Hanuman Jayanti 2023: हनुमंताची उपासना ही प्राणशक्तीची उपासना

‘श्रीमद् हनुमान कीलकम्’ रामरक्षेच्या सुरुवातीला येणाऱ्या या मंत्रामध्ये श्रीहनुमंतांना ‘कीलक’ म्हणजे किल्लीचे स्थान दिलेले आहे.
Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti 2023Sakal Digital
Summary

‘श्रीमद् हनुमान कीलकम्’ रामरक्षेच्या सुरुवातीला येणाऱ्या या मंत्रामध्ये श्रीहनुमंतांना ‘कीलक’ म्हणजे किल्लीचे स्थान दिलेले आहे.

Hanuman Jayanti 2023

‘श्रीमद् हनुमान कीलकम्’ रामरक्षेच्या सुरुवातीला येणाऱ्या या मंत्रामध्ये श्रीहनुमंतांना ‘कीलक’ म्हणजे किल्लीचे स्थान दिलेले आहे, म्हणजेच हनुमंताच्या कृपेशिवाय, हनुमंताच्या उपासनेशिवाय श्रीरामांपर्यंत पोहोचता येत नाही. रामरक्षा असो किंवा रामायणासारखे कथानक असो, त्यातला प्रत्येक मंत्र, प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना ही प्रतीकस्वरूप आणि आपल्याला बोध करून देणारी आहे. लोक म्हणतात, रावणाला मारण्यासाठी रामावतार झाला. वास्तविक रावणाला मारणे हे काम काही फार मोठे नव्हते. परंतु रावण म्हणजे काय, आपल्या जीवनात  रावणाचे स्थान काय, आणि त्याला कसे हरवता येते, हे समजावे यादृष्टीने संपूर्ण रामायणाची योजना केलेली आहे.

हनुमंत हे आदर्श भक्त आहेत. श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर बिभीषण, सुग्रीवादी सर्व वीरांचा यथोचित सन्मान करण्यात आला, त्यावेळी हनुमंतांनी मात्र श्रीरामांकडे एकच मागणे मागितले, ‘प्रभू, तुमच्या चरणांच्या ठायी भक्ती  राहो, एवढा एकच वर मला द्या, याव्यतिरिक्त मला दुसरे काहीही नको.’’ परमेश्र्वर आणि भक्त, गुरू आणि शिष्य, मालक आणि सेवक यांच्यातले आदर्श नाते हे राम आणि हनुमंताचे नाते. जाणीवरूपी राम आणि प्राणशक्तरूपी हनुमान या एका नाण्याच्या दोन बाजू. त्या जोपर्यंत एकत्र असतात तोपर्यंतच जीवनात ‘राम’ असतो! म्हणून प्रभू रामचंद्रांचे आख्यान म्हणा, स्तुती म्हणा, प्रार्थना म्हणा, काहीही करायचे असेल तर बाजूला हनुमंतांसाठी आसन ठेवण्याची पद्धत असते.

प्राण ही एक शक्ती-संकल्पना होय. तसे पाहिले तर वीज हीसुद्धा शक्तीच आहे. परंतु शक्तीची पायरी किंवा योग्यता ठरवायची  झाल्यास वीज दहाव्या पायरीवर असली तर प्राणशक्ती शंभराव्या पायरीवर असते. कारण जाणीव ही फक्त प्राणात असते आणि विजेमध्ये फक्त शक्ती. म्हणून विजेच्या उघड्या तारेला लहान मुलाने बोट लावले तर तिला हे लहान मूल आहे, त्याने चुकून हात लावला, तेव्हा आपण त्याला शॉक देऊ नये, असे तिला समजत नाही. मात्र  प्राणशक्तीमध्ये ‘जाणीव’ असल्याने तिला लहान-मोठा, स्त्री-पुरुष, सजीव-निर्जीव असे सगळे कळते. विजेला आपण नियंत्रित करू शकतो; परंतु प्राणशक्तीवर मात्र कोणाचेच नियंत्रण नसते. प्राणाची आपल्यावर सत्ता असते. आपली प्राणांवर नाही. जगातल्या कुठल्याही शक्तिशाली व्यक्तीची, अगदी संत-महात्म्याचीसुद्धा प्राणावर सत्ता नसते.

प्राणामुळे आपण नुसते जिवंत असतो असे नव्हे, तर प्राण आपल्या पेशी पेशीत फिरला नाही तर आपल्याला आरोग्य मिळणार नाही. एखाद्या पेशीतील प्राण निघून गेला तर ती पेशी काहीही कार्य करू शकत नाही, ती निर्जीव होते, निरूपयोगी होते. प्राणावर नियंत्रण ठेवणे तर दूरच; तथापि प्राण काय आहे हेही आपल्याला कळत नाही. तरी एक निश्र्चित, की प्राणकृपा लाभली तर आपण आत्माराम होऊ. त्यासाठी आपल्याला प्राण समजो वा न समजो, आपल्याला प्राणाचे आवाहन करायला हवे, प्राण आकर्षित करता यायला हवा. यासाठी हनुमंताची उपासना करावी.

दर शनिवारी हनुमंतांना नमस्कार करण्याने ही उपासना होऊ शकणार नाही, तर प्राणायामाच्या अभ्यासाने, जाणीवपूर्वक प्राणाच्या आवाहनाने, वीर्य शक्तीच्या संरक्षणाने ती करता येईल. समर्थ रामदास स्वामी हे हनुमानाचे भक्त. त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. लोकांमध्ये, विशेषतः तरुण मंडळींमध्ये प्राणायामाच्या व व्यायामाच्या माध्यमातून राष्ट्राभिमान जागा केला. शौर्याचे व वीर्याचे संरक्षण कसे करावे याचा प्रचार केला. हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी, पर्यायाने प्राणशक्तीच्या आवाहनासाठी आपल्यालाही आज या गोष्टींची मदत घ्यायला हवी.

जेथे राम तेथे हनुमान असे म्हटले तर आपल्या जाणिवेबरोबर प्राण असतोच असतो. याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे गुडघा, डोके, पाठ वगैरे काही दुखत असले तर दुखणाऱ्या भागावर जाणीव प्रस्थापित केली म्हणजे त्या भागावर हात ठेवून विचार केला की माझी प्राणशक्ती या ठिकाणी येऊ दे, तर खरोखरच त्याठिकाणी प्राणशक्ती केंद्रित होऊन दुखणे बरे होण्यास सुरुवात होते. जेथे प्राण आहे, तेथे जीवन असते आणि जेथे जीवन आहे तिथे प्राण असतोच.

हनुमंत स्वतःहून काही करत नाहीत. ते रामभक्त आहेत. राम जे काही सांगतील ते मी करीन असे हनुमंतांचे म्हणणे. त्यांना आठवण करून द्यावी लागत असे. सीताशोधाच्या वेळी समुद्र उल्लंघायचा होता तेव्हा ‘तुला उडता येते’ याची त्यांना आठवण करून द्यावी लागली. ‘घे विजयी उड्डाण’ असे सांगितल्यावर त्यांनी उड्डाण केले. तसेच, आपली जाणीव जेथे जाते, तेथे हनुमंत म्हणजे प्राण आपसूक पोहोचतात. फक्त त्या प्राणशक्तीला आत काम करायला संधी मिळेल एवढा तरी वेळ देता यायला हवा, आणि त्यासाठी प्राणायामाच्या अभ्यासाची पुंजी गाठीला असायला हवी. केवळ २-३ मिनिटे श्र्वास आत-बाहेर करणे म्हणजे प्राणायाम नव्हे. प्राणायाम करताना त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. याचे प्रयोग केले असता असे लक्षात आले की कमीत कमी बावीस मिनिटे प्राणायाम केल्याशिवाय काही साध्य होत नाही.

पवनपुत्र हनुमंत तसेच शनिदेवता या वात नियंत्रित करणाऱ्या देवता आहेत. शरीरातील वात बिघडला तर तेलाचा अभ्यंग करणे हा उपाय उत्तम लागू पडतो. पक्षाघातासारख्या गंभीर वातविकारात सुद्धा तेलाचा मसाज करून शरीरात पुन्हा प्राणाचे आवाहन करता येते. असंतुलित असलेला वायू प्राणाला नाकारतो. आणि वायूला संतुलित करण्याने पुन्हा प्राणाचे आकर्षण करता येते. म्हणून तेल व हनुमंत यांचा तसेच तेल व शनिदेवतेचा संबंध दाखविला जातो. अर्थात बाह्यशिलेवर तेल ओतण्याच्या उपायाबरोबरच आपल्या शरीराला अभ्यंग केला किंवा त्या देवतेला प्रिय असणाऱ्या रुईच्या फुला-पानांचा शेक केला तर वात नियंत्रणात येतो आणि शरीरात प्राणसंचार पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.

हनुमंताची उपासना ही प्राणशक्तीची उपासना होय आणि प्राणशक्तीची उपासना ही हनुमंताची उपासना होय. श्रीहनुमंतरायांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळे मंत्र म्हटले जातात. यात भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र, हनुमानचालिसा, हनुमान बाण वगैरेंचा समावेश आहे. यांचे पठण केल्याने श्रीहनुमंत प्रसन्न होऊ शकतात. हे मंत्र-स्तोत्र संगीतबद्ध करून शुद्ध, स्पष्ट उच्चारांसकट गायल्याने श्र्वासाची गती नियंत्रित होते व त्यामुळे देवता प्रसन्न होऊन ईप्सित कार्य होऊ शकते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com