esakal | कोल्हापूरच्या मातीत ‘जपानी मेडलर’ वृक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Medlar Tree

कोल्हापूरच्या मातीत ‘जपानी मेडलर’ वृक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेकलेस पॉपलर वृक्षापाठोपाठ कोल्हापूरच्या मातीत कळंबा परिसरातील शिवप्रभूनगर येथे एका घराशेजारी ‘जपानी मेडलर’ हा वृक्ष रुजल्याचे दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच त्याची नोंद झाली आहे.

नेकलेस पॉपलर वृक्षाबाबत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर कळंबा परिसरातील शिवप्रभूनगर येथेही एक वेगळा वृक्ष असल्याची माहिती मला मिळाली. प्राजक्ता गवस यांच्या घराशेजारी असलेला हा वृक्ष मी जाऊन पाहिला. त्याची छायाचित्रे पाहिली. प्रत्यक्ष वृक्षाची पाहणी करून फांद्या-फुलांची छायाचित्रे काढली. त्यानंतर त्या वृक्षाबाबत गवस कुटुंबीयांकडे चौकशी केली असता असे समजले की, काही वर्षांपूर्वी गवस कुटुंब काश्‍मीरला सहलीला गेले होते. तेव्हा त्यांनी तेथील काही वृक्षांच्या बिया गोळा करून त्या कोल्हापुरात परतल्यानंतर जमिनीमध्ये पेरल्या. त्यापासून काही रोपे तयार झाल्यानंतर त्यातील एक रोप त्यांनी घराशेजारी लावले. तो वृक्ष मोठा झाल्यानंतर त्याला फुले येऊ लागली; पण अद्याप त्याला फळे लागली नसल्याचे सांगितले. अभ्यासासाठी त्या वृक्षाच्या फुलांसहित दोन फांद्या आम्ही घेतल्या. संदर्भग्रंथ पाहिल्यानंतर वृक्षाच्या ओळखीवर शिक्कामोर्तब झाले.

या वृक्षाला ‘जपानी मेडलर’, ‘जपानी प्लम’, ‘चायनीज प्लम’, ‘लोकाट’ अशी प्रचलित इंग्रजी नावे आहेत. हिंदीमध्ये या वृक्षास ‘लौकास’ तर मराठीत ‘लुकाट’ व ‘लुगाठ’ अशी नावे आहेत. या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘एरिओबोट्रीया जॅपोनिका’ (Eriobotrya japonica) असे असून, तो रोझएसी (Rosaceae) म्हणजेच गुलाब आणि सफरचंदाच्या कुळातील आहे. या वृक्षाचे मूळ स्थान आहे जपान आणि चीन. खाण्यायोग्य फळांसाठी या वृक्षाची लागवड जपान, अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल, इटली, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, केनिया, इराण, इराक, पाकिस्तान या देशांत केली जाते. आपल्या देशातही या वृक्षाची लागवड पंजाब, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांत होते. महाराष्ट्रात त्याची लागवड पुणे व मुंबईतील बागांमध्ये केलेली आहे.

हेही वाचा: आयजीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी खुले

सदाहरित देखणेपण

जपानी मेडलर हा लहान आकाराचा सदाहरित विदेशी वृक्ष असून, तो ३ ते १० मीटर उंचीपर्यंत वाढतो. मुख्य खोडाच्या तीन ते चार फूट उंचीपासूनच अनेक फांद्या सरळ व नंतर आजूबाजूस पसरत वाढतात. कोवळ्या फांद्यांवर तांबूस रंगाची लव असते. पाने साधी, गडद हिरवी, एकआड एक, १० ते २५ सें.मी. लांब आणि ३ ते ४ सें.मी. रुंद व टोकदार असतात. पानांची मागील बाजू केसाळ, पिवळट करड्या रंगाची, पानांचा देठ आखूड, केसाळ, पाने चिवट असून कडा दंतूर असतात.

फुले मळकट पांढऱ्या किंवा फिकट पिवळसर रंगाची, द्विलिंगी, २.० सें.मी. व्यासाची, फांद्यांच्या टोकांवर येणाऱ्या बहुशाखीय पुष्पमंजिरीत येतात. पाकळ्या पाच, पुंकेसर अनेक, फळे गोलाकार ते लंबगोलाकार, ३ ते ५ सें.मी. लांब, पिवळसर केशरी रंगाची, गरयुक्त असतात. गर पांढरा किंवा पिवळसर-केशरी रंगाचा, गोडसर व खाण्यायोग्य असतो. बिया ३ ते ५, तपकिरी रंगाच्या, विषारी असतात.

जाम, जेली आणि औषधही!

फळांच्या गरापासून जाम, जेली आणि ज्यूस तयार करतात. पानांपासून चहा बनवतात. पानांचे चूर्ण डायरियावर वापरतात. पारंपरिक औषधी पद्धतीत या वृक्षाची पाने आणि साल विविध विकारांत वापरतात.

- डॉ. मधुकर बाचूळकर

(लेखक वनस्पतीतज्ज्ञ आहेत.)

loading image
go to top