भाष्य : विचारपद्धतीवर आक्रमणाचा धोका

तंत्रज्ञानाच्या शोधांपैकी इंटरनेटचा शोध हा सर्वात क्रांतिकारी आणि सर्वस्पर्शी शोध म्हणावा लागेल.
thinking
thinkingsakal
Summary

तंत्रज्ञानाच्या शोधांपैकी इंटरनेटचा शोध हा सर्वात क्रांतिकारी आणि सर्वस्पर्शी शोध म्हणावा लागेल.

इंटरनेटचा वापर जरी सहज आणि गतिशील असला तरी त्याचा वापर करताना आपल्या नैसर्गिक बौद्धिक क्षमताही टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. विशेषतः एकाग्रता, कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत नाही ना, याविषयी जागरूक राहायला हवे. याचे कारण हा वापर विचारपद्धतीवरच परिणाम करू शकतो.

तंत्रज्ञानाच्या शोधांपैकी इंटरनेटचा शोध हा सर्वात क्रांतिकारी आणि सर्वस्पर्शी शोध म्हणावा लागेल. इंटरनेट हे जगातली सर्वात समृद्ध वाचनालय, सर्वात मोठी बाजारपेठ, इतकेच नव्हे तर सर्वात मोठे मनोरंजनालय बनले आहे. गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स यांनी आपले जीवन व्यापले आहे. एक तृतीयांश जग व्हाट्सअप तर निम्मे जग फेसबुकचा वापर करत आहे. साठ टक्के जग इंटरनेटचा वापर करते आणि दिवसभरात साडेपाच अब्ज गुगल सर्च केल्या जातात, ही गोष्ट चकित करणारी आहे. साहजिकच आहे इंटरनेट जर इतके सर्वव्यापी असेल तर त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम तितकाच सर्वगामी असणार यात शंकाच नाही. आज होणारे संशोधन दाखवते की, इंटरनेटमुळे मानवी समाज ज्याप्रमाणे बदलत आहे त्याप्रमाणे मानवी मेंदू आणि वर्तनपद्धती यांच्यातही बदल घडत आहेत. इंटरनेट मानवाची विचार करण्याची पद्धतीही बदलत आहे. माध्यम अभ्यासक मार्शल मॅकलुहान यांनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, “आपण सुरुवातीला अवजारांना आकार देतो आणि नंतर अवजारेच हळूहळू आपल्याला आकार देऊ लागतात”. इंटरनेटबाबत अगदी तसेच घडत आहे.

इंटरनेट आणि त्याची साधने ही मानवी मेंदू, वर्तन आणि विचार करण्याची पद्धती कशी बदलत आहे, यावर जगभरात भरपूर अभ्यास होतो आहे. त्यासाठीच तर ‘इंटरनेट सायबर सायकॉलॉजी’ नावाच्या मानसशास्त्राच्या नवीन शाखेने जन्म घेतला आहे. या शाखेचे जनक जॉन सुलर यांचे एक ट्विट खूप महत्त्वाचे आहे, ‘‘आपण जर इंटरनेटचा हुशारीने वापर केला नाही तर निश्चितच इंटरनेट आपला हुशारीने वापर करून घेईल, यात शंकाच नाही”. इंटरनेट सायकॉलॉजी क्षेत्रातले संशोधन समजून घेतल्यावर सुलर यांचे विचार पटायला वेळ लागत नाही. इंटरनेटच्या आगमनापूर्वी मोबाइलचा वापर खूपच सीमित होता. पण अँड्रॉइड तंत्रज्ञानामुळे मोबाइलचे रूपांतर टीव्ही आणि संगणक यांच्यातही झाले आहे. साहजिकच त्यामुळे आपला मोबाइलचा वापर प्रचंड वाढला आहे. २०१५चे अमेरिकेतील एक संशोधन आपणाला चकित करणारी माहिती देतं. आपण दिवसांतून किती वेळा इंटरनेट कनेक्शन असणारा मोबाइल पाहत असेल बरे? आपण चक्क २०० वेळा दिवसातून मोबाइल पाहतो. मिनिटांचा हिशेब केला तर पाच मिनिटातून एकदा. पटत नाही ना? आजच्या भारतात असणारा नेटीझनचा मोबाइल पाहण्याचा आकडाही तितकाच असेल. यावरून आपल्या लक्षात येतं की, इंटरनेटने आपला किती ताबा घेतला आहे.

सातत्याने संगणक आणि मोबाइलवर येणाऱ्या नोटिफिकेशन्स, इमेल, हायपरलिंक्स आपण नकळतपणे पाहत राहतो. एकाच वेळी बऱ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे ऑनलाईन असताना अष्टावधानी राहावेच लागते. अष्टावधानी असणे कधीही चांगलेच असते. पण या ऑनलाइन अष्टावधानीपणाचा आपल्या एकाग्रतेवर आणि कार्यक्षमतेवर काय परिणाम होत असेल याचा ओपीर, न्यास आणि वॅग्नर या संशोधकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना असे आढळले की, हे ऑनलाइन अष्टावधानीपण आपल्या गोड समजाच्या विरुद्ध आपल्यावर विपरीत परिणाम करत आहे.

अवधानक्षमता क्षीण

कुन्ह आणि ग्यार्लोनट या संशोधकांना तर आढळून आले की, अशा पद्धतीच्या ऑनलाईन अष्टावधानामुळे आपल्या संकटकाळात ध्येय प्राप्त करण्याच्या क्षमतांवरही विपरीत परिणाम होत आहे. एका अर्थाने आपली होत आहे. या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या विविध ४१ संशोधन अभ्यासाचा सूरही असाच आहे. आपणाला वाटेल या गोष्टी आपण ऑनलाइन असतानाच परिणाम करतात, पण तसे नाही. आपल्या या इंटरनेटसंबंधी ऑनलाईन वर्तणुकीचा परिणाम आपल्या ऑफलाइन वर्तणुकीवरही होत आहे. मानसशास्त्रीय भाषेत याला ‘सायबर मायग्रेशन’ असे म्हणतात. याचा अर्थ असा नाही की, इंटरनेट आपल्या मेंदूवर प्रत्येकवेळी विपरीतच परिणाम करत आहे. पण इंटरनेट आपल्याला एका क्लीकसरशी माहिती शोधून देत असलं तरी त्यामुळे सखोल शोध घेण्याची आपली वृत्ती कमी झाली आहे. निकोलस कार या विज्ञान अभ्यासकाने ‘द शॉलोज’ नावाच्या पुस्तकात इंटरनेट आपल्या वाचण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीत कसा बदल करीत आहे, याचा सखोल मागोवा घेतला आहे. इंटरनेट वापरामुळे आपल्या मेंदूत काही बाबतीत चांगला परिणाम होत असला तरी सखोल अभ्यासाची वृत्ती मंदावत आहे, असा निष्कर्ष संशोधकांना मिळत आहे.

मिशिगन विद्यापीठातील मेंदू शास्त्रज्ञ डेविड मेयेर यांनी आपल्या अभ्यासातून हाच निष्कर्ष काढला आहे. ऑनलाइन आपणाला ‘अष्टावधानी’ बनवत आहे, पण ‘उथळ अष्टावधानी’पण येत आहे. मेरी आयकेन यांचे ‘द सायबर इफेक्ट’ पुस्तकही अशा विविध गोष्टींचा आढावा घेतं. ‘हाऊ गुगल इज चेंजिंग युअर ब्रेन’ या सायंटिफिक अमेरिकन मासिकातील लेखात डॅनियल वेगनर आणि अड्रियन वार्ड या संशोधकद्वयींनी इंटरनेटचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास मांडला आहे. या संशोधनात त्यांना असे आढळले की इंटरनेटचा वापर आपण लोक आता आपल्या माहितीगार सहकाऱ्यांसारखा करत आहोत. एका अर्थाने इंटरनेट आपल्या जीवनाशी इतके रुळले आहे की, ते आपल्या मेंदूची एक्सटर्नल हार्डडिस्कसारखी काम करू लागले आहे. यालाच शास्त्रीय भाषेत ‘गुगल इफेक्ट’ म्हणतात.

स्पॅरो, लुई आणि वेगनर यांनी हे तपासण्यासाठी अनोखा प्रयोग केला होता. त्यांनी प्रयोगातील सहभागी लोकांना ‘शहामृगाचा डोळा हा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो’, सारखी ४० वेगवेगळी वाक्ये वाचून त्यांच्या संगणकात कॉपी करून ठेवायला सांगितले. सहभागी लोकांतील अर्ध्या जणांना संशोधकांनी सांगितले की, तुमची ही वाक्ये संगणकात सेव्ह राहतील आणि राहिलेल्या अर्ध्या जणांना सांगितले की ही वाक्ये डिलीट होतील. नंतर त्यांनी या वाक्यांना सहभागी लोकांना आठवायला सांगितले. ज्यांना संगणकातील वाक्ये डिलीट होतील, असे सांगितले होते त्यांनी ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली होती; तर ज्यांना सेव्ह राहतील असे सांगितले होते त्यांनी ती जवळजवळ लक्षात ठेवलीच नव्हती.

गुगल सर्च इंजिन आपल्या दिमतीला असल्यामुळे ज्या गोष्टी आपणाला गुगलवरून पटकन मिळू शकतात, त्या लक्षात ठेण्याची तसदी आपण घेत नाही. दुसऱ्या एका प्रयोगात संशोधकांना असे आढळले की, इंटरनेट किंवा गुगलमुळे आपण काय लक्षात ठेवायचे यापेक्षा कुठे शोधायचे हे जास्त लक्षात ठेवू लागलो आहोत. इंटरनेटचा वापर जरी सहज आणि गतिशील असला तरी त्याचा वापर करताना आपल्या नैसर्गिक बौद्धिक क्षमताही टिकवून ठेवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. इंटरनेट आपणाला सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवित आहे पण तसे होत असताना आपले मेंदूचे वैयक्तिक न्यूरलनेट कार्यक्षम आणि अबाधित राहील, याची काळजी घेणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे.

(लेखक विज्ञान व तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com