भाष्य : एल निनो आणि लाल कंदिलाची घाई

एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे.
Draught
DraughtSakal
Summary

एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे.

एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे. पण एल निनोची जराशी चाहूल लागताच धोक्याचा लाल कंदील दाखवणे घाईचे ठरेल. निदान आगामी मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचे अधिकृत पूर्वानुमान जाहीर होईपर्यंत तरी वाट पाहणेच समंजसपणाचे ठरेल.

एल निनो आणि ला निना हे स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. त्यांचा मराठीत सोपा अनुवाद करायचा म्हटला तर तो एक मुलगा आणि एक मुलगी, अथवा सुपुत्र आणि सुकन्या, असा करता येईल. पण हे स्पॅनिश शब्द मॉन्सूनच्या संदर्भात मराठीत इतके प्रचलित झाले आहेत की, त्यांचा मराठी पर्याय शोधायची जणू आता गरज राहिलेली नाही. त्यांचे अस्सल स्पॅनिश उच्चार एल निन्यो आणि ला निन्या असे असले तरी मराठीत त्यांना एल निनो आणि ला निना म्हटले जाते, ते काही वावगे नाही.

एल निनो या स्पॅनिश शब्दाचा संबंध युरोपमधील स्पेन देशाशी नसून तो दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाशी आहे; जेथे स्पॅनिश भाषा बोलली जाते. पेरू देशाच्या पश्चिमेस प्रशांत महासागर आहे आणि किनाऱ्यावरील बहुतेक लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांचा कित्येक शतकांचा अनुभव आहे की, काही वर्षी समुद्र तापलेला असतो आणि मग त्यांच्या जाळ्यात नेहमीइतके मासे पकडले जात नाहीत. कारण मासे थंड पाण्याच्या शोधात खोलवर गेलेले असतात. समुद्र तापायची प्रक्रिया मार्च-एप्रिलमध्ये सुरू होते आणि डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुमारास ती सर्वाधिक प्रकर्षाने जाणवते. म्हणून या प्रक्रियेला एल निनो हे नाव पडले. त्याचा साधा अर्थ एक मुलगा एवढाच असला तरी एक पवित्र बालक, मानव रूपात जन्म घेणारा देवपुत्र येशू ख्रिस्त, असा अर्थ त्याच्याशी जोडला गेला.

एल निनोचा कालावधी संपल्यावर प्रशांत महासागर थंडावत जातो आणि त्या परिस्थितीला ला निना म्हटले जाते. समजून घेण्यासारखे हे आहे की, एल निनो आणि ला निना या चक्री वादळांसारख्या किंवा अतिवृष्टीसारख्या अधूनमधून घडणाऱ्या आकस्मिक घटना नाहीत. त्या दीर्घ काळ चालणाऱ्या वातावरणीय आणि सागरी प्रक्रिया आहेत ज्या आलटून पालटून बळावतात आणि नाहीशा होतात. पण त्यांच्यात एखाद्या घड्याळातील लंबकासारखी काटेकोर नियमितता नसते. परिणामी, आगामी वर्ष एल निनोचे असेल की ला निनाचे असेल की ते तटस्थ असेल हे निश्चितपणे सांगणे हवामानशास्त्रज्ञांपुढे नेहमीच आव्हान असते. डिसेंबर महिन्यात प्रशांत महासागराचे तापमान किती असेल याचे पूर्वानुमान मार्चमध्ये करणे सोपे नाही आणि ते चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एल निनो, ला निना आणि मॉन्सून आपल्यापासून खूप दूर असलेल्या प्रशांत महासागरावरील एल निनो आणि ला निना या प्रक्रिया आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण त्यांचा भारतीय मॉन्सूनशी जवळचा संबंध आहे. या संबंधाचा शोध कोणी नव्याने लावलेला नाही किंवा तो परदेशात काम करत असलेल्या शास्त्रज्ञांनी लावला, असेही नाही. खरे तर तो शोध शंभर वर्षांपूर्वी भारतातच लावला गेला होता. १९०४ ते १९२४ दरम्यान सर गिल्बर्ट वॉकर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक होते. विभागाचे मुख्यालय त्याकाळी सिमला येथे होते.

भारतावर इंग्रजांची राजवट होती. इंग्रज साम्राज्याचा भौगोलिक विस्तार फार मोठा असल्याने वॉकर यांना सिमल्यात राहून जगभरातील वेधशाळांच्या नोंदी मिळवणे शक्य झाले. भारतीय मॉन्सूनचे विविध जागतिक सहसंबंध त्यांनी शोधून काढले आणि त्यावर आधारित मॉन्सूनचे पूर्वानुमान ते दर वर्षी देऊ लागले. प्रशांत महासागरावरील एल निनोशी संबंधित सदर्न ऑसिलेशनचा शोध वॉकर यांनी लावला. मॉन्सूनचे अनेक सहसंबंध आता कालबाह्य ठरले असले तरी एल निनो सदर्न ऑसिलेशनशी (एन्सो) गिल्बर्ट वॉकर यांनी जोडलेला सहसंबंध अजूनही मॉन्सूनचे पूर्वानुमान देण्याच्या प्रयत्नात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर एल निनो तापमानाशी संबंधित आहे, तर सदर्न ऑसिलेशन वायुदाबाशी संबंधित आहे. दोन्ही मिळून ते भारतीय मॉन्सूनला प्रभावित करतात.

एल निनो आणि दुष्काळ

अलीकडच्या काळात सागरी तापमान मोजायचे काम हवामान उपग्रह करताहेत. त्याशिवाय समुद्रावर तरंगणारी आणि सागरी प्रवाहांबरोबर वाहत जाणारी स्वयंचलित उपकरणेही सागरी घटकांचे मोजमाप करत असतात. म्हणून एल निनोच्या अचूक नोंदी करणे आता शक्य आहे. पूर्वीच्या काळी व्यापारी जहाजांची या कामात मदत घेतली जायची आणि तापमानाच्या नोंदी व्यापारी जहाजांच्या मार्गांपुरत्याच मर्यादित असायच्या. तरीही मागील शंभर वर्षांच्या नोंदींचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी एल निनोविषयी बरीच ऐतिहासिक माहिती एकत्रित केली आहे.

या माहितीच्या विश्लेषणावरून दोन ढोबळ निष्कर्ष काढता येतात. पहिला हा की, प्रशांत महासागरावर जेव्हा ला निना परिस्थिती असते तेव्हा भारतावर जून ते सप्टेंबर महिन्यातील मॉन्सूनचा पाऊस बहुदा सामान्य असतो. म्हणजे ला निना भारतासाठी अनुकूल असतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे ला निना मागील सलग तीन वर्षे राहिला आणि त्याबरोबर भारतीय मॉन्सूनचा पाऊसही सलग तीन वर्षे चांगला पडला. दुसरा निष्कर्ष एल निनोविषयी आहे, जो मात्र इतका स्पष्ट नाही.

एल निनो परिस्थितीत प्रशांत महासागराचा विषुववृत्तीय भाग तापल्यामुळे त्यावरील हवा हलकी होऊन वर चढते. पुढे ती पश्चिमेकडे वाहू लागते आणि शेवटी ती हिंद महासागरावर खाली उतरते. यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहात बाधा येते. या अभिसरणाला सर गिल्बर्ट वॉकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘वॉकर सर्क्युलेशन’ असे नाव दिले गेले आहे. संक्षेपात सांगायचे तर एल निनो भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल ठरू शकतो. पण प्रत्येक एल निनो मॉन्सूनला अपायकारक असतोच असे मात्र नाही. ऐतिहासिक नोंदी हे दाखवतात की काही एल निनो वर्षांत भारतावर दुष्काळ पडला होता; तर इतर काही एल निनो वर्षांत मॉन्सूनचा पाऊस सामान्य राहिला होता.

एल निनोची चाहूल

कारण हे आहे की, एल निनो मॉन्सूनसाठी महत्त्वाचा असला तरी तो मॉन्सूनचा एकमेव नियंत्रक नाही. हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिमालयाच्या पर्वत रांगा आणि संपूर्ण युरोप व आशिया खंड यांचा भारतीय मॉन्सूनच्या निर्मितीत आणि सक्रियतेत सहभाग असतो. भारतीय मॉन्सूनचे अनेक जागतिक सहसंबंध आहेत. हे आपण कधीही विसरू नये. भारतीय मॉन्सूनचे एक सरासरी सामान्य रूप बनवता आले तरी दर वर्षीचा मॉन्सून कोणत्या न कोणत्या बाबतीत अप्रतिम किंवा अद्वितीय असतो. मॉन्सून कधी लवकर येतो तर कधी उशिरा. कधी तो वेळेवर येतो पण नंतर खोळंबतो. कधी तो मध्येच विश्रांती घेतो. काही प्रदेश कधी कोरडेच राहतात, तर काही नद्यांना महापूर येतो. अशी अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे आहेत जी एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करण्यास मदत करू शकतात.

सन २०२०, २०२१ आणि २०२२ ही ला निना वर्षे होती. एल निनो आणि ला निना आलटून पालटून येत राहतात. म्हणून स्वाभाविकपणे आता एल निनोचे येणे अपेक्षित आहे. पण एल निनोची जराशी चाहूल लागताच धोक्याचा लाल कंदील दाखवणे घाईचे ठरेल. निदान आगामी मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचे अधिकृत पूर्वानुमान जाहीर होईपर्यंत तरी वाट पाहणे समंजसपणाचे ठरेल.

(लेखक ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com