मन मंदिरा... :  करीअर म्हणजे स्वक्षमतांना न्याय

Career
Career

यशस्वी करिअर झालं असं आपल्याला केव्हा म्हणता येईल? तर झेपेल, रुचेल अशा व्यावसायिक पदवीची, करिअरची निवड आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व विकास. तो झाला नाही तर कुठल्याही विद्यापीठाची कितीही मोठी पदवी मिळाली तरी एक समृद्ध आयुष्य जगायला ती अपुरीच पडते. मुळात करियर करायचं कशासाठी तर बुद्धिमत्तेला, स्वत:तल्या क्षमतांना न्याय देण्यासाठी. पैसा, प्रतिष्ठा ही उद्दिष्ट ओघानं येतात.

लहानपणापासून विकासाची सुरवात होते. पण तारुण्यावस्था, विशेष करून महाविद्यालयीन आयुष्य सुरु झालं की उडण्यासाठी भलं मोठं विशाल आकाश आपल्यासाठी मोकळं होतं. आपल्यातला ‘मी’ ह्या मोकळ्या आकाशात छानपैकी विहरू शकण्यासाठी आपल्या पंखात आवश्यक ते बळ निर्माण होण्याची ही वेळ असते.  ह्या साठी मेंदूच्या neuronal network ला विशिष्ट गोष्टी करण्याची शिस्त लावावी लागते. यश -अपयशापेक्षा, शंभर टक्के प्रयत्न करणे आणि प्रयत्न करण्याच्या प्रवासात आनंद घेणे हेच महत्त्वाचे. तीच धारणा बनायला हवी. ह्या काळात कमविण्याच्या गोष्टी  १) शारीरिक क्षमतेचा विकास, २) व्यक्तिमत्व विकास ३) नियमित अभ्यास आणि एकाग्रता ४) सर्व प्रकारच्या व्यसनांपासून आणि अनैतिक गोष्टींपासून दूर रहाणे. ५) कलाकौशल्य, क्रीडानैपुण्य, नेतृत्वगुण, चांगले मैत्र ६) महाविद्यालयीन जीवनात आवश्यक व पुढील जीवनात उपयोगी अशी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये आत्मसात करणे आणि खराखुरा  ‘व्यक्तिमत्व विकास’.

व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. ह्या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं ? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी. म्हणजेच आतलं विश्व शांत,स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असं म्हणता येईल. सुरवात महत्वाची - ह्या सगळ्याची सुरवात करावी लागते ती व्यक्तिमत्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडीओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टी. व्ही. वर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याचबरोबर आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यक्तिमत्व विकासातील काही महत्वाची साध्ये. - रुजवायला हवं की - १. माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्यापेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुख:करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्त्व मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग बनून जाईल. २. माझं ''आतलं’ विश्व मी कायम शांत, स्वस्थ,आनंदी आणि कणखर ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्वीकारीन. ३. आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील. ४. मी स्वत: आनंदी रहाण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. 

मी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. ५. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन. एकूण काय, विचारात, वागणुकीत तारतम्य बाळगलं, स्वयंशिस्त आखली, बेभानपणातील आनंद आणि मर्यादा ओळखल्या तर तारुण्यातला उत्साह, आनंद भरभरून उपभोगण्याचा हा काळ आहे. भरपूर काही आत्मसात करण्याचा, स्वत:ला ओळखण्याचा हा काळ आहे. ह्या काळातलं आनंदाचं संचित पूर्ण आयुष्यभर पुरतं. मग खऱ्या अर्थाने, निवडलेली व्यावसायिक करिअर यशस्वी होते. स्वप्न पूर्ण व्हायला मदत होते. मुख्य म्हणजे आनंद आणि मन:शांती मिळायला मदत होते, ज्यासाठी सर्वं मनुष्यमात्र धडपडत असतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com