भाष्य : मॉन्सून सध्या काय करतो?

पावसाळ्याचे तीन महिने होऊन गेले असले तरी केवळ शेतकऱ्यांच्या नाही पण सर्वसामान्यांच्या मनातही आज मॉन्सूनविषयी अनेक प्रश्न आहेत.
Flood
FloodSakal

मॉन्सून हा आपल्या घरी दरवर्षी चार महिने येऊन राहणारा एक पाहुणा आहे. मॉन्सूनचा पाऊस चांगला पडो किंवा बेताचा, बाकीच्या आठ महिन्यांसाठी पाण्याची तरतूद करण्याची जबाबदारी आपली असते. आपण या उपलब्ध पाण्याचा वापर सुज्ञतेने करणे गरजेचे आहे. त्यातही निसर्ग आपल्याला थोडीफार मदत करतोच.

पावसाळ्याचे तीन महिने होऊन गेले असले तरी केवळ शेतकऱ्यांच्या नाही पण सर्वसामान्यांच्या मनातही आज मॉन्सूनविषयी अनेक प्रश्न आहेत. ऑगस्टचा महिना कोरडा गेला, आता पिकांचे काय होणार? राहिलेल्या एका महिन्यात पावसाची तूट कशी भरून निघणार? शहरात पाणी कपात होणार का? परतीचा पाऊस कधी सुरू होणार? तो सरासरीपेक्षा कमी पडला तर मग काय? हा एल निनोचा प्रभाव आहे का?

जुलैमध्येही एल निनो होता, पण तेव्हा पाऊस पडला, मग आता का थांबला? सलग तीन वर्षे पाऊस चांगला झाला, आता दुष्काळाचे सत्र सुरू झाले आहे का? यावर्षी अधिक मास आहे, दुष्काळात तेरावा महिना ही म्हण खरी आहे का? यंदा गणेशोत्सवात पाऊस पडणार ना? असे विविध प्रकारचे प्रश्न आहेत.

ते सर्व प्रश्न वाजवी आहेत, पण त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे नाहीत. हे मात्र नक्की की लोकांमध्ये हवामानाविषयीची जागरुकता आणि जिज्ञासा कमालीची वाढली आहे, आणि ती एक स्वागतार्ह गोष्ट आहे.

हे नेहमी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, मॉन्सून हा आपल्या घरी दरवर्षी चार महिने येऊन राहणारा एक पाहुणा आहे. मॉन्सूनचा पाऊस चांगला पडो किंवा बेताचा, बाकीच्या आठ महिन्यांसाठी पाण्याची तरतूद करण्याची जबाबदारी आपली असते. त्यातही निसर्ग आपली थोडीफार मदत करतो. एक तर मॉन्सूनचा पाऊस संपल्यानंतरही नद्या वाहत राहतात.

त्या लगेच कोरड्या पडत नाहीत. भारतात असे १५० जलाशय आहेत जे पावसाळ्यात भरतात आणि पुढील पावसाळ्यापर्यंत देशाला पाणी पुरवत राहतात. धरण किंवा विद्युत प्रकल्पांचा भाग असलेले काही जलाशय वगळता ते सर्व नैसर्गिक आहेत. त्यांच्यातील पाण्याच्या स्तरांवर भारताचा केंद्रिय जल आयोग बारकाईने नजर ठेवून असतो.

३१ ऑगस्ट रोजी त्यांच्यातील पाण्याचा साठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या ६३ टक्के होता. प्रत्येक पावसाळ्यात ही सर्व जलाशये शंभर टक्के भरतात, असे मुळीच नाही. त्यातील पाण्याचा साठा कमी जास्त होत असतो. मागील दहा वर्षांची सरासरी काढली तर त्या सरासरीच्या तुलनेत आजचा साठा ९१ टक्के आहे. ही परिस्थिती वाईट नसून फक्त आपण या उपलब्ध पाण्याचा वापर सुज्ञतेने करणे गरजेचे आहे.

एल निनो अन् परतीचा पाऊस

यंदाच्या वर्षी अगदी मार्च महिन्यातच, एल निनोचा लाल कंदील परदेशी शास्त्रज्ञांनी भारताला दाखवला होता. यंदाच्या मॉन्सूनचा पाऊस सामान्य, परंतु सरासरीहून थोडासा कमी राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागानेही एप्रिलमध्ये दिला होता. अगदी त्यानुसार जूनचा पाऊस बेताचाच राहिला.

जुलै महिन्यात मात्र भरपूर पाऊस पडला, अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या आणि भूस्खलनाच्या घटनाही घडल्या, ज्यामुळे एल निनोची दहशत दूर झाली. नंतर ऑगस्टमध्ये पावसाची जास्त अपेक्षा बाळगू नये, असाही इशारा पुन्हा एकदा अधिकृतपणे दिला गेला होता. म्हणून आजवर जे काही घडले ते अगदी अकल्पित होते, असे म्हणता येणार नाही.

एल निनो ही प्रशांत महासागरावर अधूनमधून उद्भवणारी एक प्रक्रिया आहे. जेव्हा मध्यवर्ती व पूर्व प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा काही अंशांनी वाढते तेव्हा त्याला एल निनो म्हणतात. त्याच्या मोजमापासाठी प्रशांत महासागराचे निनो-१, निनो-२ असे विविध भाग पाडले गेले आहेत. त्यांचा भारतीय पर्जन्यमानाशी कमी अधिक संबंध जोडला जातो.

निनो-३.४ या भागाचे तापमान मार्च महिन्यात सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियस अधिक होते. आता ते सरासरीपेक्षा ०.८ अंश सेल्सियस एवढे वाढले आहे आणि ते हळूहळू आणखी वाढत आहे. त्याचा भारताच्या पर्जन्यमानावर होत असलेला विपरीत परिणाम आज आपण पाहत आहोत.

१ जून ते ३० सप्टेंबर दरम्यानचा चार महिन्यांचा कालावधी मॉन्सूनच्या पर्जन्यमानाची आकडेवारी तयार करण्यासाठी निश्चित केला गेला आहे. सामान्य मॉन्सूनची व्याख्या त्याच संदर्भात केली जाते. यामुळे अशी एक गैरसमजूत निर्माण झाली आहे की, जून महिना सुरू होताच पावसाची सुरुवात होते आणि सप्टेंबर महिना संपताच पाऊस बंद होतो. प्रत्यक्षात मॉन्सून या तारखांनी बांधलेला नाही.

खरे तर ग्रेगोरीअन कॅलेंडरमधील जूलियस सीझर किंवा ऑगस्टस सीझर यांची नावे असलेल्या महिन्यांशी निसर्गाचा संबंध नाही. नैऋत्य मॉन्सून केरळपासून राजस्थानपर्यंत टप्प्या-टप्प्याने आगेकूच करत जातो, तसाच तो तेथून टप्प्या-टप्प्याने माघारही घेतो आणि शेवटी त्याचे रूपांतर ईशान्य मॉन्सूनमध्ये होते. ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव देशाच्या दक्षिणी भागापुरता मर्यादित असला तरी त्याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावरही होतो.

यामुळे राज्यातील अनेक भागात सप्टेंबरच्या उत्तरार्धात आणि ऑक्टोबरच्या पूर्वार्धात पाऊस पडतो. यालाच ‘परतीचा पाऊस’ असेही म्हटले जाते. मॉन्सून संपल्यानंतरही जशी जलाशये पाण्याने भरलेली राहतात तशीच जमीनही तिच्यात पाणी साठवून ठेवते. जमिनीत मुरलेल्या ओलाव्यावर ज्वारी-बाजरीसारखी भरड धान्याची पिके रब्बी हंगामात काढण्याची महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे.

आशा सप्टेंबर, ऑक्टोबरकडून

नैऋत्य मॉन्सूनचे वारे भारतावर वाहत येतात ते हिंद महासागरावरून. म्हणून नैऋत्य मॉन्सूनच्या निर्मितीत आणि प्रक्रियेत हिंद महासागराच्या तापमानाचा मोठा प्रभाव असतो, हे उघड आहे. त्याच्या नावात हिंद शब्द असला तरी प्रत्यक्षात श्रीलंकेपासून अंटार्क्टिकापर्यंत आणि आफ्रिकेपासून इंडोनेशियापर्यंत असा त्याचा प्रचंड विस्तार आहे.

इतक्या मोठ्या समुद्राचे तापमान सर्वत्र समान असू शकत नाही. जेव्हा हिंद महासागराचा पश्चिमेकडील भाग त्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा अधिक तापलेला असतो तेव्हा भारतावर चांगला पाऊस पडतो असे दिसून आले आहे. याविरुद्ध, जेव्हा हिंद महासागराचा पूर्वेकडील भाग त्याच्या पश्चिमेकडील भागापेक्षा उष्ण असतो तेव्हा भारतावर पावसाचे प्रमाण कमी होते.

या उलट-सुलट बदलणाऱ्या स्थितीला ‘इंडियन ओशन डायपोल’ किंवा संक्षेपात ‘आयओडी’ असे नाव पडले आहे. हवामानशास्त्रज्ञ त्यावर सतत लक्ष ठेऊन असतात. काही दिवसांपूर्वी, म्हणजे यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच, ‘आयओडी’ मॉन्सूनसाठी काहीसा अनुकूल बनला आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यात तो अनुकूल राहण्याची चांगली शक्यता आहे.

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की, कोकण आणि विदर्भ वगळता मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळप्रवण आहेत. तेथे एक दोन वर्षे चांगला पाऊस पडला म्हणून तो दर वर्षी चांगला पडेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

पण या जिल्ह्यांतही, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाऊस पडतो हा एक साधारण अनुभव आहे. त्याचबरोबर ‘आयओडी’ अनुकूल राहण्याची गरज लक्षात घेतली तर महाराष्ट्र राज्यासाठी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने निराशाजनक भासत नाहीत.

येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर त्याचाही सुपरिणाम होऊ शकेल. देशभरासाठी सप्टेंबर महिन्याचा पाऊस सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के राहण्याची शक्यता हवामान विभागाने नुकतीच वर्तवली आहे आणि ती खरी ठरेल, अशी आपण आशा बाळगू या.

(लेखक भारतीय हवामान खात्याचे निवृत्त महासंचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com