उद्धव यांचे ‘भाऊ’बंधन!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.
 

एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.
 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला भावासारखे आहेत...’ या उद्‌गारांमुळे दस्तुरखुद्द मोदीही चाट पडले असणार! महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची ‘युती’ तुटली, तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा, तसेच मोदी यांना आपल्या तिखट टीकेचे लक्ष्य केले होते. खरे तर शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष. मात्र, त्यांची ही ‘युती’, युतीच्या रौप्यमहोत्सवी वर्षातच तुटली आणि दोघांचे संबंध विकोपाला गेले होते आणि ‘अफझलखानाच्या फौजा महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत!’ अशा शब्दांत शहा यांची संभावना करण्यापर्यंत उद्धव यांची मजल गेली होती. त्यामुळेच ‘रालोआ’च्या या बहुचर्चित बैठकीवर उद्धव बहिष्कार टाकण्याची शक्‍यताही वर्तवली जात होती. ‘युती’च्या बैठकी या ‘मातोश्री’वरच होतील, अशा गर्जना शिवसेनेचे प्रवक्‍ते करत होते. या पार्श्‍वभूमीवर अचानक उद्धव यांनी कोलांटउडी घेतली आणि ते दिल्लीतील बैठकीस उपस्थित राहिले. मात्र, त्यापेक्षाही अचंबित करणारी बाब म्हणजे उद्धव यांची ही दिल्लीस्वारी भलतीच मवाळ ठरली आणि मोदी हे आपल्याला भावासारखे असल्याची कबुली या बैठकीत देऊन ते मोकळे झाले. या साऱ्याचा अर्थ जो काही लावायचा, तो मराठी माणूस लावेलच; पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव यांच्यात रंगलेला तुफानी कलगीतुरा पाहता आता शिवसेना २०१९ मध्ये होणारी निवडणूक स्वतंत्रपणेच लढेल आणि भाजपपुढे कडवे आव्हान उभे राहील, ही अपेक्षाही उद्धव यांनी धुळीस मिळवली. आता हे ‘रालोआ’तील सर्व ३०-३२ घटकपक्ष या पुढे मोदी यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार आहेत. तसा ठरावच या बैठकीत मंजूर झाल्यामुळे उद्धव यांनी हे लोटांगण का घातले असावे, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

‘रालोआ’च्या या बैठकीस पार्श्‍वभूमी होती ती राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची. उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यांत भाजपने दणदणीत यश मिळवले असले, तरीही आपल्या मर्जीचा राष्ट्रपती करण्यासाठी भाजपच्या भात्यात काही हजार मतांची तूट आहे आणि नेमकी तेवढीच मते ही शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला असता, तर मोदी-शहा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मनसुबे पाण्यात गेले असते. त्यामुळे भाजपलाही शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे भागच होते. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या ‘एअर इंडिया’ने जमिनीवर उतरवलेल्या विमानास पुन्हा उड्डाण करण्याची अनुमती देणे, शिवसेनेने लोकसभेत घातलेल्या गोंधळानंतर त्यामुळेच भाजपला भाग पडले होते. तरीही शिवसेनेच्या तथाकथित ढाण्या वाघाची ही अचानक शेळी कशी झाली, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो! या प्रश्‍नाचे उत्तर बाकी कोणी नाही तरी काँग्रेसने देऊन टाकले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘खंबाटा एअरलाइन्स’चा संदर्भ देऊन शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि भाजपचे बोलके पोपट किरीट सोमय्या तर आपल्याकडे महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची अनेक कागदपत्रे असल्याचे सांगत होते! आता त्या कागदपत्रांचे काय झाले, असा सवाल काँग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केला आहे. या प्रश्‍नाच्या उत्तरातच शिवसेनेच्या कोलांटउडीचे रहस्य दडलेले तर नाही ना, या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची जबाबदारी ही शिवसेनेइतकीच भाजपवरही आता आली आहे. अन्यथा, मुंबईत पारदर्शक कारभारावरून माजलेले रणकंदन ही निव्वळ बोलाचीच कढी ठरेल.

शिवसेनेने भाजप आणि विशेषत: मोदी तसेच शहा यांच्यापुढे पांढऱ्या रुमालात हात बांधून पत्करलेल्या या शरणागतीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सत्तेचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरले आहे! शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून शिवसेनेने विधिमंडळात रुद्रावतार धारण केल्यामुळे आता हे सरकार कोसळलेच, असे मांडे मोदीलाटेमुळे गारठून गेलेले दोन पक्ष मनातल्या मनात खात होते. मात्र, तेव्हाही फडणवीस यांनी धूर्त राजकीय खेळी केली आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भेटीनंतर शिवसेनेने आपला घोडा दोन घरे मागे घेतला होता. तरीही शिवसेनेचा भाजपला असलेला तीव्र विरोध कायमच होता. आता मात्र या शरणागतीनंतर त्याबाबत काही स्पष्टोक्‍ती करण्याऐवजी उद्धव ठाकरे हे ‘व्हेंटिलेटरवर असलेली युती कासवगतीने पुढे सरकत आहे!’ असे बाष्कळ विनोद राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या मराठी चित्रपटांचा संदर्भ देऊन करू पाहत आहेत. मात्र, त्यामुळे मूळ प्रश्‍न अनुत्तरितच राहतो आणि त्यातच शिवसेनेच्या भविष्यकालीन वाटचालीचा मार्ग दडलेला आहे. अर्थात, केंद्रीय सत्तेपुढे लोटांगण घालण्याची ही शिवसेनेची काही पहिलीच वेळ नाही. अगदी आणीबाणीत शिवसेनेने असेच लोटांगण घातले होते. तेव्हाही त्याची कारणे मराठी माणसाने ओळखली होतीच! मात्र, अस्मितेच्या गर्जना करणाऱ्या शिवसेनेने हे असे मवाळ आणि मचूळ पाऊल का उचलले, याची कारणे कधी ना कधी बाहेर येतीलच. तूर्तास तरी या बैठकीच्या निमित्ताने मोदी यांना आणखी एक भाऊ मिळाला, एवढ्यापुरतेच या बैठकीचे फलित मर्यादित आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial artical