मर्म - संमिश्र स्थित्यंतर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

ऑलिंपिकसह बहुतांश सांघिक खेळांमध्ये दर चार वर्षांनी होणाऱ्या जागतिक स्पर्धांमधून स्थित्यंतर घडते. टेनिसच्या एका मोसमात चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धा होतात आणि त्यातील निकालांनुसार खेळ कोणत्या दिशेने सरकतो आहे, याचे चित्र दिसते. सध्या पुरुष आणि महिला टेनिसमध्ये ही प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे.

ऑलिंपिकसह बहुतांश सांघिक खेळांमध्ये दर चार वर्षांनी होणाऱ्या जागतिक स्पर्धांमधून स्थित्यंतर घडते. टेनिसच्या एका मोसमात चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धा होतात आणि त्यातील निकालांनुसार खेळ कोणत्या दिशेने सरकतो आहे, याचे चित्र दिसते. सध्या पुरुष आणि महिला टेनिसमध्ये ही प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. पुरुषांमध्ये रॉजर फेडरर, तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्स यांच्या कारकिर्दीची तिन्हीसांज झाली आहे. फेडरर ३८, तर सेरेना ३७ वर्षांची आहे. फेडररचे प्रमुख प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच दुखापतींमधून मार्ग काढत आहेत. दोन्ही गटांत नव्या पिढीची प्रामुख्याने तज्ज्ञांना आणि चाहत्यांनासुद्धा प्रतीक्षा आहे. दिग्गजांची पिढी मात्र ‘जुने ते सोने’ ही उक्ती सार्थ ठरविते आहे. या पार्श्‍वभूमीवर सेरेनाने मातृत्वानंतर गेल्या दोन मोसमांत चार वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिला विंबल्डनमध्ये गतवर्षी जर्मनीची अँजेलिक केर्बर, यंदा रुमानियाची सिमोना हालेप आणि गतवर्षी अमेरिकन स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका यांनी हरविले. या तिघींच्या तुलनेत बियांका आंद्रेस्कूचा विजय सर्वाधिक अनपेक्षित आहे. ती केवळ १९ वर्षांची आहे. चारच स्पर्धांत आणि आधीच्या तीन प्रयत्नांत दुसऱ्या फेरीपुढे मजल मारता आली नसताना बियांका यंदा विजेती ठरली. सेरेनाचे वय ३८ आहे, मातृत्वाच्या वेळी प्रकृतीमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर ती पुनरागमन करते आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे आणि ती सहजी हार मानत नाही, हे पाहता तिलाही दाद द्यायला हवी. पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम, ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास, जर्मनीचा अलेक्‍झांडर झ्वेरेव असे खेळाडू ‘टॉप थ्री’समोर सक्षम आव्हान निर्माण करू शकत नसताना रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याच्या रूपाने अनपेक्षित पर्याय निर्माण झाला. सेरेनाप्रमाणेच नदालसुद्धा वाढते वय आणि वाढत्या दुखापतींचा निर्धाराने सामना करतो आहे. यानंतरही त्याने यंदा चारपैकी तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत अंतिम फेरी आणि दोन विजेतीपदे अशी कामगिरी केली आहे. तेव्हा त्याला सलाम करायलाच हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article