भरतवाक्‍य!

ebrahim alkazi
ebrahim alkazi

प्राचीन नाट्यपरंपरेनुसार नाटक संपल्यावर नटांनी रंगभूमीवर येऊन हात जोडून भरतवाक्‍य म्हणायचे असते. एरवी नाटककाराने लिहिलेला शब्द उच्चारणाऱ्या नटांना, आपल्या कृतकृत्यतेच्या भावना स्वत:च्या शब्दांत व्यक्त करण्याची संधी देणारे हे भरतवाक्‍य हा नाटकाच्या खेळाचा खरा शेवट असतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भरत या शब्दाचा एक अर्थ नट असाही आहे. आधुनिक भारतीय रंगभूमीचे एक शिल्पकार इब्राहिम अल्काझी यांच्या देहावसानानंतर ज्येष्ठ-कनिष्ठ नटांची जी मांदियाळी जणू असे कृतज्ञतेचे भरतवाक्‍यच उच्चारण्यासाठी उभे राहिल्याचा भास होतो आहे. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी राजधानी दिल्लीत अखेरचा श्‍वास घेतला. खूप मोठा प्रतिभावान शिष्यांचा गोतावळा आणि अनेक चिरस्मरणीय कलाकृतींचा वारसा मागे ठेवून ते गेले आहेत. अल्काझी शिल्प आणि चित्रकलेचेही भोक्ते होते. अर्थात त्यांचे सख्खे नाते होते ते भारतीय रंगभूमीशीच. 

भारतीय नाट्यसृष्टीचा काहीसा पारंपरिक तोंडवळा बदलून टाकणारे काही भलेबुरे प्रयोग साठोत्तरी कालखंडात सुरू झाले. साचेबद्ध बांधणी, संगीत,  अभिनयाच्या मर्यादा यांचे अडथळे दूर सारत भारतीय रंगभूमीला पुढे नेण्यासाठी खटाटोप सुरू होता. त्या मन्वंतराला खरा सूर सापडून दिला तो अल्काझी यांनी. पारंपरिक साच्यातील रंगभूमीचे क्षेत्र पाश्‍चात्य तंत्र आणि मंत्राच्या स्पर्शाने उजळून निघेल, असे ज्या मोजक्‍या आधुनिक प्रतिभावंतांना वाटत होते, त्यापैकी अल्काझी एक होते. अर्थात लंडनच्या बहुप्रतिष्ठित रंगभूमीवर चोख प्रशिक्षण घेऊन बऱ्यापैकी लौकिक गाठीशी आलेला असताना, तेथेच राहून भरघोस यश संपादन करणे त्यांना शक्‍य होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर नव्या उमेदीने काही करू पाहणाऱ्या भारतीय कलावंतांच्या कळपात ते हलकेच येऊन सामील झाले आणि बघता बघता कलाक्षेत्राचा चेहरामोहरा पालटू लागला.  एम. एफ. हुसेन, सूझा, रझा अशा कितीतरी बेजोड कलावंतांच्या संगतीत राहून अल्काझींनी रंगभूमीवर पाऊल टाकले.

हीच चित्रकार मंडळी पुढे अल्काझींच्या नाटकातील दृश्‍यांवर आधारित चित्रे काढीत असत. चोख अभ्यास आणि गृहपाठ, कठोर शिस्त याबद्दल आग्रही असलेल्या अल्काझी यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या पुढे नावाजलेल्या संस्थेत दीर्घकाळ गुरुपद स्वीकारले. भारतीय परंपरा आणि संस्कृतीमधले विविध रंग आणि प्रवाहांचा अभ्यास केला. त्यातील नाट्य हुडकून ते असे काही पेश केले, की भारतीय रंगभूमी जागतिक रंगभूमीपेक्षा किंचितही उणी नाही, किंबहुना तिचा रथ दशांगुळे वरच दौडतो, याचा बहुतांना साक्षात्कार झाला.

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ संस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली, त्याचे श्रेय नि:संशय अल्काझींच्या धडपडीला द्यावे लागेल. अल्काझी यांनी ओम शिवपुरी, ओम पुरी, नसीरुद्दिन शाह, रोहिणी हट्टंगडी, जयदेव हट्टंगडी, असे एकाहून एक सरस शिष्य तयार केले. गुरुची ओळख त्याला त्याचे शिष्योत्तमच मिळवून देत असतात, या उक्तीच्या सत्यतेसाठी अल्काझींसारखे उचित उदाहरण मिळणे अशक्‍य वाटते. अल्काझी यांनी मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन’, धर्मवीर भारती यांचे ‘अंधा युग’ किंवा डॉ. गिरीश कार्नाड यांचे ‘तुघलक’ अशी अप्रतिम नाटकेही सादर केली.

अल्काझी लंडनच्या रंगभूमीवर साहेबी थाटात वावरले असते, तरी समजू शकले असते. पण त्यांची कर्मभूमी भारतीय रंगभूमी हीच होती आणि तेच त्यांच्याही आनंदाचे निधान होते. आपल्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी पन्नासहून अधिक नाटके सादर केली, आणि असंख्य शिष्य घडवले. तीच नाटके आणि तेच शिष्य आज भारतीय रंगभूमी आणि अभिनयाचे क्षेत्र उजळताना दिसत आहेत. गुरुच्या जाण्याने एक ऐहिक पोकळी निर्माण होते हे मान्य. पण शिष्यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने तो अमरच राहातो. अल्काझींचे यापुढील ‘असणे’ हे असे असणार आहे.-एखाद्या दीपस्तंभासारखे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com