चंचल कारभाराचा पुन्हा प्रत्यय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंचल कारभाराचा पुन्हा प्रत्यय

चंचल कारभाराचा पुन्हा प्रत्यय

‘एफबीआय’चे संचालक जेम्स कोमींना तडकाफडकी हटवून डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आपल्या चंचल कारभारामुळे ट्रम्प यांनी स्वतःसमोरील अडचणी वाढविल्या आहेत. 

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे संचालक जेम्स कोमी यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्‍लिंटन यांनी ‘ई-मेल’ पाठवण्यासाठी वापर केलेला खासगी ‘सर्व्हर’ आणि २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी रशियाची घेतलेली कथित मदत या दोन मोठ्या प्रकरणांचा तपास कोमी करत होते. रशियाशी संबंधित असलेल्या प्रकरणात त्यांना ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांबद्दल पुरावे हाती लागल्यामुळे आणि एकूणच हे प्रकरण राजकीयदृष्ट्या नुकसान करणारे असल्यामुळे ट्रम्प यांनी कोमींना हटविल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ‘कोमी हे ‘एफबीआय’ सांभाळण्यासाठी सक्षम आणि लायक नव्हते,’ असे ट्रम्प यांनी या संदर्भातील पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर तीन वेळा झालेल्या भेटीत कोमींनी ‘तुमची चौकशी होणार नसल्याची ग्वाही’ दिल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले आहे. या कारवाईच्या काही दिवस आधी कोमींनी चौकशी समितीसमोर साक्ष देताना ट्रम्प यांनी अनुकूल भूमिका घेतली नाही, तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अधिक व्यापक यंत्रणेची मागणी केली होती. साहजिकच, त्यांची ही भूमिका ट्रम्प यांना रुचली नाही आणि कोमींची हकालपट्टी झाली. मात्र, थेट मुळावर घाव घालून प्रकरण संपवण्याच्या बेतात असलेल्या ट्रम्प यांचा हा प्रयत्न फसल्याची चिन्हे आहेत. ‘हिलरींच्या तपासातील गुप्त माहिती जाहीर केल्यामुळे’, ‘पदाचा गैरवापर केल्यामुळे’, ‘सक्षम नसल्यामुळे’, ‘रशियाशी ओढून-ताणून संबंध जोडल्यामुळे’ कोमींना जावे लागले अशा वेगवेगळे स्पष्टीकरण ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे. 

ट्रम्प यांनी अपेक्षित अशी भूमिका न घेतल्यामुळे सॅली येट्‌स आणि प्रीत भरारा यांच्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून कुऱ्हाड कोसळलेले जेम्स कोमी हे तिसरे वरिष्ठ अधिकारी. निवडणुकीच्या काळात अमेरिकेतील रशियाच्या राजदूतासोबतची मैत्री ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिन यांनी लपवली होती. तसेच अशी मैत्री असल्याचे त्यांनी सातत्याने नाकारले होते. मात्र, प्रसारमाध्यमांना याचा सुगावा लागला. फ्लिन यांच्या सर्व कारभाराची माहिती ट्रम्प यांना होती हे जाहीर होताच, गत्यंतर नसल्यामुळे अखेर ट्रम्प यांनी फ्लिन यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रम्प प्रशासनाच्या गोपनीय गोष्टी आणि माहितीला पाय फुटत असल्याची तक्रार ट्रम्प हे कोमींकडे करत होते. तसेच निवडणुकीच्या काळात तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामांनी आपल्या घरातील संपर्कयंत्रणेवर पाळत ठेवल्याचे आरोप ट्रम्प यांनी केले होते. कोमींनी असल्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत हे जाहीर करताना ट्रम्प यांचे आरोप खोडून काढले. त्यामुळेच, २०१६ च्या निवडणुकीच्या काळात हिलरींची चौकशी करणाऱ्या कोमींचे कौतुक करणारे ट्रम्प, प्रकरण स्वतःच्या अंगाशी येत आहे हे पाहून त्यांना बाजूला सारतील अशी कुणकुण होतीच. ट्रम्प यांनी तसेच केले. आता नवा संचालक नेमून ट्रम्प, डोकेदुखी ठरलेले रशियाचे हे प्रकरण दाबू पाहतील अशी शक्‍यता आहे. 

अमेरिकेतील अंतर्गत गुप्तचर यंत्रणा असलेल्या ‘एफबीआय’चे महत्त्व वादातीत आहे. तिच्या संचालकाला हटविणे सोपी गोष्ट नाही. याआधी, २४ वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत ‘एफबीआय’चे तत्कालीन संचालक विल्यम शेसन्सना नारळ दिला होता. ट्रम्प ज्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते, त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची गच्छंती आणि त्यामुळे उद्‌भवणारे वादळ ट्रम्प यांना आणखी अडचणीत आणू शकते.  

ट्रम्प प्रशासनाला जेमतेम चार महिने पूर्ण होत असताना बाहेर येत असलेली अशी प्रकरणे ट्रम्प यांचा अवघड भविष्यकाळ सूचित करीत आहेत. एखादे प्रकरण हाताळताना लागणारे कौशल्य आणि सहकाऱ्यांमधील समन्वय, यांचा ट्रम्प प्रशासनात अभाव असल्याचे जेम्स कोमी प्रकरणात स्पष्टपणे दिसले. ‘एफबीआय’मध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा नेहमीच होते. कोमींना पदावरून हटवून ट्रम्प यांनी अशा चर्चेला नव्याने तोंड फोडले आहे. असे करतानाच, ‘एफबीआय’च्या अधिकाऱ्यांना आपल्याविरुद्ध वाट वाकडी न करण्याचा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिल्याचे राजकीय जाणकार सांगतात. असे असले तरीही रशियाचे हे भूत ट्रम्प यांचा इतक्‍या सहजासहजी पिच्छा सोडेल असे तूर्तास तरी दिसत नाही. सुरवातीला क्षुल्लक गोष्ट म्हणून हिणवल्या गेलेल्या ‘वॉटरगेट’ प्रकरणाचा पूर्ण आवाका लक्षात यायला तब्बल २६ महिने लोटले होते. थेट ‘व्हाईट हाऊस’पर्यंत धग पोचलेल्या ‘वॉटरगेट’मुळे १९७४च्या ऑगस्टमध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्या सहकाऱ्यांचे आणि रशियाचे गुफ्तगू ट्रम्प दडपू पाहत असल्याची शंका या प्रकरणात आल्यामुळे, अनेकांना ‘वॉटरगेट’चा वास येऊ लागला आहे. एकाचा सुगावा दुसऱ्या सुगाव्याला असे होत होत ‘वॉटरगेट’चे भांडे फुटले होते. या प्रकरणातही रशिया ट्रम्प यांच्या नाकीनऊ आणेल असे दिसत आहे. त्यात, शंका-कुशंकांना वाव ठेवत, विरोधकांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करणे ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची जुनी सवय आहे. तूर्तास तरी यातील कोणतीही शक्‍यता नाकारता येत नाही. हे प्रकरण कितपत तग धरणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र, असा संभ्रम निर्माण करून पुतीन यांनी आपल्या कूटनीतीत आणि ट्रम्प यांच्या अडचणीत भर नक्कीच घातली आहे.