कोरोना : पुढच्यास ठेच, मागच्याला आधार !

mumbai-women
mumbai-women

ज्या व्यक्तीला ‘कोरोना’ होऊन तो पूर्ण बरा झाला तो ‘कोरोना’मुक्त. पूर्ण बरा होणे म्हणजे अशा व्यक्तीच्या दोन आरटीपीसीआर निगेटिव्ह येणे. या दोन  टेस्टमधील कमीतकमी अंतर २४ तासांचे (एक दिवस) असले पाहिजे. असे रिपोर्ट आलेली व्यक्ती ‘कोरोना’मुक्त मानली जाते. ती काय काय करू शकते, हे लक्षात घ्या. दूध टाकू शकते, पेपर टाकू शकते, भाजी विकू शकते, हॉटेल चालवू शकते, दुकान चालवू शकते. अँब्युलन्सवर चालक अथवा मदतनीस म्हणून काम करू शकते. तसेच दवाखान्यात अथवा रुग्णालयात डॉक्‍टरांचा सहायक म्हणून काम करू शकते.

 मानसिक आधार  
‘कोरोना’मुक्त व्यक्ती म्हणजे एक वरदान आहे. ‘कोरोना’मुक्त व्यक्ती कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यासाठी एकदम योग्य आहे. सर्व ‘कोविड’ रुग्णांना एक भक्कम उदाहरण म्हणून उपयोग होतो आणि मानसिक बळ वाढविण्यासाठी फायदा होतो. याचे कारण ‘कोरोना’ झाला की रुग्णाचे मानसिक खच्चीकरण होते. आपले कसे होणार, आपल्याला मृत्यू तर येणार नाही ना, आपल्या कुटुंबीयांचे कसे होणार असे अनंत बरेवाईट विचार येत असतात. बऱ्याच वेळा निदर्शनास आले आहे की रुग्ण आजारामध्ये आपली मानसिकता बदलतो आणि आजार वाढवून घेतो किंवा इतर आजारांना आमंत्रण देतो. काही रुग्णांवर मानसिक ताण पडतो, तर काही जण आत्महत्येसारख्या अत्यंत विचित्र पर्यायाकडे आकर्षित होतात. अशा रुग्णांचे निदान झाल्याझाल्या समुपदेशन झाले आणि ते ‘कोरोना’तून पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तीने केले तर खरेच ‘कोरोना’देखील घाबरून पळ काढेल. ‘कोरोना’मुक्त आपले ‘कोरोन’विरुद्धच्या लढाईतील अनुभव सांगून मनोबल नक्कीच वाढवू शकतो. सध्या ‘कोरोना’मुक्त पोलिस हे नवीन रुग्णांचे प्रबोधन करीत आहेत.

प्लाझ्माचा उपयोग 
कोरोना’मुक्त व्यक्ती प्लाझ्मा देऊ शकतात. काही रुग्णांना जास्त गंभीर आजार होतो. अशा वेळी गरज असते ती प्लाझ्माची. हा लेख लिहितेवेळी, आपल्या देशात साडेसात लाख रुग्ण ‘कोरोना’मुक्त झालेले आहेत, हे सर्व प्लाझ्मादाते म्हणून उपयोगी पडू शकतात. प्लाझ्माचे गणित असे असते की जेवढा गंभीर आजारातून मुक्त झालेला रुग्ण तेवढा जास्त उपयुक्त प्लाझ्मा. त्यामुळे गंभीर आजारातून बरा झालेला पेशंट दुसऱ्याच्या कामी येऊ शकतो. अतिदक्षता विभागातून बरा झालेला रुग्ण हा खूप महत्त्वाचा प्लाझ्मादाता बनू शकतो. एकदा‘ कोरोना’ होऊन गेला की परत होत नाही, असे जगातील तज्ज्ञांना वाटते. यासाठी माकडांवर प्रयोग केले गेले. बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये घशात किंवा नाकात ‘कोरोना’चे विषाणू आढळणे आणि ‘कोविड’ हा आजार यात फरक आहे.

 सच्चा परममित्रच 
‘कोरोना’मुक्त डॉक्‍टर म्हणजे विनातणाव ‘कोरोना’ रुग्णाबरोबर काम करण्याचा परवाना. ‘कोरोना’मुक्त डॉक्‍टर ‘आयसीयु’मध्ये, कोरोना वॉर्डमध्ये काम करण्याची क्षमता असलेला भक्कम आधार. न घाबरता, शांतपणे, संयम न सोडता तुमची सोबत करणारे आधारस्तंभ. ‘कोरोना’मुक्त परिचारिकाही देवताच. याच वॉर्डमध्ये कायम राहून त्या ‘कोरोना’रुग्णांची सेवा करत असतात. या ‘कोरोना’मुक्त परिचारिका रुग्णाची माता, भगिनी, तर कधी मुलगी अशा विविध भूमिका विनातणाव पार पाडतील आणि ‘कोरोना’ला देशातून हद्दपार करण्यात मोलाची कामगिरी बजावतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आर्थिक घडी बसवण्यासाठी...
आता देशाला गरज आहे ती आर्थिक घडी नीट करण्याची. इथेही ‘कोरोना’मुक्त कामाला येऊ शकतात. गेल्या महिन्यात ‘एफएमसीजी’ कंपन्यांनी सरकारकडे कामगारांची मागणी केली होती. ‘एफएमसीजी’ म्हणजे ‘फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्‌स कंपन्या’. याची उदाहरणे- हिंदुस्तान लिव्हर, पार्ले ॲग्रो, ब्रिटानिया, अमूल, गोदरेज, डाबर, इमामी, निरमा, पी अँड जी या खाद्यपदार्थ व इतर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादनासाठी पूर्ण वेळ कामगारांची गरज होती. ‘कोरोना’मुक्त व्यक्ती जी ‘कोरोना’ पसरवणार नाही; तसेच ‘कोरोना’मुळे आजारी पडणार नाही ती या क्षेत्राला नक्कीच लाभदायक ठरेल. अशा रीतीने भारतातील कंपन्या व कारखाने पूर्ण वेळ उत्पादन करू शकले, तर देशात पैसा येईल. 

दुकानदारांना मालपुरवठा करण्याच्या वितरण प्रणालीत काम करणाऱ्या ‘कोरोना’मुक्त माणसांची गरज आहे. ‘कोरोना’मुक्त व्यक्ती मॉलमध्ये सुरक्षारक्षक, कॅशियर, जिममध्ये सुरक्षारक्षक, स्वागतिका अशी कामे करू शकतात. ‘एमआयडीसी’मध्ये आता कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. बरेच कुशल मनुष्यबळ परप्रांतीय होते. आता स्थानिक मनुष्यबळ विकसित केले पाहिजे. अशा व्यक्तींनी म्हटले पाहिजे- जिथे कमी तिथे आम्ही.

‘कोरोना’ आजाराविषयी बऱ्याच दंतकथा येत आहेत. घरी बसून घाबरणारी मंडळी नवीन गोष्टी पसरवत आहेत. लोकांचे मानसिक आरोग्य धोक्‍यात आले आहे. अशावेळी ‘कोरोना’मुक्त लोकच आधार देऊ शकतील. ‘कोरोना’मुक्त व्यक्तींनो, तुमच्या अंगीभूत असणाऱ्या कौशल्याला वाव द्या, खूप कष्ट करा, आणि देशालाच नव्हे, तर जगाला पुनःश्‍च वैभवशाली मार्गावर नेण्यासाठी झोकून द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com