esakal | बेरजेचा राजकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

ram-vilas-paswan

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतून आलेल्या नेत्यांचा कल बऱ्याचदा प्रस्थापितविरोधी आणि व्यवस्थेच्या बाहेर राहून लढण्याकडे असतो. तसे केले नाही, तर आपण आपल्याच ध्येयाशी काहीतरी प्रतारणा करीत आहोत, असाही अनेकांचा समज असतो. पण केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे राजकीय सूत्र मात्र वेगळे होते. सत्तेतील अस्तित्व टिकवण्यातून, म्हणजे सर्व्हायवलमधून बलवान होण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या निधनाने दीर्घकाळ केंद्रात सत्तेवर राहून ठसा उमटवणारा नेता आपल्यातून गेला आहे.

बेरजेचा राजकारणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतून आलेल्या नेत्यांचा कल बऱ्याचदा प्रस्थापितविरोधी आणि व्यवस्थेच्या बाहेर राहून लढण्याकडे असतो. तसे केले नाही, तर आपण आपल्याच ध्येयाशी काहीतरी प्रतारणा करीत आहोत, असाही अनेकांचा समज असतो. पण केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे राजकीय सूत्र मात्र वेगळे होते. सत्तेतील अस्तित्व टिकवण्यातून, म्हणजे सर्व्हायवलमधून बलवान होण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या निधनाने दीर्घकाळ केंद्रात सत्तेवर राहून ठसा उमटवणारा नेता आपल्यातून गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विश्वनाथप्रताप सिंह, इंद्रकुमार गुजराल, एच. डी. देवेगौडा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग या माजी आणि नरेंद्र मोदी या विद्यमान पंतप्रधानांची नावे घेतली तरी त्यातून भारतातील राजकारणाचे व्यामिश्र स्वरूप लक्षात येते. तथापि, विविध आघाड्यांची सरकारे चालविणाऱ्या  या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात केवळ टिकून राहिलेले नव्हे, तर महत्त्वाची खाती सांभाळलेले पासवान यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

सत्येंद्रनारायण सिन्हा, कर्पुरी ठाकूर, राजनारायण आणि नवनिर्माण आंदोलनाचे प्रणेते जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधील युवकांमध्ये समाजवादी विचारांची मशाल पेटवली. त्यातूनच उत्तरेत मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद यादव, रामविलास पासवान अशी त्या काळची युवक पिढी राजकारणात आली. या सगळ्यांत पासवानांचे वेगळेपण ठळकपणे उठून दिसले. बिहारसारख्या मागास राज्यातील ‘पासवान’ या जेमतेम सहा टक्के लोकसंख्येच्या समाजातून ते पुढे आले.

जन्माने दलित होते तरी त्यांनी समाजाच्या उतरंडीतल्या सर्व घटकांशी, नेत्यांशी सौहार्द जपत सातत्याने बेरजेचेच राजकारण केले. त्यामुळे त्यांच्यावर ‘फाइव्ह स्टार दलित नेता’ अशी टीका झाली तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. ‘दलित म्हणजे अंगावर कळकट, मळकट कपडे घालायला हवेत काय?’ अशी विचारणाही त्यांनी केली होती. तथापि, राजकारणातून समाजकारण करताना त्यांनी मदत मागणारा कोणत्या समाजातील आहे हे कधी पाहिले नाही. त्यांचा समाजवादी कार्यकर्त्याचा पिंड कायम होता. सुरुवातीला त्यांनी स्थापलेली ‘दलित सेना’ हे त्याचे प्रतीक.

भारतीय राजकारणातील जातीयतेचा पोत आणि त्यातून आपल्या राजकारणाला येणाऱ्या मर्यादा यांची पासवानांना पुरती जाणीव होती. त्यामुळे संयुक्त सोशॅलिस्ट पार्टी, जनता पक्ष, लोकदल असा प्रवास करत ते स्वतःच्या लोकजनशक्ती पक्षात २०००मध्ये स्थिरावले. देशाच्या राजकारणात ‘हाजीपूरचे खासदार’ पासवान अशी वेगळी ओळख चार दशकांच्या संसदीय वाटचालीतून ते निर्माण करू शकले. आजारी पडल्यामुळे ४० वर्षांत पहिल्यांदाच यावेळी त्यांनी संसदेच्या अधिवेशनाला हजेरी लावली नाही. लोकप्रतिनिधी मतदारांना कसा बांधील असतो, याचा हा पासवानांनी घालून दिलेला वस्तुपाठ आहे. 

आणीबाणीतील दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आलेल्या पासवानांनी सव्वाचार लाखांवर विक्रमी मताधिक्‍याने हाजीपूरचे नाव देशभर नेले, नंतर आठवेळा त्यांनी हाजीपूरचे प्रतिनिधित्व केले. कामगार, रेल्वे, दूरसंचार, रसायन आणि खते, अन्नधान्य पुरवठा अशी अनेक खाती सांभाळली. तथापि, ते बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. ते ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहिले.

ती त्यांच्या राजकारणाची मर्यादा होती. ज्या मोदींच्या काळात गुजरातमध्ये दंगली झाल्याचे निमित्त करून पासवानांनी केंद्रातील मंत्रिपद सोडले, त्याच मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात ते होतेच! त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळाचा दलित चेहरा असे बिरूदही मिरवले. मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी विश्वनाथप्रताप सिंह यांच्या मंत्रिमंडळात असताना आग्रही भूमिका घेतली. वाऱ्याचा अंदाज त्यांना अचूक येत असे. त्यामुळेच त्यांना लालूप्रसादांनी ‘मौसम वैज्ञानिक’ असे नामाभिधान दिले होते. बिहारच्या विधानसभेसाठी येत्या काही दिवसांत मतदान होईल. लोकजनशक्तीचा झेंडा पासवानांचे पुत्र चिराग यांच्या खांद्यावर आहे. नितीशकुमारांना आव्हान आणि भाजपशी सोबत असे त्रांगडे करत ते रिंगणात आहेत. पासवान यांचा वारसा ते कसा पुढे नेतात, हे या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होईलच. 

Edited By - Prashant Patil