brain
brainsakal

आमोद सुनासी आले...

वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’ घोषित झाले ते ज्ञानेंद्रियांपैकी ‘स्पर्श’ या विषयावरच्या संशोधनाला. एकूणच या विषयावरील संशोधनाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप...

चेतासंस्थेच्या संशोधनामध्ये पुढील काही वर्षांत अगम्य आणि अतर्क्य अशा मानवी क्षमतांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बहुधा यावेळच्या वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’ घोषित झाले ते ज्ञानेंद्रियांपैकी ‘स्पर्श’ या विषयावरच्या संशोधनाला. एकूणच या विषयावरील संशोधनाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप...

काही वर्षांपूर्वी जगातील अनेक माध्यमांमध्ये ‘वैद्यकशास्त्रातील अघटित’ म्हणून एक वृत्त प्रसारित झाले. अमेरिकेतील कोलोरॅडो येथील लीघ एर्सिंग या ४७ वर्षीय महिलेविषयीचे हे वृत्त होते. २००९मध्ये लीघच्या मेंदूला अपघाती इजा झाली. यानंतर तिच्या मेंदूतील काही क्षमता नाहीशा झाल्या. पण त्याचबरोबर काही आश्चर्यकारक बदलही झाले. मुळात प्रामुख्याने पशुपालनाचा व्यवसाय असलेल्या या स्त्रीचा काव्य, चित्रकला इत्यादी गोष्टींशी दुरान्वयेही संबंध नव्हता. पण हळू हळू ती उत्कृष्ट दर्जाच्या कविता करू लागली. एवढेच नव्हे तर सुंदर चित्रही काढू लागली आणि आज तर ती एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराला लाजवेल, अशी चित्र काढते.

मानवी चेतासंस्थेच्या विविध क्षमता आपल्याला ज्ञात आहेत. परंतु ज्या क्षमता पाहून केवळ थक्क व्हावं... किंबहुना ज्या क्षमता तर्काच्या पलीकडे झेप घेतात त्यांना आपण ‘प्रतिभा’ म्हणतो. अगदी लहान वयात पट्टीच्या गायकाप्रमाणे उपजत गायनकला सादर करणारे कुमार गंधर्व आपल्याला ज्ञात आहेतच. तसंच केवळ चार वर्षाचं वय असताना पियानोवर सिंफनी वाजवणारा मोझार्ट! केवळ अद्‌भुत असं त्याचं वर्णन होऊ शकतं. संगीताप्रमाणेच गणित, काव्य, संख्याशास्त्र, साहित्य... अशा अनेक क्षमता यात येतात. अशा क्षमता असणाऱ्या व्यक्तींना ‘सॅव्हंट’ म्हणतात. ‘रेन मॅन’ या १९८८च्या सिनेमात डस्टिन हॉफमनने एका सॅव्हंटची भूमिका केली आहे. अनेकांनी हा सिनेमा पाहिला असेल. ही व्यक्तिरेखा जरी काल्पनिक असली तरी ज्या व्यक्तीवरून हे व्यक्तिमत्त्व घेतलं गेलं, ती व्यक्ती मात्र आज हयात आहे. या व्यक्तीला सहा हजार पुस्तकं मुखोद्गत आहेत. ज्ञानकोश पाठ आहेत. भौगोलिक नकाशे जसेच्या तसे लक्षात आहेत. ही व्यक्ती अत्यंत वेगाने वाचू शकते, पुस्तकाचे डावे व उजवे पान एकाच वेळी स्कॅनरने बघावे तशी वाचू शकते आणि क्षणार्धात लक्षातही ठेवू शकते.

त्याच्या मेंदूच्या ‘एमआरआय’ तपासणीत ‘कॉर्पस कॅलोजम’ हा मेंदूच्या उजव्या व डाव्या भागांना जोडणारा भागच नाही आहे आणि शिवाय इतरही काही भागांमध्ये दोष आहेत, असे आढळले. सॅव्हंट हा शब्द फ्रेंच SAVIOR.. (ज्ञानी) या शब्दावरून आला. या व्यक्तींमध्ये संगीत, चित्रकला, गणित, संख्याशास्त्र, माणसांची नावे, वाहनांच्या नंबरप्लेट लक्षात राहणे, पुस्तकच्या पुस्तक एकदाच वाचून मुखोद्‌गत असणे, पुस्तकांची पानं काही क्षणात स्कॅनरप्रमाणे वाचणे, जुन्या तारखा व वर्ष क्षणात सांगणे, संगीताचा मोठा भाग किंवा सिम्फनी एकदाच ऐकून जशीच्या तशी वाजवून दाखवणे... अशा अनेक अलौकिक क्षमता दिसतात.

आश्‍चर्यकारक क्षमता

याचा आणखी एक गुणधर्म म्हणजे ‘सिनेस्थेशिया’ म्हणजे काय, तर एका ज्ञानेंद्रियांचा विषय दुसऱ्या ज्ञानेंद्रियांनी जाणणे. अशांपैकी काही व्यक्तींना संगीतातले स्वर ‘दिसतात’, रंग ‘ऐकू’ येतात आणि शब्दांची ‘चव’ लागते. चेताशास्त्राच्या दृष्टीने सर्व संवेदना या एक प्रकारची ऊर्जाच असते. आपला मेंदू त्यात भेदभाव करून, त्या ऊर्जेची ध्वनी, प्रकाश, स्पर्श, चव अशाप्रकारे विभागणी करतो. सॅव्हंट असलेल्या व्यक्तींमध्ये कधीकधी ही विभागणी न होता एका ज्ञानेंद्रियांचा विषय दुसऱ्या ज्ञानेंद्रियानेसुद्धा जाणला जाऊ शकतो. कदाचित त्यामुळेच हे विषय एकदाच अनुभव घेऊनसुद्धा मेंदू पक्का लक्षात ठेवू शकतो. ‘सिनेस्थेशिया’चे वाङ्‌मयीन वर्णन श्रीज्ञानेश्वरीत अलंकार रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा मांडले आहे. सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘हा सहावा अध्याय इतका महत्त्वाचा आहे की क्षीरसिंधूतून मंथन करून निघालेल्या अमृताप्रमाणे तो भासेल. या अध्यायाचे विवरण अलंकार पूर्ण भाषेत आम्ही करणार आहोत. भाषा जरी मराठीच असली तरी अमृतालाही लाजवील असं रसभरित आख्यान तुम्हाला त्यात दिसेल. यातील रसाळपणामुळे श्रवणेंद्रियांनाही जिव्हा फुटतील... म्हणजेच शब्दाची गोड चव जणू जिभेवर उतरेल, घ्राणेंद्रिय वेधून जातील, शब्द ऐकून नेत्रांची तृप्ती होईल आणि रूपाची खाण उघडल्याप्रमाणे वाटेल. माझं हे आख्यान सर्व ज्ञानेंद्रियांचा भांडण मिटवून सर्वच इंद्रियांना सारखे समाधान मिळवून देईल हे निश्चित.’’

सॅव्हंट सिंड्रोमबद्दल सर्वप्रथम चर्चा झाली ती १७८३ मध्ये. थॉमस फ्युलर या अमेरिकी व्यक्तीबद्दल १७८९मध्ये ‘अमेरिकन सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये लिहिले गेले. थॉमस हा एरवी मतिमंद म्हणून गणला जायचा. शालेय शिक्षणाचा त्याला गंधही नव्हता. अगदी साधी गणितं तो सोडवू शकायचा नाही... पण जेव्हा फ्युलरला पुढील प्रश्न विचारण्यात आला... ‘‘जी व्यक्ती ७० वर्ष व बारा तास इतक्या वयाची आहे,ती एकूण किती सेकंद जगली?’’ तेेव्हा त्या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे ‘२२ १० ५०० ८००’....त्याने क्षणार्धात दिले. आश्चर्य म्हणजे त्यात त्याने मधल्या लीप वर्षांचा हिशोबसुद्धा गृहीत धरला होता.

१८८७मध्ये लंडनमध्ये डॉक्टर डाऊन यांनी मेडिकल सोसायटीमध्ये याच विषयावर व्याख्यान दिलं होतं. त्यात नमूद केलेल्या एका व्यक्तीला ‘दि डिक्लाईन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर’ हा संपूर्ण ग्रंथाच्या ग्रंथ मुखोद्‌गत होता. ही व्यक्ती हा ग्रंथ उलटा व सुलटा घडाघडा म्हणून दाखवू शकायची... आणि अगदी अचूक. सॅव्हंट सिंड्रोम चे दोन ढोबळ प्रकार आहेत. पहिला म्हणजे काही व्यक्ती ज्यांच्यात जन्मतःच अशा क्षमता असतात आणि दुसरा म्हणजे ॲक्वायर्ड सॅव्हंट. या व्यक्ती आयुष्यातील पहिली काही वर्ष चारचौघांसारखे असतात. मात्र मेंदूला इजा झाल्यावर या व्यक्तींमध्ये पूर्वायुष्यात अजिबातच नसलेल्या क्षमता आश्चर्यकारकरित्या प्रत्ययाला येतात. ज्या क्षमतांचा त्यांना गंधही नसतो. त्यांच्यात ते संपूर्ण प्रतिभासंपन्न होतात. काही व्यक्ती मात्र लौकिकार्थाने अगदी चारचौघांसारख्या असतात; परंतु त्यांच्यात एखाद्या प्रकारची असामान्य प्रतिभा दिसून येते.

सॅव्हंट सिंड्रोमचे निश्चित कारण काय? यावर शोध घेण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु अगदी निश्चित असे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. येत्या काही वर्षांत चेतासंस्थेच्या संशोधनातून यावर प्रकाश पडू शकेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. विश्वातील ज्ञान व विज्ञान हे न शिकताच माणसाला उपलब्ध होऊ शकत असेल, म्हणजेच ते ‘स्वयंभूरीत्या’ प्रकट होऊ शकत असेल, तर्काच्या पलीकडे असेल तर हा शोध आपल्याला नेमका कुठे घेऊन जाईल, हा या प्रश्नाचा दुसरा चेहरा!

विज्ञानाची अथक शोधयात्रा

२०२१मधील वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’ नुकतेच घोषित झाले. हे मानवी चेतासंस्थेशी संबंधित संशोधनाला देण्यात आले. स्पर्श आणि तापमान जाणून घेणाऱ्या नसांवरच्या या संशोधनानंतर काही वेदनादायक आजारांवर औषधं निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ- डायबेटिक न्युरोपथीमध्ये होणारी तळपायांची आग आणि हाताची आग ही तापमान जाणाऱ्या नसांमधूनच संक्रमित होते. या आजारांमध्ये हात व तळपायात असह्य आग होते. कधीकधी मिरचीची पावडर चोळल्याप्रमाणे ही वेदना असते. नुकत्याच पार पडलेल्या संशोधनाच्या आधारे या वेदनेवर औषध सापडलं तर एक खूप मोठा विजय आपण वेदनादायक आजारांवर मिळवू शकतो.

शेवटी ‘science is the quest for anything which MIGHT be true!’ असं नोबेल पुरस्कारविजेत्या पीटर मेडावरने म्हटलेलंच आहे.

(लेखक न्यूरोसर्जन आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com