उजव्या विचारवंतांच्या अभावाचे एक वेगळे निदान

राजीव साने
शुक्रवार, 23 जून 2017

सतीश बागल यांचा ‘वानवा उजव्या विचारवंतांची’ हा लेख संपादकीय पानावर (१७ जून) प्रसिद्ध झाला. या लेखातील प्रतिपादनाच्या निमित्ताने या विषयाच्या आणखी काही बाजू पुढे आणणाऱ्या या निवडक प्रतिक्रिया.

सतीश बागल यांचा ‘वानवा उजव्या विचारवंतांची’ हा लेख संपादकीय पानावर (१७ जून) प्रसिद्ध झाला. या लेखातील प्रतिपादनाच्या निमित्ताने या विषयाच्या आणखी काही बाजू पुढे आणणाऱ्या या निवडक प्रतिक्रिया.

सतीश बागल यांचा लेख निरीक्षण म्हणून रास्त असला, तरी त्यात काही संकल्पनांचा घोटाळा झालेला आहे. तो काढायला हवा. ‘डावे/उजवे’चे मूळ सार असे होते, की समतेसाठी स्वातंत्र्य सोडायला तयार असणारे ते डावे आणि स्वातंत्र्यासाठी समता सोडायला तयार असणारे ते उजवे. किंवा लोकशाही ही निव्वळ संख्याशाही न बनता तिच्यात गुणशाही (मेरीटोक्रसी) म्हणून खुली स्पर्धा टिकावी, असे मानणे हे उजवेपणाचे योग्य लक्षण मानता येईल.

भारतात हिंदुत्ववाद्यांना, ज्यांत निष्पक्ष-इहवादी, हिंदूहितवादी आणि हिंदूधर्मवादी अशांची सरमिसळ झालेली आहे, उजवे म्हणण्याची प्रथा का पडली, याचे उत्तर डाव्या विचारांतील काही दोषांमध्ये दडलेले आहे. डावे हे समूहांना न्याय मागतात; व्यक्तींना नव्हे. आख्खा समूह अन्यायग्रस्त ठरविण्याची त्यांना सवय आहे. मूळ ‘आर्थिक अन्यायग्रस्त वर्ग’ ही वर्गीय कल्पना सोडून देऊन भारतातील डाव्यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, स्त्रिया आणि अल्पसंख्यक ही समूहांची यादी प्रसृत केली. त्यांच्या बाजूने पक्षपाती रहायचे असे ठरवून टाकले. एवढ्यावर न थांबता त्यांनी अल्पसंख्याकांची बाजू घेणे म्हणजे इस्लाममधील दोषांविषयी मौन बाळगणे असा अर्थ लावला. जाती आघाडीवर पाहता संघ म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण हे वर्गशत्रू अशीही समीकरणे त्यांनी रुजवली. अशा एकंदरीत वातावरणात हिंदुत्ववाद्यांचा विजय होऊ लागताच डाव्यांचा एकमेव अजेंडा मोदीद्वेष हा बनला. दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववाद्यांनाही इस्लाम हा विरोधी ध्रुव वाटायच्या ऐवजी डावे/पुरोगामी हा सतत आपल्याला झोडपणारा, म्हणून मुख्य शत्रू वाटायला लागला. असे करून हिंदुत्वाने भारतात ‘उजवे’ हा किताब मिळवला आहे.

विसावे शतक हे समता या कल्पनेने झपाटलेले शतक होते. त्यामुळे विचारवंतही त्यातच अडकलेले राहिले. याउलट अस्मिताबाजी करणाऱ्या कोणालाही, (भाषक, जाती इत्यादीसुद्धा) सखोल विचार करण्याची गरजच नसते. कारण वेगळी समाजव्यवस्था कशी व्यवहार्य होईल हा गहन प्रश्न त्यांच्यापुढे नसतोच. अस्मिताबाजांत विचारवंतांची वानवा असणारच. खरी गोष्ट अशी आहे, की ‘इहवादी, बिगर जमातवादी आणि चांगल्या अर्थाने उजवी’ अशी विचारसरणी पुढे न आल्याने तिची रिकामी जागा हिंदुत्ववादी पादाक्रांत करत चालले आहेत. खरी वानवा आहे ती चांगल्या उजव्या विचारसरणीचीच.

वानवा "उजव्या विचारवंतां'ची

Web Title: editorial artical rajiv sane