भाष्य : पाकिस्तानी ‘जिहाद’ची फळे

क्वेट्टा ः हल्ल्यात बळी पडलेल्या शियापंथी हजारा समाजातील खाण कामगारांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान इम्रान खान यांनी भेट घेतली.
क्वेट्टा ः हल्ल्यात बळी पडलेल्या शियापंथी हजारा समाजातील खाण कामगारांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान इम्रान खान यांनी भेट घेतली.

पाकिस्तानात खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया कधी सुरूच झाली नाही. तेथे लोकशाही विकसित होऊ शकली नाही. त्यामुळे तो देश छिन्नविच्छिन्न राष्ट्रवादाच्या संघर्षात अस्तित्व टिकविण्याच्या धडपडीत असल्याचे दिसते. 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि ‘लष्कर-ए तय्यबा’चा म्होरक्‍या झाकीउर रेहमान लखवी याला पाकिस्तानाच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कैद सुनावल्याची बातमी आली खरी; पण भारताचा त्यावर विश्वास नाही. याचे कारण, भारताने अनेक वेळा ठोस पुरावे देऊनदेखील पाकिस्तान सरकारने २००८ पासून आजपर्यंत या दहशतवाद्यांना अभय दिले. मधल्या काळात पाकिस्तान सरकारने अनेक वेळा लखवीला अटक केल्याचे नाटक केले आणि सबळ पुराव्याअभावी लगेच जामिनावर सोडले. अमेरिकेने मात्र पाकिस्तानच्या या निर्णयाचे स्वागत केले, याचे कारण अमेरिकेचे हितसंबंध पश्‍चिम आशियातील आर्थिक आणि सामरिक सुरक्षिततेशी निगडित आहेत. उर्वरित जगातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

लखवीला शिक्षा सुनावतानाच पाकिस्तानी न्यायालयाने राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतील ‘जैशे-ए-मोहम्मद’चा प्रमुख अझर मसूद आणि पुलवामा हल्ल्यात ४० जवानांना हुतात्मा होण्यास कारणीभूत असणाऱ्या या दहशतवाद्यास  न्यायालयापुढे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा त्याला फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले जाईल, असे ठणकावले. पाकिस्तानच्या या तथाकथित ठोस कृतींचा संबंध भारताशी आहे का? तर अजिबात नाही. ‘जिहाद’च्या नावांखाली पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करून दहशत निर्माण केली, हे आरोप आहेत. परिणामी, पाकिस्तानातील जे उरलेसुरले नागरी जीवन आहे, त्यालाच या ‘जिहादी’ संघटनांनी ‘खो’ घातला. तो कसा, याचा मागोवा घ्यायला हवा. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘द्विराष्ट्रवाद सिद्धांता’वर अखंड भारताची फाळणी करून धर्मावर आधारित पाकिस्तानची निर्मिती हे मोहम्मद अली जिना यांचे स्वप्न पूर्ण झाले , मात्र त्याच धर्माच्या नावाखाली पाकिस्तानी समाज भरडला जात असल्याचे दिसते. पाकिस्तानची ओळख इस्लामिक कट्टरपंथीय दहशतवाद्यांचा अड्डा अशी झाली आहे. एवढेच नाही तर एक तृतीयांश पाकिस्तानवर या कट्टरपंथीयांचे वर्चस्व असून येथील कायदा आणि घटनात्मक नियमांची राजरोसपणे पायमल्ली होत आहे. ‘जिहाद’च्या नावाखाली इस्लामअंतर्गत अल्पसंख्यांकांच्या कत्तली होत आहेत. जिना यांना अपेक्षित असणारी पाकिस्तानातील राजकीय संस्कृती अशी नव्हती. त्यांना देशाला आधुनिक वळणावर न्यायचे होते. परिणामी पाकिस्तानाच्या राजकीय व्यवस्थेत विविध बदल होत गेले असले तरी, म्हणजे लोकशाही असो की लष्करी हुकूमशाही; राज्यकर्त्यांनी प्रारंभीच्या काळात सत्ता मिळविण्यासाठी धर्माचा वापर केला गेला, असे म्हणता येणार नाही.

मात्र लष्कराची भूमिका काहीवेळा निर्णायक होती. जनरल आयुबखान यांनी शहरी आणि ग्रामीण समाजजीवनाचे एकात्मीकरण करण्यासाठी आणि त्यासाठी ग्रामीण भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी  ‘बेसिक डेमोक्रसी’ ची संकल्पना अमंलात आणली आणि त्यासाठी लष्कराची मदत घेतली. अशाच प्रकारे लष्करप्रमुख राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांनी पाकिस्तानात २३ वर्षांनी निवडणुका घेऊन तेथील राजकीय संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आलेले झुल्फिकार अली भुत्तो यांनीदेखील सत्ता मिळविण्यासाठी आणि नंतर ती टिकविण्यासाठी राजकीय षडयंत्र आणि कुभांडे रचली होती. परिणामी,१९७७ मध्ये लष्करप्रमुख  झिया-उल-हक यांनी लष्करी उठाव करून पाकिस्तानात ‘मार्शल कायदा’ आणला आणि भुत्तोंना कैदेत टाकले. नंतर फासावर लटकावले. अशा या जुलुमी लष्करी हुकुमशहा जनरल झियांनी जगाला पाकिस्तानची ओळख पहिल्यांदाच ‘इस्लामिक गणराज्य’ अशी करून दिली. याच काळात पाकिस्तान, अमेरिका, चीन आणि सौदी अरेबिया एकत्र आले आणि अफगाणिस्तानमधील सोविएत संघाच्या हस्तक्षेपास त्यांनी विरोध केला.

‘भूत’ बाटलीबाहेर 
अफगाणिस्तानातील तालिबानी संघटनांना हाताशी धरून विशेषतः पाकिस्तानने अमेरिकेच्या मदतीने सोव्हिएतच्या विरोधात ‘जिहाद’ पुकारला. १९८१मध्ये पाकिस्तानने ‘जिहाद’च्या निमित्ताने निर्माण केलेलं हे बंद बाटलीतील भूत आज त्यांच्याच मुळावर उठलं आहे. याला प्रतिबंध करणे पाकिस्तानच्या आवाक्‍याच्या बाहेर आहे.शिवाय आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला देश अशीही पाकिस्तानची ओळख निर्माण झाली आहे.

‘जिहाद’च्या नावाने अनेक दहशतवादी संघटनांनी आपल्या उपद्रव मूल्याचा दुष्प्रभाव वाढत आहे हे लक्षात येताच त्यांची संख्या आणि व्याप्ती चढत्या क्रमाने वाढवत नेली. आशिया, युरोप आणि अमेरिका खंड तसेच गैरइस्लामी देशांतून इस्लामच्या नावावर दहशतवादाचा उच्छाद मांडला. पुढे जाऊन या तालिबानी संघटनांनी आपापल्या देशाशी नाळ जोडून आपल्या दहशतवादी कारवाया तीव्र केल्या, जेणेकरून स्थानिक सरकार किंवा जनता यांचा पाठिंबा मिळविणे सोपे झाले. त्यामुळे दहशतवादी कृत्यांचे परिमाण बदलले. व्यूहरचना, आणि लक्ष्य यांच्यात बदल होत गेला. ‘इस्लामिक जग’ आणि ‘गैर-इस्लामिक जग’ अशी जगाची विभागणी झाली. धार्मिक सौहार्द कमी होऊन एकमेकांच्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल आकस निर्माण झाला. यातच काही प्रगत आणि अप्रगत मुस्लिम राष्ट्रांनी जिहादी संघटनांचा सोयीप्रमाणे वापर करून त्याचे व्यावसायिकरण केले. यात प्रामुख्याने पाकिस्तान होता.

पाकिस्तानने खतपाणी घालून वाढवलेल्या या विषवृक्षाचे अक्राळविक्राळ रूप बघितले ते लाहोरमधील अहमदिया मशिदीत नमाज पडणाऱ्या निरपराधांवर २८ मे २०१० रोजी बेछूट गोळीबार झाला त्यावेळेस. २०१४ मध्ये ‘तेहरिकी-इ-तालिबान पाकिस्तान’ने पेशावर येथे लष्करी शाळेत गोळीबार करून १४४ मुले आणि शिक्षकांना ठार केले. तर २०१६च्या प्रारंभी जिहादीनी बाच्छा विद्यापीठात २३ तरुण-तरुणींना मारले. कारण काय तर, या शाळा-महाविद्यालयांतून पाश्‍चिमात्य शिक्षण दिले जाते. स्वात खोऱ्यातील अनेक शाळा या जिहादीनी उद्‌वस्त केल्या.  दिवसागणिक वाढणारे तालिबानचे अत्याचार आणि क्रौर्य यामुळे पाकिस्तान जेरीस आले आहे. 

पाकिस्तानात खऱ्या अर्थाने राष्ट्र-निर्मितीची प्रक्रिया कधी सुरू झालीच नाही, किंवा त्यासाठीचे पोषक घटक आणि लोकशाही विकसित न होऊ दिल्यामुळे पाकिस्तान छिन्नविच्छिन्न राष्ट्रवादाच्या संघर्षात स्वत:चे अस्तित्व नामशेष होईल की काय या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. म्हणूनच की काय, पाकिस्तानचा इस्लामिक राष्ट्रवाद जिवंत ठेवण्यासाठी ते नेहमी भारतविरोधी भावना भडकवून छुपे युद्ध करण्याचा मार्ग अवलंबतात. धार्मिक राष्ट्रवादावर आधारित कोणत्याही देशाचा ऱ्हास हा अशाच पद्धतीने होत असतो, हे समजण्यासाठी पाकिस्तानसारखे दुसरे कोणते उदाहरण असू शकेल ?
(लेखक मुंबई विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय संबंध व सामरिक अध्ययन’ विभागाचे संचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com