बुलफायटिंगचे क्रौर्य

जयप्रकाश प्रधान
मंगळवार, 11 एप्रिल 2017

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून आपल्याकडे बरेच रणकंदन माजले आहे. ती चर्चा ऐकल्यानंतर बैल व माणूस यांच्यातील झुंजीचा स्पेनमधील खेळ पाहिला होता, त्याची आठवण जागी झाली. त्यातील क्रोर्य थरकाप उडविणारे  असते.

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून आपल्याकडे बरेच रणकंदन माजले आहे. ती चर्चा ऐकल्यानंतर बैल व माणूस यांच्यातील झुंजीचा स्पेनमधील खेळ पाहिला होता, त्याची आठवण जागी झाली. त्यातील क्रोर्य थरकाप उडविणारे  असते.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत किंवा तमिळनाडूमधील जल्लिकट्टूच्या शर्यतींना, त्यातील क्रौर्यामुळे बंदी घालण्यात आली होती. पण सर्वसामान्य जनतेत या शर्यती कमालीच्या लोकप्रिय असल्याने सरकारला त्या निर्णयाचा पुनर्विचार करणे भाग पडले. अंगावर काटा आणणाऱ्या, बैल आणि माणूस यांच्या प्रत्यक्ष झुंजीच्या अशाच स्पर्धा स्पेन, पोतुर्गालमध्येही होत असतात. ‘बुलफायटिंग’ या नावाने त्या ओळखल्या जातात. स्पेनच्या भटकंतीत, या खेळाचे जागतिक महत्त्वाचे मैदान मानल्या जाणाऱ्या सिव्हिली येथील ‘बुलरिंग’ला भेट देऊन, बुल व बुलफायटर यांच्या ‘फायटिंग’चा एक छोटा सामनाही प्रत्यक्ष पाहिला होता. त्याच्या आठवणी आपल्याकडच्या चर्चेमुळे जाग्या झाल्या.

या लढतीत क्रौर्याची अक्षरशः परिसीमा गाठली जाते. बैलाची किंवा माणसाचीही निर्घृण हत्या त्यात होऊ शकते. या खेळावर त्वरित बंदी आणावी, अशी मागणी करणारा वर्गही त्या देशामध्ये आहे. पण या खेळाची लोकप्रियता अफाट असून, स्पेनच्या ‘सांस्कृतिक विभागा’ने २०१४-१५ मध्ये त्यावर जनमत चाचणी घेतली, त्या देशामध्ये पैसे खर्च करून पाहण्यासाठीची, करमणुकीची जी विविध साधने उपलब्ध आहेत, त्यात ‘बुलफायटिंग’ खेळाने दहाव्या क्रमांकाचे स्थान मिळविले. 

सिव्हिली शहरात फिरत असताना, ठिकठिकाणी ठळकपणे दिसत होत्या, त्या बुलफायटिंगच्या जाहिराती. त्यासाठी दहा जूनपासून शंभर युरोपर्यंतचे तिकीट होते. सिव्हिलीमधील बुलरिंग (खेळाचे मैदान) हे जगातील एक नामांकित मैदान म्हणून ओळखले जाते. या खेळाला स्पेनमध्ये ‘टोरिडा’ असे म्हणतात. टोरो म्हणजे बैल व ‘टोरोडो’ बैलाशी झुंज देणारा माणूस. सुमारे १४ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले स्टेडियम खचाखच भरला होता. प्रेक्षकांचा उत्साह तर अक्षरशः ऊतू चालला होता. मैदानात चिलखतासारखे जाकीट घातलेला एक माणूस व त्याच्या एका हातात अणकुचीदार भाला व दुसऱ्या हातात लाल रंगाचे मोठे कापड होते. समोर चांगल्या जाडजूड शिंगांचा धष्टपुष्ट बैल दिसत होता. टोरोडो बैलासमोर लाल रंगाचा पडदा फडकवी व ते पाहून जणू चवताळल्यासारखा तो बैल त्याच्या दिशेने अतिशय जोरात येई व शिंगाने त्याला ढुशी देण्याचा प्रयत्न करी. पण टोरोडो मोठ्या कौशल्याने त्याला हुलकावणी देत, बाजूला सटकत असे. चार-पाच वेळा असे झाल्यानंतर तो बैल चांगलाच बेभान झाला. प्रेक्षकांचा आरडाओरडा क्षणाक्षणाला दोन-तीन वेळा खाली पडलासुद्धा... आता तो बैलाच्या पायांनी तुडवला जाणार... काळजाचा ठोका अगदी चुकला... पण तो क्षणात उठून लांब पळाला...

त्याने लाल कापड फडकवल्यांतर बैल परत त्याच्या दिशेने चवताळल्यासारखा झेपावला... आता काय होणार? त्याच क्षणी टोरोडोने हातातल्या तीक्ष्ण टोकाच्या भाल्याने बैलावर प्रहार केला... बैल जखमी झाला... यावर कमालीचा बेभान होऊन टोरोने टोरोडोवर हल्ला चढवला. पण टोरोडो सज्ज होता... त्याने भाल्याने बैलाला पुरता जायबंद केला... टोरो अक्षरशः रक्तबंबाळ झाला... ते दृश्‍य पाहावत नव्हते... पण टोरोला त्या स्थितीत पाहून प्रेक्षकांनी सारा स्टेडियम डोक्‍यावर घेतला... त्याही अवस्थेत टोरो, टोरोडोच्या शरीरात शिंग खुपसण्याचा प्रयत्न करीत होता. पुढे आम्ही पाहूच शकलो नाही. अखेर टोरोडो निर्घृणपणे टोरोवर भाल्याचे असंख्य प्रहार करून त्याला भोसकून मारतो आणि तो टोरोडोचा विजय मानण्यात येतो. नंतर त्या बैलाचे मटण विजयोत्सव म्हणून खाल्ले जाते.

स्पेनमध्ये व्यावसायिकपणे पूर्वीपासून हा खेळ खेळला जातो. मार्च ते ऑक्‍टोबर हा त्याचा सीझन. यात बैलाची निर्घृण हत्या होत असली तरी आजच्या काळात बैल हा प्राणी केवळ या खेळामुळेच जिवंत राहिला आहे, असे सांगण्यात आले. यात टोरोप्रमाणेच टोरोडो हासुद्धा जबर जखमी होऊन त्याच्याही जीवावर बेतण्याची भीती असतेच. 

बुलफायटिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळाच स्पेनमध्ये आहेत. अठरा वर्षे वयानंतर त्या शाळेत प्रवेश मिळतो आणि दोन-तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतल्यावर त्यांचा प्रत्यक्ष सराव सुरू होतो. सिव्हिली येथील या Plaza Tors De Sevilla स्टेडियमचे मैदान गोलाकार आहे. १७६१ मध्ये ते बांधण्यात आले. मग त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. चौदा हजार प्रेक्षकांबरोबरच राजा, महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठी तेथे स्वतंत्र बॉक्‍सेसची व्यवस्था आहे.

या स्टेडियमला एकूण पाच दरवाजे आहेत. एकातून बैल मैदानात सोडले जातात, तर दुसऱ्यातून बुलफायटर प्रवेश करतो. तिसरे गेट हे ‘हॉस्पिटल’ गेट आहे. जखमी टोरोडोला या गेटमधून बाहेर नेले जाते. या दरवाजाच्या समोरच एक अद्ययावत शस्त्रक्रियागृह आहे. त्यात तातडीची शस्त्रक्रिया, औषधोपचार यांची व्यवस्था आहे. स्टेडियममध्येच म्युझियम आहे. तेथे ‘पराक्रमी’ बैल आणि बुलफायटरची चित्रे लावली आहेत. या खेळाची प्राचीन परंपरा, राजमान्यता याची माहिती देणारी भव्य छायाचित्रेही पाहिली. स्टेडियमच्या टोकाला एक चर्च आहे. त्यात प्रार्थना करून टोरोडो मैदानात उतरतो...

स्पेन हे या खेळाचे निर्माते राष्ट्र मानले जात असले, तरी पोतुर्गाल,मेक्‍सिको,पेरू,फ्रान्स आदी राष्ट्रांमध्येही हा खेळ लोकप्रिय आहे. पण प्रत्येक ठिकाणच्या खेळाच्या पद्धतींत थोडेफार फरक आहेत.

Web Title: editorial artical jayprakash pradhan