रंगवाचा : नाट्यविषयक दस्तनिर्मितीचा खटाटोप

सबकुछ नाटकाविषयी आणि तेही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, असे सलग पाच वर्षे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे ‘रंगवाचा’.
Drama Rangvacha
Drama RangvachaSakal
Summary

सबकुछ नाटकाविषयी आणि तेही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, असे सलग पाच वर्षे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे ‘रंगवाचा’.

सबकुछ नाटकाविषयी आणि तेही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, असे सलग पाच वर्षे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे ‘रंगवाचा’. तळकोकणातून प्रसिद्ध होणाऱ्या या नियतकालिकाने नाट्यवेड्या महाराष्ट्राला अधिक समृद्ध केले आहे.

कणकवली हे नाव नाट्यनकाशावर आलं त्याला आता ४५ वर्षे उलटून गेली आहेत. तळकोकण भागात उत्तम नाट्यगृह उभारून तिथे ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वामन पंडित हे नाट्यवेडे गृहस्थ नाटक आणि रंगभूमीसाठी निरलसपणे काम करत आले आहेत. नाट्यवर्तुळात अत्यंत आदरानं घेतलं जाणारं आणि स्वबळावर प्रतिष्ठित झालेलं हे नाव.

‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या संस्थेचं सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य त्याच्या सातत्यासाठी आणि दर्जासाठी नावाजलं आहेच. गेली ४४ वर्षे ‘नाथ पै एकांकिका स्पर्धा’, २८ वर्षे ‘कणकवली नाट्यउत्सव’ २२ वर्षे ‘वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धा’, शास्त्रीय गायन रसग्रहण कार्यशाळा, गायन-वादन मैफलीशिवाय विविध नाट्यविषयक शिबिरे, चर्चासत्रे संस्थेने आयोजित केली आहेत. त्या सर्वांवर कडी म्हणजे सुमारे १५०० एकांकिकांच्या संहितांची संचयिका संस्थेने उभारली आहे.

वामन पंडितांनी पाच वर्षांपूर्वी ‘रंगवाचा’ हे नाट्यविषयक त्रैमासिक सुरू केलं ते त्यांच्या नाट्यवेडाचं आणखी एक विस्तारित अंग. २० फेब्रुवारी २०१७रोजी ‘रंगवाचा’चा पहिला अंक तर यंदाच्या दिवाळीत विसावा अंक प्रकाशित झाला. ही पाच वर्षांची वाटचाल सोपी मुळीच नव्हती. मराठीतील नियतकालिके जणू बंद पडण्यासाठी सुरू होतात की काय, अशी दुर्दैवी परिस्थिती असताना खंड पडू न देता, हाताशी-पाठीशी विशेष आर्थिक बळ नसतानाही सलग पाच वर्षे असे नियतकालिक चालवणे हीच मोठी गोष्ट. त्यात ते नियतकालिक रंगभूमीविषयक चळवळीचे मुखपत्र.

मराठी माणूस नाटकवेडा आहे, असं म्हणतात. पण ते मिथक वाटावं, अशीच गेल्या दशकातली नाट्यगृहांची परिस्थिती आहे. नाट्यनिर्मितीला लागलेली उतरती कळा, छोट्या-मोठ्या पडद्यांकडे आकर्षित तरुण रंगकर्मी यामुळे कुठे गेलं ते वेड असा प्रश्न सुजाण मनाला पडावा. नाटक पाहणे हा ज्याचा अग्रक्रम नाही तो मराठी माणूस नाटकाविषयीचं लेखन... तेही अभ्यासपूर्ण लेखन वाचेल म्हणता? परंतु मनात कोणताही किंतु न आणता पंडितांनी ‘रंगवाचा’चं पालकत्व घेण्यासाठी नाट्यरसिकांना आवाहन केलं. नियतकालिक सुरू केलं आणि तब्बल पाच वर्षे ते निरलसपणे चालवलंदेखील!

दोन हजार पृष्ठांचा दस्तऐवज

पंडितांसह डॉ. राजेंद्र चव्हाण, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर आणि लालासाहेब घोरपडे यांचे संपादक मंडळ आणि महाराष्ट्रातील आठ शहरांच्या प्रतिनिधींचं मंडळ सुरुवातीपासून नाट्यविषयक प्रेमानं आणि निष्ठेनं या कामात सहभागी आहे. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर आजवर मराठीच नव्हे तर अन्य भारतीय भाषांतील रंगभूमीचा आणि परदेशी रंगभूमीचाही जवळजवळ २००० पृष्ठांचा मौल्यवान दस्तऐवज त्यातून निर्माण झाला. संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कसोशीने राखत हे करणं सोपं नव्हतं, नाही. अगदी पहिल्या अंकापासून नाट्यविश्‍वाचा आणि त्याच्या विशाल परिघाचा वेध घेणारी सदरे ‘रंगवाचा’चा अविभाज्य घटक आहेत. ‘रंगवाचा’मध्ये भारतात आणि परदेशात रंगभूमीवर होणाऱ्या नव्या प्रयोगांची माहिती, रंगभूमीविषयक लेखन, रंगकर्मींच्या मुलाखती प्रसिद्ध होतात. नाट्यप्रयोगांची परीक्षणे, नाट्यविषयक ग्रंथांची परीक्षणे प्रसिद्ध केली जातात. नव्या रंगभाषेविषयी माहितीपूर्ण लेख असतात. बालरंगभूमीची दखल घेतली जाते. विविध ठिकाणच्या नाट्यस्पर्धा, शिबिरे यांचे वृत्तांत दिले जातात. त्यामुळे रसिकांना जाणकार करण्यासाठी आवश्यक अशा रंगभूमीविषयक नियतकालिकाची उणीव ‘रंगवाचा’ने भरून काढली आहे. हे नुसतेच ‘जागा भरणे’ नसून खऱ्याखुऱ्या जातिवंत नाट्यप्रेमातून उगवलेलं आणि नाट्यरसिकांची बौद्धिक मशागत करणारं हे नियतकालिक आहे.

रंगकर्मींकडे पालकत्व

नेमके नियोजन, आखणी आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी ही कोणत्याही कामाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली असते. ती तर ‘रंगवाचा’च्या मंडळींना सापडली आहेच. म्हणून अगदी नसिरुद्दीन शहांपासून ते अलीकडच्या तरुण रंगकर्मींपर्यंत अनेकजण ‘रंगवाचा’चे पालक आहेत. त्यात नाट्यप्रेमी प्राध्यापक, लेखक, ग्रंथालय, विविध सांस्कृतिक संस्था यांचाही सहभाग आहे. पण तो वाढायला हवा. नाटक ही जिवंत कला आहे. नाटकाचे सादरीकरण झाले की उरतात त्या केवळ प्रयोगाच्या स्मृती. त्याही कालांतराने फिकट होतात. त्यांचे दस्त करून ठेवणं ही पुढच्या पिढ्यांची गरज असते. विविध ठिकाणी चालणाऱ्या प्रयोगांची माहिती पोचणं ही वर्तमानाची गरज असते तर आपला देदिप्यमान वारसा शब्दांकित होणं, ही काळाची गरज असते. त्यामुळे हे दस्तऐवजीकरण चालू राहणं ही एका अर्थी आपणा सर्वांची गरज आणि जबाबदारीही आहे.

थोडक्यात सांगायचं तर ‘नाटकाविषयी सर्व काही’ जाणकारीनं रसिकांपर्यंत पोचवण्याचा खटाटोप ‘रंगवाचा’ करत आहे. तो उत्साहाने चालू राहावा, त्यासाठी ‘रंगवाचा’च्या सर्व चमूला हार्दिक शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com