व्रतस्थ सेवाव्रती

राज्यभरातील दुर्लक्षित मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुणे येथील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गौरव घोडे व त्यांचे सहकारी १५ वर्षांपासून व्रतस्थ, निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करीत आहे.
pune
punesakal

राज्यभरातील दुर्लक्षित मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुणे येथील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गौरव घोडे व त्यांचे सहकारी १५ वर्षांपासून व्रतस्थ, निस्वार्थ भावनेने सेवाकार्य करीत आहे. एवढेच नाही तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी भाविकांसाठी अन्नदानासह धार्मिक उपक्रम राबविले जातात. त्यात चंपाषष्ठी (खंडोबाचे घट) गणपूजन, सोमवती सोहळा, पादुकापूजन सोहळा, चंदनउटी, हेगडे प्रधान महाराज मंदिरात जागरण गोंधळ व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

-अनिल भाले, छत्रपती संभाजीनगर

डॉ. गौरव घोडे हे वेंकीज या कंपनीत नोकरीस आहेत. काही मंदिराची स्थिती पाहून भाविक नाराज होतात आणि मंदिराच्या दुरुस्तीबाबत, डागडुजीबाबत मत मांडतात. मात्र डॉ. घोडे आणि त्यांचे सहकारी सेवाकार्यासाठी सरसावतात. राज्यात कुठेही पुरातन मूर्ती, स्वयंभू शिवलिंगाचा वज्रलेप असो की मंदिराचा गाभारा असो नूतनीकरणासाठी श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे सेवक सेवाभावी वृत्तीने निः शुल्क काम करतात. धार्मिक श्रद्धास्थानांचा हा वारसा जतन व्हावा, नव्या पिढीपर्यंत आध्यात्मिक विचारांची पेरणी व्हावी यासाठी प्रतिष्ठानचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

त्यांचे हे कार्य केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता कर्नाटकापर्यंत विस्तारले आहे. श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानने आजपर्यंत खंडोबांच्या (मल्हार) बारा मंदिरांपैकी सात ते आठ मंदिरातील मूर्ती व शिवलिंगाला वज्रलेप करून त्याचे संवर्धन केले आहे. या सेवाकार्याचा हा वारसा आजी-आजोबा, आई-वडिलांमुळेच मिळाल्याचे गौरव घोडे सांगतात. ११ जानेवारी १९८९ रोजी अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

यादरम्यान वडील पोपट नारायण घोडे हे पुण्यात राहण्यास आले. गरिबीमुळे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. त्यांच्या आजीने अनंत अडचणींवर मात करत कुटुंबाचे पालनपोषण केले. वडील धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने लहानपणापासून घोडे यांच्यावर आध्यात्मिक संस्कार झाले. मंदिराला पूर्ववैभव मिळावे, असे त्यांना मनोमन वाटायचे. या तळमळीतून त्यांनी प्राचीन मंदिराच्या डागडुजीचे आणि वज्रलेपाचे कार्य सुरू केले.

मूर्तीच्या वज्रलेपाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसले तरी त्यांनी जुन्या जाणत्या आणि पुरातत्त्व खात्यातील निवृत्त लोकांकडून माहिती गोळा केली आणि वज्रलेपात कोणकोणते घटक असतात याचे आकलन करून लेप तयार करण्यास सुरुवात केली. या लेपमुळे मूर्तीला काही प्रमाणात पूर्वरूप येण्यास मदत मिळते आणि त्याचे पारंपरिकरीत्या जतन केले जाते. डॉ गौरव घोडे हे नोकरी करून मंदिरांच्या जतन, संवर्धनाचे कार्य नेटाने पुढे नेत आहेत. या कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यात इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार, अमेरिकेतील आयईएमएस युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट, भारत सन्मान निधी पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार, प्रथम जेजुरीभूषण पुरस्कार, संभाजीनगर भक्तभूषण पुरस्कार आदींचा समावेश आहे.

वज्रलेपन कसे होते?

डॉ. गौरव घोडे यांनी वज्रलेपनाच्या सांगितलेल्या प्रक्रियेनुसार, इपाक्सिरेझीन रसायन, हार्डनर आणि शंखजीरा पावडर (मोत्याचा चुरा) हे तीन घटक एकत्रित करण्यात येतात आणि विशेष उपकरणाच्या मदतीने वज्रलेप केला जातो. यामुळे मूर्तींचे, शिल्पाचे संगोपन आणि संवर्धन होते.

आजवरची काही सेवाकार्य

  • जेजुरी येथील कऱ्हा नदीवरील रमाई मातेच्या मंदिरातील मूर्तींचा वज्रलेप व जीर्णोद्धार.

  • कडेपठारावरील हेगडे प्रधानमंदिरास शेड उभारून बानू आईचे मंदिर व मूर्तींना वज्रलेप.

  • निमगाव धावडी येथील स्वयंभू पंचलिंगेश्वर मंदिराला रंगरंगोटी व वज्रलेप.

  • सातारा (छत्रपती संभाजीनगर) येथील खंडोबा मंदिरास दोन टन वजनाचा नंदी अर्पण करून मूर्तींना वज्रलेप.

  • चंदनपुरी येथे नदीच्या प्रवाहातील स्वयंभू शिवलिंगास वज्रलेप करून जीर्णोद्धार.

  • सोलापूर येथील बाळे खंडोबा शिवलिंग गणपती मंदिर, हनुमान मंदिरातील व नंदीच्या मूर्तीस वज्रलेप.

  • नेवासा येथील म्हाळसा आईचे गावातील खंडोबा मंदिर व मंदिरातील मूर्तींना वज्रलेप.

  • आळंदी येथील संतश्रेष्ठ निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई या भावंडांचा सांभाळ करणाऱ्या संत भोजलिंगकाका यांच्या समाधी मंदिरातील गाभारा, श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींना वज्रलेप करून मंदिराचे नूतनीकरण.

कोणत्याही स्वयंभू मूर्तींची अवहेलना, अवमान, दुरवस्था होऊ नये याबाबत पुरातत्त्व खात्याने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही ती कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.

-डॉ.गौरव घोडे, अध्यक्ष, श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com