'जय विज्ञान'चा उद्‌घोष करणारे अटलजी

डॉ. रघुनाथ माशेलकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच.

अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच.

अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता, एक संदेश होता. म्हणून ते चिरंतन आहेत आणि राहतील. अटलजी पंतप्रधान असताना मी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सी.एस.आय.आर) च्या राष्ट्रीय प्रयोगशाळांचा प्रमुख होतो. अटलजी पंतप्रधान या नात्याने सी.एस.आय.आर. सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी त्यांना जवळून पाहिल आहे.

अटलजींच्या पाठिंब्यामुळे सी.एस.आय.आर. या संस्थेत मी आमूलाग्र बदल करू शकलो. डॉ. जयंत नारळीकरांच्या "सायंटिफिक एज' या 2003मध्ये लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी 20व्या शतकातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण अशा 10 पराक्रमांची यादी केली आहे. त्यांत रामानुजन, साहा, एस. एन. बोस, रमण, रामचंद्रन या शास्त्रज्ञांशिवाय हरितक्रांती, अणुऊर्जा, अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख केला आहे. पण दहावी घटना आहे मी सी.एस.आय.आर.चा महासंचालक असताना त्या संस्थेचं झालेलं परिवर्तन. त्यासाठी मला कठोर निर्णय घ्यावे लागले. काही प्रयोगशाळा बंद कराव्या लागल्या. या संस्थेच्या इतिहासात हे प्रथम घडलं. केवळ गुणवत्तेलाच महत्त्व व प्राधान्य दिलं. परिणामी, अनेक गटांकडून विरोध झाला. पण अटलजी माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. म्हणूनच या परिवर्तनाचं सर्व श्रेय मी त्यांना देतो.

अटलजींचा माझ्यावर खूप विश्वास होता. काही कठीण समस्या आल्या की "माशेलकर समिती' नेमा असं ते सांगत. "नॅशनल ऑटो फ्युएल पॉलिसी' असो की "रीजनल इंजिनीरिंग कॉलेजेस'मध्ये परिवर्तन करून "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी' करणं असो, भारताची औषधनियंत्रणविषयक यंत्रणा बदलायची असो, की भारताच्या पेटंट कायद्यात बदल करायचा असो, या सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी माशेलकरच हवेत असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. तीन जानेवारी 2000 रोजी अटलजींनी इंडियन सायन्स कॉंग्रेसचं पुण्यात उद्‌घाटन केलं.

जवळ जवळ पाच हजार शास्त्रज्ञ त्याला हजर होते. नोबेल विजेते शास्त्रज्ञ आले होते. डॉ. कलामांसारखे शास्त्रज्ञही आले होते. पुण्यातील त्या सायन्स कॉंग्रेसची अजून लोक आठवण काढतात. या सभेत अटलजींनी एक अत्यंत प्रेरणादायी घोषणा केली. "जय जवान, जय किसान,जय विज्ञान' तेव्हा सर्व सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अटलजींच्या मनातील ही खंत दूर करणं, त्यांना अभिप्रेत असलेला सन्मान पुन्हा शिक्षकांना मिळवून देणं किंवा तसा सन्मान समाजाने शिक्षकांना द्यावा अशा क्षमतेचे अध्यापक घडवणं ही त्यांना वेगळी आदरांजली ठरेल.

माझं अध्यक्षीय भाषण होतं "नवं पंचशील ः नव्या सहस्रकासाठी'. ते पंचशील होतं बालकेंद्रित शिक्षण, स्त्रीकेंद्रित परिवार, मानवकेंद्रित विकास, ज्ञानाधिष्ठित समाज आणि नवसर्जनशील भारत. बालकेंद्रित शिक्षणाचा मुद्दा मांडताना मी माझ्या मुंबईतील युनियन हायस्कूलमधील भावे सरांनी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख केला आणि त्यामुळे माझं सार आयुष्य कसं बदललं याबद्दल बोललो होतो. उद्‌घाटनाचा समारंभानंतरच्यावेळी भोजन होतं. त्या वेळी अटलजींबरोबर मी आणि दोन नोबेलविजेते असे आम्ही एकत्र होतो. प्रोफेसर मेनन, डॉ. कलाम, शरदराव पवार होते. माझ्या भाषणातील भावे सरांच्या नावाचा उल्लेख सर्वांना भावला. पण नोबेल विजेते लेन व अर्नस्ट म्हणाले, की असे शिक्षक युरोपमध्येही दिसत नाहीत. अटलजी माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले, "माशेलकरजी, आपको पता है, की आजकल "भावे सर' क्‍यों नहीं दिखते हैं?' मी म्हटलं, "नही सर'. तेव्हा अटलजीं म्हणाले, "क्‍योंकी आज उनको समाजमें प्रतिष्ठा नहीं है'. केवढे अर्थपूर्ण उद्‌गार होते ते ! नंतर मला कळलं, की अटलजींचे वडील शिक्षक होते. म्हणजे हे अनुभवाचे बोल होते.
अटलजींची एक दुसरी आठवण आहे. 11 मे 1998 रोजी सी.एस.आय.आर.च्या प्रयोगशाळा प्रमुखांची बंगलोरमध्ये वार्षिक परिषद होती. त्याच दिवशी एन. ए. एल. या आमच्या प्रयोगशाळेने तयार केलेल्या चारआसनी "हंसा' विमानाचं पहिलं उड्डाण झालं. दुपारी बातमी आली, की संरक्षण संशोधन व विकास संघटनेने "त्रिशूल' या क्षेपणास्त्राचं पहिलं उड्डाण केलं होतं आणि संध्याकाळी बातमी आली, की पोखरणमध्ये भारताने अणुचाचणी घेतली. त्यानंतर जूनमध्ये अटलजींच्या हस्ते दिल्लीत शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक वितरणाचा समारंभ झाला. मी व डॉ. मुरली मनोहर जोशी अटलजींच्या उजव्या व डाव्या बाजूला बसलो होतो. आम्ही दोघांनी अटलजींना भारताने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचं महान प्रदर्शन एकाच दिवसात 11 मे रोजी कसं घडलं हे सांगितलं. आम्ही त्यांना सुचवलं की आपण 11 मे हा "टेक्‍नॉलॉजी डे' म्हणजे "तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा करूया. त्या वेळी त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ते भाषण करायला उठले. आपलं भाषण वाचलं, कागद खाली ठेवले. आणि त्यांनी 11 मे हा "टेक्‍नॉलॉजी डे' म्हणून घोषित केला. गेली वीस वर्षे हा दिवस साजरा होतो आहे. यात विशेष म्हणजे त्यांनी आपला आतला आवाज ऐकून मंत्रिमंडळ बैठकीत ही उत्स्फूर्तपणे घोषणा केली.
कार्यक्रम संपल्यानंतरच्या मोकळ्या वेळात अटलजी माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले, "अणुचाचणी झाल्यावर अमेरिका लगेच तंत्रज्ञानावर निर्बंध आणतील. काही निवडक उपकरणांवरही ते बंधने आणतील. त्याचा आपणा सर्व शास्त्रज्ञांवर काय परिणाम होईल?' मी त्यांना म्हटलं "सर, अमेरिकेने काहीही निर्बंध घालू देत. जोपर्यंत आम्ही शास्त्रज्ञ आमच्या मेंदूवर निर्बंध घालत नाही तोपर्यंत अमेरिका आपलं काही बिघडवू शकत नाही.' अटलजी जोरात हसले. थांबले. माझा हात आपल्या हातात घेऊन म्हणले "शाब्बास. माशेलकरजी. याच भावनेने आणि ऊर्जेने तुम्ही काम केलंत तर भारताला काहीच चिंता नाही.'

तिसरा प्रसंग मला आठवतो तो 26 सप्टेंबर 2003चा. हा सी.एस.आय.आर.चा साठावा स्थापना दिवस होता. सी.एस.आय.आर.ने एक पानभर अगदी वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात दिली होती. सबंध मोकळं पान. त्यावर फक्त एका बोटाचा फोटो. त्या बोटावर होता, मतदान केल्यावर लावलेल्या काळ्या शाईचा ठिपका. शाईचं तंत्रज्ञान तयार केलं होतं आमच्या एनपीएल या प्रयोगशाळेनं. त्या पानावर एक वाक्‍य होतं.

"सी.एस.आय.आर.'चं तंत्रज्ञान कोट्यवधी भारतीय मतदारांच्या बोटावर.' अटलजींनी ही जाहिरात त्या दिवशीच्या वृत्तपत्रांत सकाळी पहिली होती आणि ती त्यांना फार आवडली होती. याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. त्यांनी त्यांचं वाचायला दिलेलं भाषण बाजूला ठेवलं आणि "तंत्रज्ञान व लोकशाही' या विषयावर उत्स्फूर्त भाषण केलं. माझ्या आयुष्यात ऐकलेलं हे एक सर्वोत्तम भाषण म्हणेन. तीन वेगवेगळ्या दिवसांत पाहिलेली प्रेरणादायी, त्यांच्यासारखीच अगदी अटल अशी ही रूपं
आजही डोळ्यांसमोर लख्खपणे येतात. म्हणूनच मला वाटतं, अटलजी कायम आपल्यात आहेत !
मी पाहिलेली अटलजींची ही रूपं. उत्स्फूर्त. निर्मल. संवेदनशील. भावपूर्ण. प्रेरणादायी नि अटल.

Web Title: dr raghunath mashelkar write atal bihari vajpayee article in editorial