सायबर सुरक्षेसाठी दक्षतेचे कवच

डॉ. दीपक शिकारपूर
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

संगणकीय महाजालाच्या प्रसाराबरोबरच हॅकिंगची व्याप्तीदेखील वेगाने वाढते आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी घ्यायची ‘सायबर काळजी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

संगणकीय महाजालाच्या प्रसाराबरोबरच हॅकिंगची व्याप्तीदेखील वेगाने वाढते आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी घ्यायची ‘सायबर काळजी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

गेल्या पाच-पंचवीस वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली! त्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा मोठा वाटा आहे आणि त्यांमध्येही सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनो टेक्‍नॉलॉजी), सर्व संगणकीय वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला सेलफोन आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माणसांचेही जीवन पूर्णतः वेगळे झाले. इंटरनेट वापरून अर्थ व्यवहार करणे हे आता सर्वमान्य झाले आहे. सुटसुटीतपणा, तसेच भौगोलिक मर्यादा नसल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

त्याचबरोबर २४*७ व्यवहारासाठी एटीएम व डेबिट कार्ड हे प्रकारही सर्वमान्य आहेत. आग तेथे धूर, तसे अर्थ तिथे गुन्हेगार हे गृहीतकही तितकेच सत्य आहे. हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या संगणकीय व्यवहारांमध्ये अनधिकृत रीतीने प्रवेश करून तेथील माहितीचा गैरवापर करणे. त्याची उदाहरणे आपण रोज सायबर क्राइमसंबंधीच्या बातम्यांत वाचतो. क्रेडिट कार्ड वापरून (विशेषतः नेटवर) केलेल्या व्यवहारातील फसवणूक, नेटबॅंकिंगशी संलग्न असलेल्या खात्यातील पैसे चोरणे वा अन्यत्र वळवणे, इ. संगणकीय महाजालाच्या प्रसारासोबतच हॅकिंगची व्याप्तीदेखील जगभर तितक्‍याच वेगाने वाढते आहे. सायबर गुन्हेगार जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून नेटद्वारे गुन्हा करू शकतात. गेल्या आठवड्यात सुमारे ३२ लाख डेबिट कार्डची गोपनीय माहिती आणि पिन नंबर चोरीला जात असल्याची घटना समोर आल्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली. स्टेट बॅंकेसह १९ हून अधिक राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बॅंकांच्या ३२ लाख डेबिट कार्डधारकांची माहिती चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्डधारक संबंधित बॅंकेऐवजी अन्य बॅंकांच्या ९० एटीएममधून व्यवहार करताना अमेरिका, चीनमधून माहिती चोरीला गेल्याचा संशय आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेस या एटीएम तयार करणाऱ्या कंपनीच्या त्रुटीमुळे बॅंकांच्या डेबिट कार्डची माहिती चोरीला गेल्याचा अंदाज आहे. त्यातही ज्यांचे पिन क्रमांक जन्मतारखेशी संबंधित होते, अशा खातेदारांचे प्रमाण जास्त होते असेही आढळून आले आहे. यामुळे इंटरनेटचा अर्थव्यवहारासाठी वापरच थांबवणे हा टोकाचा दृष्टिकोन घेणेही अव्यवहार्य आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी घ्यायची ‘सायबर काळजी’ हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. 

व्यवहाराची मर्यादा निश्‍चित करा 
बहुतांश आर्थिक सेवा देयके आपल्याला व्यवहाराची कमाल मर्यादा व भौगोलिक सीमा निश्‍चित करायचा पर्यायही देऊ शकतात. आपण विशेष सूचना देऊन या मर्यादा स्पष्ट करू शकता. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करू शकता. 

एटीएम पासवर्ड (पिन क्रमांक) बदला 
अनेक खातेदार आपला पासवर्ड (पिन क्रमांक) केवळ आळशीपणामुळे वर्षानुवर्षे बदलत नाहीत. पासवर्ड हा थोडा अवघड व नाव, जन्मतारीख, पत्ते याच्याशी बिलकुल साधर्म्य नसलेला हवा. हे नियम फक्त 
एटीएमला नाही, तर इतर व्यवहारांनाही तितकेच लागू आहेत. त्यासाठी बॅंकांच्या संदेशाची वाट पाहू नका. शक्‍य असेल तर हा बदल साप्ताहिक करा. पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी सायबर स्मार्ट व्हा. अशा जागी तो साठवा, की तो सहजासहजी दुसऱ्याला सापडू नये. जवळच्या विश्वासार्ह व्यक्तीशी हे गुपित उघडे करणे म्हणजेसुद्धा एक प्रकारची जोखीम. 

अनेक नागरिक एकच पासवर्ड व पासकोड सर्व व्यवहारांना सुलभतेसाठी वापरतात. असे करून एक मोठी सायबर जोखीम ते पत्करत असतात.
अधिकृत एटीएम सेंटरचाच वापर करा शक्‍य झाले तर आपल्याच बॅंकेच्या खात्यातील एटीएम सेंटर वापरा. अनेक एटीएमसंबंधी गुन्हे हे त्रयस्थ सेंटरवर केलेल्या व्यवहाराच्या असुरक्षितेतेमुळे झाले आहेत.
बॅंकांच्या दळणवळणाची दखल सर्व बॅंका आपल्या ग्राहकांना केलेल्या व्यवहाराची पोच पावती एसएमएस व ईमेलवर त्वरित पाठवतात. व्यवहाराचा तपशील व उपलब्ध शिल्लक याचा त्यात समावेश असतो. हे संदेश काळजीपूर्वक वाचा व खातरजमा करून घ्या. अनेक वेळा 
हलगर्जीपणामुळे हे संदेश वरवर वाचून किंवा न वाचताच डिलिट केले जातात. 

फोन वा ई-मेलवर माहिती देऊ नका 
अनेक वेळा सायबर गुन्हेगार संभावितपणाचा आव आणून व आपण अधिकृत अधिकारी असल्याचे भासवून दूरध्वनी करून मधुर संभाषण करून आपली  माहिती मिळवितात. हीच क्‍लृप्ती ई-मेल पाठवूनही वापरली जाते. कुठलीही बॅंक कधीही फोन/ई-मेलवर गोपनीय माहिती विचारत नाही. अशी कुठलीही शंका आली, तर आपल्या बॅंकेच्या अधिकृत अधिकाऱ्याला भेटून अथवा फोन करून खातरजमा करून घ्या. सारांश काय तर जसे जग बदलत आहे, तसेच गुन्हेगारही आपले स्वरूप बदलत आहेत. हे गुन्हेगार आता ‘स्मार्ट’ झाले आहेत. ते सुशिक्षित, तंत्रकुशल तर आहेतच; पण गोड बोलून आपला हेतू साध्य करण्याचा ते प्रयत्न करीत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा.

एटीएम स्लिप सांभाळा 
प्रत्येक व्यवहाराच्या वेळी एक स्लिप प्रिंट करून मिळते. त्यावर आपला खाते क्रमांक, व्यवहाराचा तपशील व उपलब्ध शिल्लक यांचा समावेश असतो. ही स्लिप कुठेही फेकू नका. एकतर सुरक्षित सांभाळा किंवा जागरूकतेने नष्ट करा.

Web Title: Dr. Deepak Shikarpur article on cyber security