ई-कॉमर्सला आले वास्तवाचे भान

कौस्तुभ मो. केळकर
मंगळवार, 14 मार्च 2017

मोठ्या डिस्काउंटच्या बळावर ई-कॉमर्स कंपन्यांनी रिटेल बाजारपेठेत अल्पावधीत मोठे यश मिळविले. पण डिस्काउंटवर आधारित व्यवसाय हा शाश्वत स्वरूपाचा व्यवसाय नाही हे समोर आले आहे. या कंपन्यांना आता वास्तवाचे भान येत असून, त्यांनी आपल्या व्यवसाय पद्धतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. 

मोठ्या डिस्काउंटच्या बळावर ई-कॉमर्स कंपन्यांनी रिटेल बाजारपेठेत अल्पावधीत मोठे यश मिळविले. पण डिस्काउंटवर आधारित व्यवसाय हा शाश्वत स्वरूपाचा व्यवसाय नाही हे समोर आले आहे. या कंपन्यांना आता वास्तवाचे भान येत असून, त्यांनी आपल्या व्यवसाय पद्धतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. 

ई - कॉमर्स अर्थात ई- रिटेल क्षेत्रातील ‘फ्लिपकार्ट’, ‘इन मोबी’ या कंपन्या या वर्षी आपल्या व्यवसायाची दशकपूर्ती करत आहेत. परकी गुंतवणूकदारांचे पाठबळ, मोठे डिस्काउंट, छापील किमतीपेक्षा कमी दराने विक्री आणि जाहिरातींचा धडाका यांच्या जोरावर अल्पावधीत त्यांनी व्यवसायाची मोठी वृद्धी केली, प्रचंड ग्राहकवर्ग मिळविला. हे पाहून पारंपरिक पद्धतीने रिटेल व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आश्‍चर्यचकित झाल्या. परंतु, पारंपरिक रिटेल व्यवसायातील काही मुरब्बी उद्योगपती डगमगले नाहीत. ‘‘आमची कंपनी अशा किंमतीत विक्री करू शकत नाही. कारण यातून होणाऱ्या तोट्यासाठी आम्हाला कोणी भांडवलपुरवठा करणार नाही,’’ असे काही वर्षांपूर्वी ‘बिग बझार’( फ्युचर ग्रुप)चे संस्थापक किशोर बियाणी म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून गेले. ‘‘आम्ही अवास्तव सवलती देऊन विक्री करणार नाही. आम्ही उत्तम दर्जाचे कपडे योग्य किंमतीला विकणार आहोत आणि यासाठी तरुण वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. किमती कमी करून ई- रिटेल कंपन्यांबरोबर आम्ही स्पर्धा करणार नाही.’’ असे ‘ट्रेंड इन’ हे ऑनलाइन फॅशन स्टोअर सुरू करताना आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रमुख कुमारमंगलम्‌ बिर्ला यांनी म्हटले होते. ही दोन्ही वक्तव्ये द्रष्टी ठरली असून, ई- रिटेल क्षेत्रातील कंपन्यांना आता वास्तवाचे भान आले आहे, याचे हे निदर्शक आहे. काही दिवसांपूर्वी ‘स्नॅपडील’ कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात सुरू केली आहे. कंपनीचे सहप्रवर्तक कुणाल बहल यांनी गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई- मेलमध्ये नमूद केले आहे, की ‘कंपनी मोठ्या कठीण कालखंडातून जात आहे. आपण व्यवसाय करताना काही चुका केल्या. या सर्वांवर मात करण्यासाठी मी स्वतः आणि रोहित बन्सल यांनी आमच्या वेतनात १०० टक्के कपात केली आहे. अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी वेतनकपात स्वीकारावी. आपल्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या वित्तीय संस्थांनी आपली कंपनी नफ्यात येण्यावर भर दिला आहे आणि त्यासाठी काही कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.’ ‘फ्लिपकार्ट’ कंपनीने ग्राहकांपर्यंत त्वरित माल, वस्तू पोचवणारी स्वतःची कुरियर सेवा बंद करून टाकली. या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या वित्तीय संस्था जाग्या झाल्या असून, या वर्षातील जानेवारी महिन्यात ‘फायडालिटी इन्वेस्टमेंट्‌स’ने ‘फ्लिपकार्ट’मधील आपले गुंतवणुकीचे मूल्य ३६ टक्‍क्‍यांनी घटवले आहे, तर डिसेंबर २०१६ मध्ये ‘मॉर्गन स्टॅन्ले’ने ‘फ्लिपकार्ट’मधील आपले गुंतवणुकीचे मूल्य ३८ टक्‍क्‍यांनी घटवले आहे. या वित्तीय संस्थांनी ई- रिटेल कंपन्यांच्या मागे नफा दाखवा, असा धोसरा लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वित्तीय संस्थेने एखाद्या ई - रिटेल कंपनीमधील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य घटवले तर ती वित्तीय संस्था या ई- रिटेल कंपनीमध्ये सहसा नव्याने गुंतवणूक करत नाही. यामुळे ई- रिटेल कंपन्यांचा नवीन भांडवल स्रोत घटत आहे आणि यामुळे या कंपन्या परिस्थितीचे वास्तव स्वीकारत आहेत. 

 ई- रिटेल कंपन्यांची व्यवसाय पद्धती (बिझनेस मॉडेल) हे डिस्काउंटवर आधारित आहे. मोठ्या डिस्काउंटमुळे त्यांचा ग्राहकवर्ग टिकून आहे. परंतु, या प्रकारे व्यवसाय वाढवला तरी नफा मिळत नाही हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल. उपलब्ध माहितीनुसार ३१ मार्च २०१५ अखेर फ्लिपकार्ट कंपनीचे उत्पन्न ७७२ कोटी रुपये होते, तर तोटा १०९६ कोटी रुपये होता. ३१ मार्च २०१६ अखेर कंपनीचे उत्पन्न १९५२ कोटी रुपये, तर तोटा २३०६ कोटी रुपये होता. ‘स्नॅपडील’बाबत ३१ मार्च २०१५ अखेर उत्पन्न ९३३ कोटी रुपये, तोटा १३२८ कोटी रुपये, तर ३१ मार्च २०१६ अखेर उत्पन्न १४५७ कोटी रुपये, तोटा ३३१६ कोटी रुपये होता. या सर्व आकडेवारीतून डिस्काउंटवर आधारित व्यवसाय पद्धती हा काही शाश्वत स्वरूपाचा व्यवसाय नाही हे समोर येऊ लागले आहे आणि या सर्वातून ई- रिटेल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या वित्तीय संस्था आपला हात आखडता घेत असून अनेक कठोर पावले उचलत आहेत. उदाहरणार्थ, टायगर ग्लोबल फंडने ‘फ्लिपकार्ट’ला ‘लेट अस बाय’ आणि ‘मिन्त्रा’ या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यास भाग पडले, तर बजेट हॉटेल कंपनी ‘ओयो रूम्स’ला त्याची कमकुवत स्पर्धक कंपनी ‘झो रूम्स’ विकत घेण्यास सांगितले. तेव्हा काळाची ही पावले ई- रिटेल कंपन्यांनी ओळखणे गरजेचे आहे.

रिटेल क्षेत्रातील व्यवसायाची सल्लागार कंपनी ‘टेक्‍नोपेक’ने आपल्या देशात ई- रिटेलचा व्यवसाय २०१८ अखेर सुमारे एक लाख ३६ हजार कोटी रुपयांपर्यंत पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ई- कॉमर्स हे एक मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे क्षेत्र उदयास येत आहे, ते टिकले पाहिजे, वाढले पाहिजे. कारण आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची गरज आहे. परंतु, या कंपन्यांनी आपल्या व्यवसाय पद्धतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. उगाच, न परवडणारी स्पर्धा करणे कोणाच्याच हिताचे नाही. कारण प्रत्येक व्यवसाय पद्धतीकरिता एक बाजारपेठ उपलब्ध असते, हे लक्षात घेऊन व्यवसाय केला पाहिजे आणि हेच सर्वांच्या हिताचे आहे.

Web Title: editorial artical kaustubh kelkar