पहाटपावलं : सुखी माणसाचा सदरा

Mrunalini-Chitale
Mrunalini-Chitale

कौन्सिलिंगसाठी काम करताना शिक्षक, गृहिणी, उद्योगपती, विद्यार्थी, पोलिस अधिकारी अशी विविध क्षेत्रांतील माणसं भेटतात. त्यांचे प्रश्न समजून घेताना नातेसंबंधात निर्माण झालेला ताण शब्दाशब्दांतून जाणवतो. मनात भरून राहिलेला राग, उद्वेग कधीकधी डोळ्यांतून पाझरायला लागतो. त्यामध्ये कधी स्वत:च्या वागण्याविषयी अपराधी भाव असतो, तर कधी अतर्क्‍य पद्धतीनं केलेलं समर्थन असतं. अमुक एक घटना घडली नसती वा तमुक एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नसती, तर मी नक्की सुखी झालो असतो हे सांगतानाचा ठामपणा थक्क करणारा असतो.

आपल्या समस्येला उत्तर मिळून ती पूर्णपणे दूर व्हावी ही अपेक्षा असते. तणावमुक्त सुखी आयुष्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना नि अपेक्षा ऐकताना मला लहानपणी वाचलेली ‘सुखी माणसाचा सदरा’ ही गोष्ट आठवते. एक राजा असतो. तो सतत आजारी असतो. देशोदेशीचे वैद्य येऊन त्याच्यावर उपचार करतात. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही राजाचा आजार बळावत जातो.

अखेरीस एक फकीर उपाय सांगतो. ‘सुखी माणसाचा सदरा राजाला घालायला मिळाला तर तो तत्काळ बरा होईल.’ किती सोपा उपाय! दशदिशांना माणसं रवाना होतात, पण सुखी माणूस काही सापडत नाही. अखेरीस जंगलात झऱ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसलेला एक माणूस भेटतो, छातीठोकपणे सांगणारा, ‘हो, मी सुखी आहे.’ शिपाई सुटकेचा नि:श्वास टाकत म्हणतो, ‘अरे, कधीपासून तुला शोधतोय. मला फक्त तुझा सदरा हवाय.’ सुखी माणूस तोंड भरून हसतो. हसतच सुटतो. शिपाई चमकून त्याच्याकडे पाहतो. त्याच्या अंगात सदराच नसतो. काही गोष्टींचा अर्थ आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवत जातो. अगदी लहानपणी ही गोष्ट वाचली तेव्हा उघड्याबागड्या माणसाकडे सदरा मागणाऱ्या शिपायाचा वेडपटपणा पाहून हसायला आलं असणार. कुमारवयात जाणवलं असेल की सुखी व्हायला केवळ सत्ता आणि संपत्ती पुरेशी नसते. अलीकडे मात्र जाणवतं की काळजीमुक्त जीवन हाच एक भ्रम असतो. सुखी माणसाच्या सदऱ्यासारखा. आपण सर्वजण सुखाच्या मर्यादित कक्षेत जगत असतो. ऑस्कर वाईल्ड या नाटककाराने म्हटलं आहे, ‘जगात फक्त दोन प्रकारच्या शोकांतिका असतात. एक म्हणजे आपल्याला हवी असते ती गोष्ट न मिळणे आणि दुसरी म्हणजे हवी असेल ती गोष्ट मिळून जाणे.’ किती खरं आहे हे. शेवटी सुख आणि दु:ख या मनाच्या अवस्था असतात. हवी ती गोष्ट मिळाल्यावरही सुख दोन हात दूर राहतं. आपल्या हातात राहतं ते फक्त समाधानाचं समजूतदार रोपटं आपल्या अंतरंगात लावणं, रुजवणं. असं करता आलं, तर आहे हे आयुष्य सुकर होऊ शकतं. खूपसं आपल्यासाठी आणि थोडं आपल्या बरोबरींच्यासाठीही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com