वाद की वितंड!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

लोकशाही म्हणजे राज्यकर्ते निवडण्याची स्पर्धात्मक पद्धत आणि उत्तम वादविवाद हे त्याचे मुख्य मैदान. त्यामुळेच अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या थेट वादविवादाला कमालीचे महत्त्व दिले जाते. त्यानिमित्ताने देशापुढच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची चर्चा होणे अपेक्षित असते. त्यामुळे अमेरिकेत त्याविषयी उत्सुकता असतेच; पण जगभरातील लोकांचेही लक्ष हे वाद वेधून घेतात.

लोकशाही म्हणजे राज्यकर्ते निवडण्याची स्पर्धात्मक पद्धत आणि उत्तम वादविवाद हे त्याचे मुख्य मैदान. त्यामुळेच अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या थेट वादविवादाला कमालीचे महत्त्व दिले जाते. त्यानिमित्ताने देशापुढच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची चर्चा होणे अपेक्षित असते. त्यामुळे अमेरिकेत त्याविषयी उत्सुकता असतेच; पण जगभरातील लोकांचेही लक्ष हे वाद वेधून घेतात. पण दिवसेंदिवस या वादांची पातळी खालावत चालली आहे आणि या घसरणीचा तळ काय असू शकतो, याची झलक ओहावो प्रांतात झालेल्या पहिल्या वादविवादात दिसली. आपल्याकडे चॅनेलवर चालणाऱ्या चर्चांमध्ये आपला मुद्दा मांडण्यापेक्षा दुसऱ्याच्या बोलण्यात अडथळे आणण्यातच मोठे शौर्य आहे, असे मानण्याची नवी पद्धत रूढ होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्यक्षीय उमेदवारांच्या वादाला तरी निदान त्यापेक्षा अधिक उंची असायला हवी, असे मानणाऱ्यांचा या चर्चेने पूर्ण भ्रमनिरास केला. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रस्ताळेपणाची ख्याती एव्हाना सर्वदूर झाली असल्याने त्यापेक्षा वेगळे वर्तन त्यांच्याकडून अपेक्षितच नव्हते. त्यांच्या तुलनेत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन संयमी बोलत होते, परंतु कळीचे धोरणात्मक विषय नेमकेपणाने उपस्थित करून ट्रम्प यांना कोंडीत पकडण्याची संधी त्यांनी पुरेशा प्रभावीपणे घेतली असेही दिसले नाही. एखादा फलंदाज सोपा चेंडू मिळूनही तो सोडून देण्याची सावध खेळी खेळतो, तशी बायडेन यांची शैली होती. अर्थातच एकदोन अपवाद वगळता. त्यामुळे या अर्थानेही या वादाने निराशा केली.

ट्रम्प यांनी आपल्या कारभाराचे समर्थन करताना लावलेला तारसप्तकातला ‘मी’चा स्वर आणि देशातील समस्यांना प्रतिस्पर्धी आणि शत्रू जबाबदार आहेत, हे सूत्र शेवटपर्यंत सोडले नाही. ते रेटून नेण्यासाठी त्यांनी प्रसंगी चर्चेच्या नियमांचीही फिकीर केली नाही. अमेरिकी अर्थव्यवस्था कोविडच्या संकटातही उत्तम कामगिरी करीत आहे, असा दावा त्यांनी केला आणि अर्थातच त्याचे श्रेय स्वतःकडे घेतले. मात्र कोविडमुळे होत असलेला हाहाकार आणि वाढती मृत्यूसंख्या यांची जबाबदारी त्यांनी झटकून टाकली. निवडणुकीच्या तोंडावर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ट्रम्प यांनी २०१८-१९मध्ये केवळ ७५० डॉलर एवढाच प्राप्तिकर भरल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तो मुद्दा निघताच त्याची ‘फेक न्यूज’ अशी संभावना करीत आपण आत्तापर्यंत लाखो डॉलरचा प्राप्तिकर भरला असल्याचे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले. त्यांची शत्रूकेंद्री रणनीती स्पष्ट कळत होती. आपली रेघ मोठी दाखविण्यासाठी दुसऱ्याची छोटी कशी दिसेल, हे पाहण्यावर त्यांचा भर असतो. अमेरिकेतील कोविडबाधितांची आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या चिंताजनक पातळीवर गेली आहे, हे मान्य न करता भारत, चीन व रशिया खोटे आकडे सांगतात आणि त्यामुळे अमेरिकेचे आकडे मोठे वाटतात, हे त्यांचे विधान त्यांच्या या प्रवृत्तीचे एक ठळक उदाहरण. दुसरे म्हणजे धोरणात्मक चर्चेपेक्षा वैयक्तिक हल्ले चढविले गेले. मागच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होत्या हिलरी क्‍लिंटन.

अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याइतकी शारीरिक क्षमता तरी तुमच्याकडे आहे का, असा प्रश्‍न ट्रम्प यांनी उद्दामपणे विचारला होता. त्यावर परराष्ट्रमंत्री या नात्याने आपण ११२ देशांचा दौरा केल्याचे सांगून हिलरी यांनी ट्रम्प यांना गप्प केले होते. यावेळच्या चर्चेतही बायडेन यांना वैयक्तिकरीत्या लक्ष्य करताना ट्रम्प यांनी त्यांना राजकीय कारकीर्दीतील अपयशी असे ठरवून टाकले. त्यांच्या बोलण्यात अडथळे आणले. चिडलेल्या बायडेन यांनीही मग ट्रम्प यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. ‘विदूषक’ अशा शब्दांतही त्यांची संभावना केली. ते जेव्हा वारंवार अडथळे आणत होते, तेव्हा एक वेळ अशी आली, की बायडेन यांनी ‘शट अप’ असे उद्‌गार काढले. चर्चेचे सूत्रसंचालन करणाऱ्या ‘फॉक्‍स टीव्ही’च्या ख्रिस वॉलेस यांची चांगलीच कसोटी लागली. अशा वादविवादांवरून कधीही निवडणुकीच्या निकालांचा अंदाज बांधता येत नाही, हे खरेच. विचारांपेक्षा विकारवश चर्चेविषयी जाणकार व्यक्ती नापसंती व्यक्त करीत असल्या तरी याचा दोष केवळ नेत्यांचा आहे, की एकूणच सामाजिक-सांस्कृतिक वातावरण बिघडते आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महासत्तेच्या लोकशाहीची स्थिती केवळ त्या देशावरच नव्हे तर जगावरही काही प्रमाणात परिणाम करते. त्यामुळेच याचा विचार व्यक्तींच्या पलीकडे जाऊन करायला हवा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article