भाष्य : मानवी चेहेऱ्याचे पोलादी नेतृत्व

German Chancellor Angela Merkel
German Chancellor Angela Merkel

अँजेला मर्केल या कुठलाही करिष्मा नसलेल्या महिलेने जर्मनीच्या चॅन्सलर पदावर कर्तृत्वाने छाप पाडली. करुणा, सहानुभूती, समजुतदारपणा, विश्‍वासार्हता, स्थैर्य देण्याची क्षमता हे गुण लोकांना नेत्यांमध्ये हवे असतात. तसे नेते अभावानेच असतात. मर्केल या त्यातील एक.

जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची कारकीर्द येत्या २६ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीनंतर संपुष्टात येणार आहे. २००५ ते २०२१ अशी १७ वर्षे त्यांनी समर्थपणे नेतृत्व केले. त्यांचे राजकीय गुरू हेल्मुट कोल यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे १६व्या वर्षी संपली. कोल यांनी दोन्ही जर्मनीचे एकत्रीकरण झाल्यानंतर देशाची घडी बसविली. मर्केल यांनी देशाला स्थैर्य दिले. आकर्षक व्यक्तिमत्त्व नसल्यामुळे प्रारंभी त्यांचे छायाचित्र छापून त्याखाली "मिस जर्मनी'' असा खवचट शेरा मारणाऱ्या एका जर्मन वर्तमानपत्राने अखेर त्यांच्या यशस्वी कामगिरीला सलाम केला. पूर्वीच्या पूर्व जर्मनीत जन्मलेल्या अँजेला मर्केल वैज्ञानिक. दोन्ही देशांच्या एकत्रीकरणानंतर त्यांनी ‘ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक युनियन’मध्ये प्रवेश केला. 

कोल यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण खाते सांभाळणाऱ्या मर्केल यांनी चॅन्सेलर यांच्या भ्रष्टाचाराचा धिक्कार केला. त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. नेत्याप्रती निष्ठा आणि व्यापक जनहित यात त्यांनी गल्लत केली नाही. २०१७ मध्ये चौथ्यांदा चॅन्सेलर पदाची निवडणूक लढविण्यास त्या राजी नव्हत्या. परंतु संसदेत बहुमत नसल्याने त्यांना पुन्हा एकदा ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षा’शी युती करावी लागली. दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे सरकार त्यांनी दशकभर यशस्वीपणे चालविले. मर्केल यांनी नव्या प्रकारचे राजकीय नेतृत्व जर्मनीस दिले. करुणा, सहानुभूती, समजुतदारपणा, विश्‍वासार्हता, स्थैर्य देण्याची क्षमता हे गुण जगभरच्या लोकांना नेत्यांमध्ये हवे असतात. त्या निकषाला पात्र ठरणारे नेते अभावानेच असतात. त्यांनी उठसूट भाषणबाजी केली नाही. खरेच काही सांगायचे असेल तेव्हाच त्या बोलतात. विज्ञानातील डॉक्‍टरेट असल्याने (क्वांटम केमिस्ट्री) गुंतागुंतीचे प्रश्‍न सोडवितांना त्यांना सोपे गेले. जगातील एक यशस्वी राजकारणी म्हणूनच त्यांची ओळख राहील. आपल्या चॅन्सेलर पदाच्या कारकिर्दीला त्यांनी जर्मन अर्थव्यवस्थेला सातव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणले. जर्मनीला विली ब्रॉन्ट यांच्यानंतर लाभलेल्या त्या आदरणीय चॅन्सेलर ठरल्या. महायुद्धोत्तर काळात विन्स्टन चर्चिलसारख्या लोकप्रिय पंतप्रधानांची कारकीर्द संपली. युरोपात चर्चिल, द गॉल, मार्शल टिटो हे जगाला माहीत असलेले नेते. परंतु अमेरिकेसह युरोपातील अनेक देशात १७ वर्षे दमदार, निष्कलंक कामगिरी कोणाच्याही नावावर नाही. अँजेला मर्केल यांच्या चार चॅन्सेलरपदाच्या कारकिर्दीत ब्रिटनच्या टोनी ब्लेअरपासून जॉन्सनपर्यंत पाच पंतप्रधान झाले. अमेरिकेत जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यापासून जो बायडनपर्यंत चार अध्यक्ष झाले. फ्रान्समध्ये जॅक शिराक ते इमॅन्युअल मॅक्रॉन असे पाच अध्यक्ष झाले. इटली आणि जपानमध्ये प्रत्येकी आठ पंतप्रधान झाले. हे सर्व जी-७ या संपन्न देशातील नेते. इस्राईलच्या गोल्डा मायर, भारताच्या इंदिरा गांधी व ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर यांचीही कारकीर्द गाजली. परंतु मर्केल या कुठलाही करिष्मा नसलेल्या महिलेने कर्तृत्वाने छाप पाडली. प्रारंभी त्यांच्याकडे तात्पुरती व्यवस्था म्हणून पाहिले गेले. त्यांच्या ‘ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक युनियन’ या पक्षाला सक्षम पुरुष नेता मिळेपर्यंत त्या पदावर राहतील, असा लोकांचा समज होता. त्या सर्वांनी मर्केल यांच्या शिकण्याची क्षमता दृष्टिआड केली होती. त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद २०१८ मध्येच सोडले. परंतु त्या पदावर आलेल्याला वर्षभरातच राजीनामा द्यावा लागला. आता मर्मीन लाशेट या जुन्या सहकाऱ्याकडे पक्षाचे नेतृत्व आले आहे. सप्टेंबर २०२१मध्ये तेच चॅन्सेलरपदाचे उमेदवार असतील.

 २००८च्या मंदीच्या काळात युरोपसह जगाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. पश्‍चिम आशियातील निर्वासित स्थलांतरितांच्या प्रश्‍नावर त्यांनी माणुसकीचे धोरण राबविले. कोविड-१९ चे आव्हान पेलतानाही त्यांचे निर्णय तर्कसंगत राहिले. युरोपसह जगातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्‍नी सहमतीने निर्णय राबविले. सर्वांना बरोबर नेण्याचे कसब त्यांच्यात आहे. डोनाल्ड ट्रम्प, बोरिस जॉन्सनसारख्या त्या भावनाप्रधान नाहीत. जस्टिन टुड्रो, इमॅन्युअल मॅक्रॉन या तरुण नेत्यांसारखा त्यांच्यात दिखाऊपणा नाही. मार्गारेट थॅचर यांच्यातील खंबीरपणाला अँजेला मर्केल यांनी माणुसकीची जोड दिली. पश्‍चिम आशियातील बारा लाख निर्वासितांना आश्रय देताना त्यांनी देशातील विरोध बोथट केला. पश्‍चिम युरोपातील अन्य देशांनाही त्यांनी समजावले. अरिष्टात बॅंका वाचवल्या, मग निर्वासितांना का नाही वाचवू शकत असे त्या म्हणत. हे मानवतेचे काम एवढेच म्हणून त्या थांबल्या नाहीत, तर जर्मनीत निर्वासितांबाबत सहानुभूती असलेल्यांना त्यांनी सक्रिय केले. 

पाश्‍चात्य देशात प्रदीर्घ काळ सत्तेत राहणारे नेते अभावानेच असतात. अँजेला मर्केल यांच्या भावी प्रवासाविषयी अनेक तर्क असतील; परंतु त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करायचे आहे. माजी वैज्ञानिक व माजी पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी चॅन्सेलरपदाच्या कारकिर्दीत हवामानबदल हा विषय केंद्रस्थानी ठेवला. पॅरिस कराराच्या मागे मॅक्रॉन आणि मर्केल यांचेच प्रयत्न होते. त्या पर्यावरणमंत्री असताना संयुक्त राष्ट्रसंघाची हवामानविषयक पहिली परिषद बर्लिनमध्ये त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाली होती. हरित वायू नियंत्रणाचे महत्त्व त्यांनी जॉर्ज बुशसह जी-७ देशांच्या नेत्यांना पटवून दिले होते. 

मर्केल सत्ता सोडत असताना जर्मनीसह युरोपला अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे. कोविड-१९चे आव्हान आहेच. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर इतर २७ सदस्य देशांमधील ऐक्‍य टिकविण्याचे आव्हान जर्मन व फ्रान्सला पेलावे लागेल. गेली काही वर्षे युरोपीय संघाची चौकट जाचक आहे, असे म्हणणारे राष्ट्रवादी नि उजवे फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया आदी देशांत डोके वर काढीत आहेत. पोलंड, हंगेरीत युरोपीय संस्कृती पचवू न शकलेली एकाधिकारशाही आहे. नॉर्वे, नेदरलॅंडमध्येही नाझीवादाच्या नव्या आवृत्त्या निर्माण होताहेत. जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, ब्रिटन, स्पेन येथे दहशतवादी घटना घडल्या. युरोप व इस्लामी संस्कृती एकत्र राहू शकत नाही, या धारणेला तेथे धार येताना दिसते. संयुक्त राष्ट्रांच्या १९५१मधील निर्वासितांबाबतच्या कराराची १९६७ मध्ये व्याप्ती वाढून तो जगाला लागू झाला होता. वंश, धर्म, राष्ट्रीयता, विशिष्ट विचारसरणी या आधारावर छळ होणाऱ्यांच्या आश्रय व रक्षणाची जबाबदारी १४५ देशांनी स्वीकारली आहे. अमेरिकेसह युरोपात याच मुद्‌द्‌यावरून टोकाचा राष्ट्रवाद, नवनाझीवाद आकार घेऊ लागला आहे. मर्केल यांच्या उत्तराधिकाऱ्यांसह जगभरच्या संपन्न देशांना त्याचा मुकाबला करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com