esakal | ‘मधुकर’ वृत्तीचा ज्ञानोपासक
sakal

बोलून बातमी शोधा

mehendale

एका तरुण भारतीय विद्वानाचा तो प्रबंध वाचून वाल्डश्‍मिट्‌ हे भारतविद्येचे जर्मन विद्वान स्तिमित झाले आणि त्यांनी सरांना आपल्या संशोधनात सहभागी करून घेण्यासाठी जर्मनीस पाचारण केलं.

‘मधुकर’ वृत्तीचा ज्ञानोपासक

sakal_logo
By
डॉ. श्रीकांत बहुलकर

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.

मेहेंदळे सर गेले! वयाची शंभरावर दोन वर्षं पुरी करणारे, विसाव्या शतकातल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांच्या पिढीचे शेवटचे प्रतिनिधी डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे सर आता आपल्यात नाहीत. आता त्या पिढीच्या आठवणी सांगणारं कोणी आपल्यात उरलं नाही, ही जाणीव होऊन मनाला काहीशी खिन्नता आली. त्याचबरोबर सरांबद्दलच्या अनेक आठवणींचा चित्रपट स्मृतिपटलावर झळकून गेला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘समाम्नायः समाम्नातः’ हे शब्द आहेत ‘निघंटु-निरुक्त’ या वैदिक ग्रंथाच्या सुरुवातीचे. ते शब्द सरांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकले, ते पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विषयाच्या एम्‌. ए. च्या वर्गात. सर आम्हाला तो आणि इतरही काही विषय शिकवीत असत. त्यांची ती तेजस्वी मूर्ती, कोणत्याही प्रकारे वक्तृत्व न गाजवता, शांतपणे शिकवण्याची हातोटी भावत असे. भाषाशास्त्र हा सरांच्या व्यासंगाच्या विषयातला एक विषय. त्यांच्या व्याख्यांनांमधून आणि लेखनामधून त्यांची मुळाचा शोध घेण्याची, नवा मुद्दा मांडण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत लक्षात येत असे. आणि मग ‘हे आजवर कोणाच्या कसं बरं लक्षात आलं नाही?‘ असं वाटत असे. असं मूलभूत संशोधन करण्यासाठी सततचा आणि चौफेर व्यासंग, परिश्रम, उत्तम बुद्धिमत्ता, आणि अंतर्दृष्टी लाभलेले विद्वान थोडेच. सरांकडे हे सगळं होतं. संस्कृत, पाली, आणि प्राकृत या प्राचीन भारतीय अभिजात भाषा, पारशी लोकांच्या अवेस्ता या धर्मग्रंथाची वैदिक भाषेला जवळची भाषा, जर्मन भाषा यांचे उत्तम ज्ञान असणारे सरांसारखे विद्वान भारतात फारच थोडे असतील.

पुराभिलेखांमधल्या प्राकृत भाषेच्या व्याकरणावर संशोधन करून त्यांनी २५ व्या वर्षीच पीएच्‌.डी. मिळवली. सुमारे ७० वर्षांपूर्वी सरांनी केलेलं ते संशोधन जगन्मान्य आहे. एका तरुण भारतीय विद्वानाचा तो प्रबंध वाचून वाल्डश्‍मिट्‌ हे भारतविद्येचे जर्मन विद्वान स्तिमित झाले आणि त्यांनी सरांना आपल्या संशोधनात सहभागी करून घेण्यासाठी जर्मनीस पाचारण केलं. सर त्यावेळी डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते. त्या संस्थेचे संचालक आणि नामवंत भाषाशास्त्रज्ञ डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांनी सरांना जर्मनीला जाण्यासाठी उत्तेजन दिलं. त्यामुळे सरांना एका उत्कृष्ट संशोधकाबरोबर काम करून ती संशोधनपद्धती आत्मसात करता आली. जर्मनीतलं संशोधनाचं काम पुरं करून सर डेक्कन कॉलेजात पुन्हा रुजू झाले आणि  १९८३पर्यंत त्यांनी त्या संस्थेत संशोधन-अध्यापन केलं. त्याबरोबरच संस्कृत महाकोशाच्या प्रकल्पामध्येही काही वर्षं सह-प्रधान संपादक म्हणून कार्य केलं. तिथे काम करीत असताना माझा सरांशी जास्त परिचय झाला. संस्थेच्या आवारात राहून ते रात्रंदिवस संशोधनाचं कार्य करीत. पण त्याबरोबरच पुणे विद्यापीठ, टि.म.वि., वैदिक संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी या संस्थांमध्येही ते संस्कृत आणि अवेस्ताचे वर्ग घेत असत. त्यांच्या चौफेर ज्ञानाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ घेतला, पण ती परंपरा समर्थपणे चालविणारा त्यांचा एकही विद्यार्थी नाही, हे खेदानं नमूद करावंसं वाटतं. पोकळी हा शब्द गुळगुळीत झाला आहे. पण सरांच्या जाण्यानं खरोखरीच पोकळी निर्माण झाली आहे.

मूलगामी संशोधन
डेक्कन कॉलेजातून निवृत्त झाल्यावर सरांनी भांडारकर संस्थेच्या महाभारताची सांस्कृतिक सूची या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवून त्या सूचीचे अनेक खंड प्रकाशित केले. महाभारताच्या सांस्कृतिक अभ्यासासाठी आणि इतर अनेक प्रकारच्या संशोधनासाठी, उपयुक्त माहितीने भरलेली ही सूची संशोधकांना तसेच जिज्ञासूंनाही उपयोगी आहे. मूलगामी संशोधन करीत असतानाही वेद, महाभारत, संस्कृत भाषा अशा अनेक विषयांवर सरांनी जे संशोधनपर निवंध लिहिले आहेत, त्यातले काही जिज्ञासू वाचकांना अतिशय आवडतात. उदाहरणार्थ, महाभारतातली द्रौपदी वस्त्रहरणाची कथा लोकांना माहीत असते. पण लोक समजतात तशा प्रकारे वस्त्रहरण झालंच नाही. महाभारतातल्या कथेनुसार दुःशासन द्रौपदीचे वस्त्र फक्त ओढतो. त्यामुळे ते वस्त्रहरण नसून वस्त्राकर्षण आहे, हे सरांनी सप्रमाण सिद्ध केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी टिमवित संस्कृत विभागाचा प्रमुख असताना सरांना वेदाचं अध्यापन करण्यासाठी निमंत्रित करीत असे. वेदमंत्रांचा अर्थ नेमका काय आहे, हा प्रश्न प्राचीन आणि आधुनिक अभ्यासकांना नेहमीच पडत आला आहे आणि आजही त्यांचा नेमका अर्थ काय, याबद्दल विद्वानांचं एकमत होऊ शकत नाही. वेदाचा अर्थ लावण्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात आल्या. त्यांचा इतिहास हा एक महत्त्वाचा विषय असून त्यासंबंधीची माहिती एकत्रित करून सांगणारे ग्रंथ कमीच आहेत. संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमात ‘वेदार्थनिर्णयाचा इतिहास‘ ह्या विषयाचा समावेश करून मी हा विषय शिकवावा, अशी विनंती त्यांना केली. सरांनी माझी विनंती मान्य करून अनेक वर्षे तो शिकवला आणि त्यावरचं पुस्तकही लिहिलं. हे पुस्तक भांडारकर संस्थेनं प्रसिद्ध केलं आहे. गेल्या फेब्रुवारीला सरांकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. सरांची स्मरणशक्ती उत्तम होती. ते तरतरीत होते. व्यवस्थित, मुद्देसूद बोलत होते. जणू त्यांचं वय थांबलं होतं. शेवटच्या दिवशीही त्यांची प्रकृती उत्तम होती. काहीही त्रास न होता त्यांचा श्वास थांबला आणि प्राणज्योत मालवली. एखाद्या संथ जलाशयात शांतपणे प्रवेश करावा त्याप्रमाणे ते अनंतात विलीन झाले. शांत जीवन आणि शांत मृत्यू यासाठी भाग्यच लागतं. सर असे भाग्यवान होते. त्यांना माझी आदरांजली.