भाष्य : माणसाला ओढ चंद्राची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

orion satellite

पुन्हा एकदा चंद्रावर मानव उतरविण्याचा संकल्प अमेरिकेच्या ‘नासा’ ह्या अवकाश संशोधन संस्थेने सोडला आहे.

भाष्य : माणसाला ओढ चंद्राची

पुन्हा एकदा चंद्रावर मानव उतरविण्याचा संकल्प अमेरिकेच्या ‘नासा’ ह्या अवकाश संशोधन संस्थेने सोडला आहे. ‘आर्टेमिस’ मोहिमेच्या यशामुळे मानवजातीला पृथ्वीजवळच्या व मंगळाकडच्या मोहिमा दीर्घ काळासाठी राबवता येतील. या अभ्यासांतून पृथ्वी, चंद्र व मंगळ या ग्रहांविषयी मोलाची माहिती मिळेल.

पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव उतरविण्याचा घाट अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने घातला आहे. या दिशेने त्यांनी पहिले पाऊल म्हणून ‘आर्टेमिस-१’ नावाच्या मोहिमेचा शुभारंभ तीन दिवसापूर्वी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी केला. पुढील दोन-तीन वर्षांत ‘नासा’ चंद्रावर दोन अमेरिकींना उतरविणार असून त्यापैकी एक महिला असेल. या मोहिमेची तयारी म्हणून पाठविलेल्या आर्टेमिस-१ मोहिमेमध्ये ‘ओरायन’ नावाचे यान असून त्यामध्ये कुठलीही व्यक्ती नसेल. हे यान चंद्राकडे नेऊन चंद्राच्या जवळून प्रवास करून पुन्हा पृथ्वीवर सुखरूपपणे उतरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रयोगानंतर पुढील मोहिमांमध्ये ओरायन यानामध्ये दोन-चार व्यक्तींना पाठविले जाईल.

चंद्रावर माणूस उतरवून अमेरिकेने जुलै १९६९मध्ये इतिहास घडविला. त्यानंतरच्या तीन-चार वर्षांत अमेरिकेने बारा व्यक्तींना चंद्रावर उतरवून चंद्राचे सखोल निरीक्षण केले. खरे पाहता अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरविण्याचा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न काही अंशी राजकीय होता. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केनडी यांना रशियापेक्षा आपण वरचढ आहोत व तंत्रज्ञानात जगात सर्वश्रेष्ठ आहोत हे सिद्ध करावयाचे होते. कदाचित याचमुळे अवघ्या चार वर्षात म्हणजे १९७२पासून नासाने ‘अपोलो’ मोहिमा बंद करून चंद्राकडचे लक्ष काढून घेतले. त्यानंतर एकाही राष्ट्राने चंद्राकडे मानवी मोहीम राबविली नाही. मात्र गेल्या काही वर्षात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया यासारख्या सहा राष्ट्रांनी चंद्राकडे लक्ष वळविले आहे. चंद्रावर माणूस उतरविण्याचा प्रकल्प पुन्हा एकदा राबविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे व त्याचसाठी त्यांनी ९३ अब्ज डॉलर किंमतीचा आर्टेमिस प्रकल्प आखण्यात आला आहे.

अमेरिका जवळजवळ २० वर्षापासून चंद्र व मंगळ ग्रहांकडे मानवी मोहिमा पाठवाव्यात असे म्हणत होती. चंद्राकडे मानवी मोहिमा राबविण्याचा सल्ला ‘नासा’ला २०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. या मोहिमांसाठी शक्तिशाली असे रॉकेट (स्पेस लाँच सिस्टीम) ‘एस.एल.एस.’ व चंद्रावर उतरवण्यासाठी ‘ओरायन’ नावाचे यान बांधण्याची धडपड सुरू झाली. ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने ‘ओरायन’च्या निर्मितीची जबाबदारी घेतली. अमेरिकेने जवळजवळ सहा वर्षांच्या मेहनतीनंतर जगातले सर्वात मोठे व शक्तिशाली असे एस.एल.एस. (रॉकेट) तयार केले. या पस्तीस मजली (१०० मीटर) उंचीच्या रॉकेटमध्ये द्रवरूप हायड्रोजन व द्रवरूप ऑक्सिजन म्हणून इंधन असून दोन सॉलिड बूस्टर व चार मोटर बसविलेल्या आहेत. या रॉकेटच्यावर ओरायन यान बसविलेले असून त्यामध्ये एकावेळी चार अवकाशयात्री प्रवास करू शकणार आहेत.

अपोलो यानापेक्षा ओरायन यान मोठे, एैसपैस व अत्याधुनीक यंत्रणेने सज्ज आहे. ते ७,७०० किलो वजनाचे व १५ मीटर लांबी रुंदीचे आहे. ‘आर्टेमिस’ सहा वर्षापूर्वीच अंतराळात झेपावणार होते. मात्र तांत्रिक, आर्थिक व राजकीय अडथळ्यांमुळे ही मोहीम लांबत गेली व अखेरीस आर्टेमिस-१ यावर्षी १७ मार्च रोजी फ्लोरीडा मधील ‘केनडी स्पेस सेंटर’च्या प्रक्षेपणस्थळावर दाखल झाले. सर्व चाचण्यानंतर ऑगस्टमध्ये होणारे यानाचे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलले गेले. तर सप्टेंबरमधील प्रक्षेपण खराब वातावरणामुळे रद्द करून चार नोव्हेंबरचा मुहूर्त ठरविला गेला. मात्र या काळात पुन्हा एकदा एका वादळामुळे प्रक्षेपण लांबले व १६ नोव्हेंबरला ते निश्‍चित करण्यात आले. प्रक्षेपणाच्या अगोदर तीन तास इंधन गळती दिसली. मात्र तत्काळ दुरूस्तीमुळे प्रक्षेपणास हिरवा कंदील दाखविला गेला व पन्नास वर्षापूर्वीच्या अपोलो-१७ च्या मोहिमेनंतर प्रथमच चांद्रमोहिमेची सुरूवात झाली.

चांद्रमोहिमेची गोष्ट

केनडी स्पेस सेंटर मधील ३९बी लाँच कॉम्प्लेक्स मधून आर्टेमिस-१ चे प्रक्षेपण भारतीय वेळेप्रमाणे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१७ वाजता झाले. जगातील सर्वात मोठ्या व शक्तिशाली एस.एल.एस. अग्नीबाणाने अवघ्या ९० सेकंदांत पृथ्वीचे वातावरण पार करून आठ मिनिटांत यानास हव्या त्या पृथ्वीच्या कक्षेत नेले व रॉकेटचा पहिला टप्पा गळून पडला. पृथ्वीच्या कक्षेत गेल्यावर यानावरचे सौरपंख (सोलर पॅनेल) उघडले गेले. उड्डाणानंतर अवघ्या अर्ध्या तासात चंद्राकडच्या प्रवासाच्या मार्गावर योग्य रितीने पोहोचण्यासाठी यानावरील इंजिन प्रज्वलित केली गेली व पुढील काही मिनिटातच रॉकेट ‘ओरायन’पासून वेगळे झाले व यान चंद्राच्या प्रवासास मार्गस्थ झाले. आता ही २५ दिवस ११ तासांची चांद्रमोहीम खऱ्या अर्थाने सुरू झाली. पुढील पाच दिवसात यान चंद्राच्या परिसरात पोहोचेल. प्रक्षेपणानंतर नऊ तासांनी ९२ हजार कि.मी. अंतरावर यान पोहोचले. यावेळी त्याने एक छानसा ‘सेल्फी’ घेऊन पृथ्वीकडे पाठविला. यामध्ये पृथ्वीचा काही भागही स्पष्टपणे दिसत होता. आता यान ताशी ८,८०० कि.मी.वेगाने चंद्राकडे झेपावत होते.

प्रक्षेपणानंतर सहाव्या दिवशी ओरायन चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या १०० कि.मी.उंचीवरून चंद्राच्या पाठीमागील भागाकडे झेपावून ६४ हजार कि.मी.दूर जाईल. यापूर्वी कुठल्याही मानवी मोहिमेत यान इतके दूर गेले नव्हते. चंद्राभोवतालची दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर यान परतीच्या प्रवासास निघेल. यावेळी यानाचे इंजिन प्रज्वलीत करून चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जावून त्याच्या गुरूत्वाकर्षणाचा फायदा घेऊन यान पृथ्वीकडे फेकले जाईल. अवघ्या आठवड्याभरात यान पृथ्वीच्या परिसरात पोहोचेल. यावेळी यानाचा वेग ताशी ४० हजार कि.मी.वरून ४८० कि.मी.एवढा कमी होईल. पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील घर्षणामुळे यानाचा बाह्य पृष्ठभाग तापून २७६० सेल्सीअस एवढा उष्ण होईल. उष्णता विरोधक कवचामुळे यानाचा अंतर्भाग न तापता सुरक्षित राहील. समुद्रापासून २५ हजार फूट उंचीवर यान पोहोचल्यावर पॅराशूट उघडली जाऊन यानाचा वेग झपाट्याने कमी होऊ लागेल व ते अलगदपणे प्रशांत महासागरामधील ठरलेल्या ठिकाणी समुद्रात पडेल. नौदलाच्या पाणबुड्यांच्या सहाय्याने यानाला सुरक्षितरीत्या पाणबुडीला बांधले जाईल व नंतर ते ‘केनडी स्पेस सेंटर’ मध्ये तपासणीसाठी नेले जाईल. थोडक्यात आर्टेमिस मोहिमेत यान जवळजवळ २१ लाख किलोमीटर अंतराळ प्रवास करेल. या मोहिमेचा कालावधी २५ दिवस ११ तास ३६ मिनिटांचा असून या मोहिमेच्या यशावर चांद्रमोहिमेचा पुढील कार्यक्रम अवलंबून असेल.

‘नासा’चे शास्त्रज्ञ आर्टेमिस-२ मोहीम २०२४मध्ये राबविणार असून त्यावेळी चार अवकाशयात्रींना घेऊन ‘ओरायन’ चंद्राला प्रदक्षिणा घालून परत येईल. आर्टेमिस-३ मोहीम २०२५ मध्ये राबविली जाईल व त्यात एका महिला अवकाशयात्रीला चांद्रमोहिमेत सहभागी करून घेतले जाईल व ती चंद्रावर उतरेल. इतिहासात प्रथमच एक महिला चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याने साऱ्या जगाचे लक्ष या मोहिमेकडे वेधले जाईल. यावेळी ओरायन चंद्राच्या दक्षिण ध्रुव परिसरात उतरविले जाईल. या भागात पाणी सापडल्याची निरीक्षणे काही यानांनी केली असल्याने भावी मंगळ मोहिमेसाठी पाणी व प्राणवायू या भागातून नेता येईल, असे काही शास्त्रज्ञ म्हणत आहेत. तर चंद्रावर मानवी तळ उभारण्यासाठी हीच जागा योग्य असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. आर्टेमिस मोहिमेच्या यशामुळे मानवजातीला पृथ्वीजवळच्या चंद्र व मंगळाकडच्या मोहिमा दीर्घ काळासाठी राबवता येतील. या अभ्यासातून पृथ्वी, चंद्र व आपल्या शेजारी असलेला मंगळ या ग्रहांविषयी मोलाची माहिती मिळेल, हे निश्‍चित.