शितावरून भाताची परीक्षा!

डॉ. मानसी फडके
Wednesday, 13 January 2021

भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकस अँड प्रोग्रॅम इम्पलेमेंटेशन (मोस्पी) या मंत्रालयाकडे विविध आर्थिक सामाजिक बाबींवर डेटा गोळा करण्याची जबाबदारी आहे. या मंत्रालयांतर्गत ‘नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस’(एनएसओ)आहे.

गणित आणि संख्याशास्त्र ही दोन्ही शास्त्रे अंकांवरच आधारित आहेत. पण, या शास्त्रांचा अंकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी निराळा आहे. गणितज्ञ हे प्रामाणिक असतात; १० पैकी ४, म्हणजेच १०० पैकी ४०, म्हणजेच १०००००पैकी ४००००, हे प्रमाण गणितात अटळ, अभेद्य आहे. या धरतीवर संख्याशास्त्रज्ञांना मात्र अप्रामाणिक म्हणावे लागेल! गणितात ‘प्रमाण’ तर संख्याशास्त्रात ‘अनुमान’. जिकडे पूर्ण लोकसंख्येबद्दल आपल्याकडे माहिती नाही, पण एका छोट्या नमुन्याच्या आधारे आपल्याला काही महत्वाच्या बाबींचे अनुमान लावायचे आहे,  तिथे संख्याशास्त्राचा खास विनियोग करता येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

समजा आपल्याकडे १० मुलांचा वर्ग आहे. सगळी मुले ८ वर्षांची. आपल्याला मुलांच्या उंचीचे अनुमान काढायचे आहे, तर आपण किती मुलांना नमुन्यात घेऊ? कोणी म्हणेल ४ घ्या, कोणी म्हणेल ६ घ्या. ६ मुलांच्या नमुन्यावरून आपण १० मुलांच्या सरासरी उंचीचा अनुमान लावला. समजा वर्गात १०० मुलं असली, तर ६० मुलांच्या नमुन्याची गरज पडेल का? बहुतेक नाही! १०० मुलांच्या उंचीचे अनुमान लावण्याकरिता ३० मुलांचा नमुना पुरेसा असेल. मानूया, की आपल्या वर्गात १ लाख मुले आहेत, तर किती मुलांचा नमुना घ्यावा लागेल? शंभर वरून लोकसंख्या १००० पटीने वाढून  एक लाख झाली म्हणून काही नमुना तीस वरून ३० हजार करण्याची गरज नसते! संख्याशास्त्र सांगते की एक लाख मुलांच्या उंचीचे अनुमान लावण्याकरिता ३५०मुलांचाच नमुना पुरेसा असतो! हा सिद्धांत बहुतेक अर्थशास्त्रज्ञांना आणि समाजशास्त्रज्ञांना दिलासा देणारा आहे. कारण या सिद्धांताचा आधार घेऊन १३३ कोटींच्या देशाच्या राहणीमानाबद्दल अनुमान लावण्याकरीता खूप अवाढव्य नमुन्याची गरज लागणार नाही हे स्पष्ट आहे! शितावरून भाताची परीक्षा! या टप्प्यावर डेटाची निर्मिती सुरु होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकस अँड प्रोग्रॅम इम्पलेमेंटेशन (मोस्पी) या मंत्रालयाकडे विविध आर्थिक सामाजिक बाबींवर डेटा गोळा करण्याची जबाबदारी आहे. या मंत्रालयांतर्गत ‘नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस’(एनएसओ)आहे. एनएसओच्या अंतर्गत सेंट्रल स्टॅटिस्टिकस ऑफिस (सीएसओ) आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (एनएसएसओ) अशा संस्था कार्यरत आहेत. एनएसओ द्वारेच भारताच्या उत्पन्नाची आकडेवारी, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मिती व खर्च, बचत, राज्य पातळीवरील उत्पन्न हे आकडे संकलित होतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डेटा संकलित करतांना काही आंतरराष्ट्रीय निकषही सांभाळायला लागतात. उदाहरणार्थ: एखादी अमेरिकन कंपनी भारतात कार्यरत आहे. तर या कंपनीचे उत्पन्न भारताच्या `जीडीपी’मध्ये मोजले जाते. तेच उत्पन्न अमेरिकेने त्यांच्या `जीडीपी’मध्ये दाखवल्यास दुहेरी मोजणी होईल. तर, एनएसओला युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल डिव्हिजन यांच्या बरोबरही संवाद साधून ठेवावा लागतो. संख्या संकलित करतांना आंतरराष्ट्रीय निकषांवरही ते सुसंगत असल्याची काळजी घ्यावी लागते. दर महिन्याला मुख्य उद्योगांची वाढ दर्शवणारा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन (आयआयपी) हा सांकेतांकही एनएसओच प्रकाशित करते. सीएसओच्या यंत्रणेकडे आर्थिक सेन्ससची जबाबदारी आहे. सेन्सस प्रक्रियेत अक्षरशः प्रत्येक आर्थिक एस्टॅब्लिशमेंटची नोंद केली जाते. तर दुसरीकडे, एनएसएसओ या संस्थेतर्फे अखिल भारतीय पातळीवरील नमुना सर्वेक्षणे केली जातात. या सर्वेक्षणांतून ग्रामीण तसेच शहरी ग्राहकांचे खर्च, रोजगार, पर्यावरण, घराची परिस्थिती, साक्षरता, आरोग्य, पोषण याचे अनुमान लावले जाते. देशामध्ये या सर्व गोष्टींचे अनुमान बांधतांना सांख्य वैज्ञानिक इष्टतम नमुने घेत असतात.

भारतातील ऑफिस ऑफ रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर या विभागातून भारताच्या लोकसंख्येची माहिती संकलित केली जाते. वयानुसार, लिंगानुसार, शैक्षणिक आणि वैवाहिक परिस्थितीनुसार लोकसंख्येचा अभ्यास केल्यास लोकसंख्येतील वैशिष्ट्ये लक्षात येतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Mansi Phadke write article Mathematics and Statistics

Tags
टॉपिकस
Topic Tags: