शाहू महाराज : आपत्ती व्यसस्थापनचा मानदंड

डॉ. रमेश जाधव 
शुक्रवार, 26 जून 2020

कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार हाती घेण्यापूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची कधी पायी,तर कधी घोड्यावरून पाहणी केली होती.शिरोळ, गडहिंग्लज,गारगोटी भागात ते हिंडले होते

"नायक हा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत नायक असतो', असे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाइन यांनी म्हटले आहे. हे विधान राजर्षी शाहू छत्रपतींना तंतोतंत लागू पडते. कारण कोल्हापूर संस्थानात 1896 ते 1899 च्या दरम्यान दुष्काळ आणि प्लेग या संकटांशी शाहू छत्रपतींनी जो अपूर्व लढा दिला, त्यावरून त्यांचे आपत्तीकाळातील व्यवस्थापन कौशल्य लक्षात येते, तसेच त्यांचे जन्मसिद्ध नायकत्वही समजते. शाहू महाराजांच्या आजच्या जयंतीनिमित्त. 

दोन एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार समारंभपूर्वक हाती घेतला आणि खऱ्या अर्थाने ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती बनले. या प्रसंगी लोकमान्य टिळकांनी "केसरी'मध्ये "करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग' असा अग्रलेख लिहून छत्रपतींना शुभेच्छा दिल्या होत्या. कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार हाती घेण्यापूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची कधी पायी, तर कधी घोड्यावरून पाहणी केली होती. शिरोळ, गडहिंग्लज, गारगोटी भागात ते हिंडले होते. शाहू छत्रपतींनी केवळ दोन वर्षांत संस्थानची भ्रष्टाचारी प्रशासनव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. लोकांच्या सर्वंकष कल्याणाचा राज्यकारभार सुरू झाला. लोकांना सुलतानी संकटाची कोणतीच भीती आता उरली नव्हती. लोक सुखसमाधानात राहू लागले होते. तोच संस्थानमध्ये अस्मानी संकट उभे राहिले. 1896 चा पावसाळा पूर्ण कोरडा गेला. जमिनी उन्हाने करपून निघाल्या. जमिनीला भेगा पडू लागल्या. शेतातील झाडे-झुडपे वाळू लागली. नदी-नाले, तळी आणि विहिरींत पाण्याचा थेंबही दिसेना. दीनवाण्या चेहऱ्यांनी लोक वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून आराधना करू लागले. परंतु वरुणराजा प्रसन्न झाला नाही. शेठ-सावकार, इनामदार आणि इतर अभिजनांच्या ऐषआरामी जीवनाला कसलाच धोका या दुष्काळाने पोचला नाही, परंतु सर्वसामान्य जनता भरडून निघाली. शेतकऱ्यांच्या घरातील धान्यांचे साठे संपून गेले. पोटासाठी लोक चोऱ्यामाऱ्या करू लागले. शेतकऱ्यांना जीव की प्राण असणारी जनावरे टाचा घासून त्यांच्या डोळ्यांदेखत प्राण सोडत होती. जगण्यासाठी लोकांचे जथ्थेच्या जथ्ये भरल्या डोळ्यांनी पांढरीचा निरोप घेऊन आपले गावे सोडत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दुष्काळामुळे धान्यांच्या किमती आकाशाला भिडल्या. एक मणाचे पोते आधी एक रुपया 14 आण्यांना मिळत होते, तेच पोते आता चार रुपयांना विकले जात होते. पावणेतीन रुपयांना मिळणारे गव्हाचे पोते साडेचार रुपये भावाने मिळू लागले. साडेतीन रुपये मण असणारा तांदूळ साडेचार रुपये मण झाला. 

राजर्षी शाहूंना या अस्मानी भयानक संकटाचे गांभीर्य लक्षात येताच ते प्रजेला धीर देण्यासाठी कधी पायी, तर कधी घोड्यावरून मोजके अधिकारी बरोबर घेऊन दुष्काळी भागात फिरू लागले. दीनवाण्या शेतकऱ्यांना धीर देऊ लागले. दुष्काळाच्या करुण कथा राजांच्या जिवाचे पाणी पाणी करीत होत्या. मग दुष्काळावर मात करण्याच्या जिद्दीने ते त्यावर उपाय करण्याच्या कामाला लागले. 

शाहू छत्रपतींनी यासंबंधी पुढील उपायांची तत्काळ अंमलबजावणी केली. 

1) भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, साठेबाजी करणारे व्यापारी-शेठजी आणि देवाधर्मांचा बागलबुवा दाखवून लुटणारे पुरोहित यांच्या गैरवर्तनाला आळा बसेल, असे महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केली. 

2) संस्थानातील धान्यवाटपाची पुनर्रचना केली. त्यासाठी व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेऊन त्यांनी खरेदी केलेल्या किमतीतच धान्य लोकांना विकण्याचा हुकूम दिला. त्या वेळी व्यापाऱ्यांना येणारा तोटा दरबार भरून देत होता. 

3) व्यापारी आणि दानशूर व्यक्‍तींनी शाहू छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन 8500 रुपये जमा केले. त्यातून स्वस्त धान्य दुकाने उघडण्यात आली. इतकेच नव्हे, तर काही व्यापाऱ्यांना त्यांनी लोकांना स्वस्त धान्य पुरवावे म्हणून कोल्हापूर दरबाराने बिनव्याजी कर्ज पुरवठाही केला. इतके करूनही दुष्काळग्रस्त प्रजेला धान्य अपुरे पडत होते. त्यामुळे म्हैसूर संस्थानकडून आणि ब्रिटिश सरकारकडून धान्याची मदत घेतली. 

4) दुष्काळात बाहेरील प्रदेशातून धान्य आणून पुरवठा करता येतो. परंतु, त्या काळात बाहेरून पाण्याचा पुरवठा करणे असंभव गोष्ट होती. आजच्यासारखे टॅंकर किंवा रेल्वेमार्गही उपलब्ध नव्हते. शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानातील विहिरी, तळी, तलाव यांचा शोध घेऊन त्यामधील गाळ काढण्याची व्यवस्था करून या विहिरी आणि तळी अधिक पाणीदार केली. 

5) शेतकऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या जनावरांना जगविण्यासाठी संस्थानात अनेक ठिकाणी छावण्या उघडल्या. 

6) लोकांची खरेदीशक्‍ती जोपासण्यासाठी त्यांना रोजगार पुरविणारी रस्त्यांची कामे हाती घेतली. 1896-97 मध्ये त्यावर 40 हजार रुपये खर्च झाले. तेथे कामावर येणाऱ्या स्त्रियांच्या लहान मुलांसाठी पाळणागृहे उघडण्यात आली आणि त्यांना दुधाचा पुरवठा करण्यात आला. 

7. वृद्ध, रुग्ण यांच्यासाठी संस्थानमध्ये नऊ ठिकाणी आश्रम उघडून त्यांना जगण्याची संधी देऊन त्यांचा मूलभूत हक्‍क जोपासला. त्याचा फायदा पन्नास हजार लोकांनी घेतला. इतकेच नव्हे, तर अपंगांना त्यांच्या घरी धान्य पुरवले. 

8. या खेरीज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तगाई दिली, तर नोकरदार वर्गाला दुष्काळी भत्ता वाटला. 

दुष्काळावर मात करण्याठी खास प्रशासकीय विभाग उघडून त्यांचे सूत्रसंचालन भास्करराव जाधवांसारख्या समर्थ अधिकाऱ्यांकडे दिले. म्हणूनच 1896-97 च्या दुष्काळात संपूर्ण भारतात दहा लाख लोकांचे मृत्यू झाले, परंतु कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूकबळी गेला नव्हता. 

प्लेगच्या संकटाशीही लढा 
गेले 4-5 महिने जगभर "कोरोना' धुमाकूळ घालतो आहे. लाखो लोकांनी प्राण गमावले आहेत. "कोरोना'वर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी, शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानात 1896-97 मध्ये पडलेल्या भयानक दुष्काळावर मात केली व त्यानंतर लगेच उद्भवलेल्या प्लेगच्या भयानक साथीशी कसा यशस्वी लढा दिला, हे पाहणे प्रबोधनात्मक ठरेल. 1896 मध्ये कराची, भिवंडी, पुणे, सातारा आणि बेळगाव भागात प्लेगची साथ प्रथम पसरली. त्यानंतर तिचा प्रादुर्भाव कोल्हापूर संस्थानातही झाला. शाहू छत्रपतींनी हे प्लेगचे आव्हान स्वीकारले आणि ते त्याच्याशी सामना करू लागले. त्यांनी तातडीने पुढील उपाय केले. 

1) प्लेगबाबतचे अज्ञान दूर केले. प्लेगचे जंतू कसे नष्ट करावयाचे यासंबंधी सविस्तर माहिती देणारा जाहीरनामा 10 डिसेंबर 1898 रोजी प्रसिद्ध केला. त्यामध्ये प्लेगचा उंदीर कसा जाळून टाकावा व आपले घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा ठेवावा याची माहिती दिली. 

2) संस्थानातील 18 प्लेगग्रस्त गावांतील वस्ती हलविली. त्या गावांतील लोकांना रानात वस्ती करण्याचा आदेश दिला. त्यासाठी त्यांना घरे बांधण्याचे साहित्य पुरविले. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच गावातील घरांची चोर-दरोडेखोरांपासून संरक्षण करण्याची हमी घेतली. 

3) कोटीतीर्थ येथे खास हॉस्पिटल उघडले. शाहू महाराजांचा मुक्‍काम त्या वेळी पन्हाळ्यावर असे. ते दिवसातून एकदा शहरात येऊन सूचना देत. कोटीतीर्थ येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन रोग्यांची आपुलकीने विचारपूस करीत. 

4) प्लेगशी दिल्या जाणाऱ्या लढ्याला अधिक वेग यावा यासाठी पन्हाळा ते कोल्हापूर ते रेसिडन्सी अशी टेलिफोनची व्यवस्था केली.
 
5) शहरात बाहेरून येणाऱ्यास संशयित रोग्यांसाठी "क्वॉरंटाइन' कक्ष सुरू केले. तेथे संशयितास 3-4 दिवस राहावे लागे. ती व्यवस्था अतिशय कडक असल्याची आठवण डॉ. पी. सी. पाटील यांनी "माझ्या आठवणी' या आत्मचरित्रात नमूद केली आहे. 

6) प्लेगच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1810-11 मध्ये त्यावरील लस उपलब्ध झाली. ते टोचून घेण्यास लोक घाबरत. म्हणून शाहू छत्रपतींनी स्वत:सह आपल्या सर्व परिवाराला आणि अधिकाऱ्यांना प्लेगची लस टोचून घेऊन लोकांची भीती नष्ट केली. 

पस्तीशीच्या उंबरठ्यावर असणारा हा राजा दुष्काळ आणि प्लेग या अस्मानी संकटांशी प्रजेच्या संरक्षणासाठी निर्धाराने लढला, म्हणूनच तो "लोकराजा' या पदवीला पात्र झाला. 

(लेखक ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि शाहू चरित्राचे अभ्यासक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. ramesh jadhav writes article about Rajarshi Shahu Maharaj