्रेणीची संस्था आहे. अनेक देशांतील वैज्ञानिक धोरण, त्याची दिशा आणि प्रशासकीय निर्णयांत ‘आयसीटीपी’ महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. अतीश दाभोलकर यांच्या खांद्यावर आता संस्थेची धुरा सोपविण्यात आली आहे.

१९६३ मध्ये जन्मलेले अतीश मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे झाले. विज्ञानाची आणि मूलभूत संशोधनाची आवड असलेल्या अतीश यांनी कानपूर येथील ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’ची (आयआयटी) पदवी घेतल्यानंतर प्रिस्टन विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्रात डॉक्‍टरेट मिळविली. रटगर्स विद्यापीठ, हावर्ड विद्यापीठ आणि कॅलटेक येथे संशोधनकार्य केल्यानंतर ते १९९६ मध्ये भारतात परतले. २०१० पर्यंत त्यांनी मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे अध्यापनाचे कार्य केले. फ्रान्समधील सोरोबोन विद्यापीठ आणि ‘नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च’मध्ये ते २००७ पासून संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. ‘स्ट्रिंग सिद्धांत’ आणि ‘क्वांटम कृष्णविवरां’वरील संशोधनासाठी डॉ. दाभोलकर प्रसिद्ध आहेत. २००६ मध्ये त्यांना ‘शांतिस्वरूप भटनागर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, २००७ मध्ये त्यांना ‘आयआयएम नॅशनल लीडरशिप ॲवॉर्ड’ देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

loading image