मर्म : तणाव आणि संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

बकरी ईद हा सण देशभरातील मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करत असताना, साऱ्यांचेच लक्ष होते ते जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला या सणाचा आनंद मुक्‍तपणे घेता येतो की नाही याकडेच. ‘पृथ्वीवरील नंदनवन’ अशी ख्याती असलेल्या या राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय संसदेने घेण्याच्या काही दिवस आधीपासून तैनात केलेल्या सुरक्षा दलांमुळे तेथे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे.

बकरी ईद हा सण देशभरातील मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करत असताना, साऱ्यांचेच लक्ष होते ते जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला या सणाचा आनंद मुक्‍तपणे घेता येतो की नाही याकडेच. ‘पृथ्वीवरील नंदनवन’ अशी ख्याती असलेल्या या राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय संसदेने घेण्याच्या काही दिवस आधीपासून तैनात केलेल्या सुरक्षा दलांमुळे तेथे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदीमुळे लोक घरातच अडकून पडले होते. शिवाय डिजिटल तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांवरही बंदी घालण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर तेथील जनतेने हा सण तणावपूर्ण वातावरणातच साजरा केला. मात्र आपले नातलग, तसेच मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी त्यांना मोबाईल फोनचा वापर करता आला नाही.

सोमवारी या सणासाठी, तसेच गेल्या शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी काश्‍मीर खोऱ्यातील जनतेला काही काळ सवलत देण्यात आली आणि नागरिकांनीही त्याचा आनंद लुटला, असा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे. सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचे सध्या श्रीनगरमध्ये वास्तव्य असून, ते जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांनीही ईदच्या निमित्ताने श्रीनगरमधील लाल चौकात जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा देऊन त्यांना आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, गेल्या शुक्रवारी संचारबंदी शिथिल करताच उफाळलेल्या हिंसाचारासंबंधात ‘बीबीसी’ व ‘अल-जझिरा’ या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तांची सरकारने गंभीर दखल घेतली असून, दोन्ही वृत्तसंस्थांनी दाखवलेले हिंसाचाराचे व्हिडिओ हे ‘गोलमाल’ करून दाखवण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच काश्‍मीरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत शंका निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय व गुप्तचर खात्याने या वृत्तसंस्थांना आपल्या वृत्तांताची खातरजमा करून देण्यास सांगितल्याने तर लोकांच्या मनात अधिकच संदेह निर्माण झाला आहे. सोमवारी बकरी ईदच्या दिवशी काश्‍मीरमध्ये कोठेही हिंसाचार झाला नाही हा सरकारसाठी मोठाच दिलासा असला तरी, शिथिल केलेली संचारबंदी आणि अन्य निर्बंध तातडीने पुन्हा लागू करण्यात आल्याने तेथील परिस्थितीविषयी संभ्रमाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे अशी परिस्थिती काश्‍मीरमध्ये आणखी किती काळ राहणार, असा प्रश्‍न तणावपूर्ण शांततेत साजऱ्या झालेल्या ईदच्या निमित्ताने समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article