esakal | भाष्य : हवाई सामर्थ्याचे वास्तवभान
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात दाखल झालेले राफेल विमान.

चीनविरुद्धच्या ताज्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘राफेल’सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानाच्या हवाई दलातील समावेशाचे स्वागत करायला हवे. मात्र, चीनविरुद्धच्या अनेक आघाड्यांवरील तयारीचा हवाई दलाचे बळकटीकरण हा केवळ एक भाग आहे, याचे भान ठेवले पाहिजे.

भाष्य : हवाई सामर्थ्याचे वास्तवभान

sakal_logo
By
अजेय लेले

चीनविरुद्धच्या ताज्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘राफेल’सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानाच्या हवाई दलातील समावेशाचे स्वागत करायला हवे. मात्र, चीनविरुद्धच्या अनेक आघाड्यांवरील तयारीचा हवाई दलाचे बळकटीकरण हा केवळ एक भाग आहे, याचे भान ठेवले पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फ्रान्समधील एरोस्पेस कंपनी ‘डसॉल्ट एव्हिएशन’ची पाच राफेल लढाऊ विमाने २९ जुलैला अंबालातील विमानतळावर तब्बल सात हजार किलोमीटरचाचा प्रवास पूर्ण करून उतरली. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा होता. जवळपास दोन दशकांनंतर हवाई दलाच्या ताफ्यात पाश्‍चात्य लढाऊ विमान दाखल झाले, हे यामागचे कारण. ‘राफेल’ हे हवाई दलाच्या इतिहासातील सर्वाधिक सक्षम विमानांपैकी आहे. त्याची गणना जगभरातील सर्वश्रेष्ठ विमानांमध्ये होते. ‘राफेल’चे उड्डाणाचे तंत्र, रडार आणि शस्त्रास्त्रे यंत्रणा सर्वोत्तम आहे. 

भारताने ३६ विमानांची मागणी नोंदविली आहे. मात्र, नजीकच्या भविष्यात आणखी काही विमानांची खरेदी होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या परिसरातील हवामान व इतर भौगोलिक वेगळेपण लक्षात घेऊन या विमानात तेरा प्रकारची अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. या विशेष सुधारणांमुळे त्यांची उपयुक्तता आणखी वाढली आहे. भारताच्या पूर्व व पश्‍चिम भागातील हवामान वेगळे आहे. त्यामुळे, प्रतिकूल हवामान आणि उंचीमुळे कार्यक्षमता कमी न होणाऱ्या अशा विमानाची आपल्या देशाला गरज होतीच. पुढच्या वर्षअखेरीस सर्व ३६ विमाने भारतीय भूमीवर उतरणे अपेक्षित आहे. ‘राफेल’ हे एकाच हल्ल्यात अनेक लक्ष्यभेद करणारे वैशिष्ट्यपूर्ण विमान आहे. ते ४.५ व्या पिढीचे (४.५ जनरेशन) लढाऊ विमान समजले जाते. पाकिस्तानचे ‘एफ - १६’ किंवा चीनच्या ‘जेएफ-२०’ या लढाऊ विमानांच्या तुलनेत ‘राफेल’ सर्वाधिक सक्षम आहे. ते युद्धचाचणी घेण्यात आलेले विमान आहे, हे त्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य. ‘जेएफ-२०’ हे पाचव्या पिढीचे म्हणजेच राफेलपेक्षाही अद्यायावत विमान असल्याचा चीनचा दावा आहे. अर्थात राफेलचे वैशिष्ट्य हे की त्याची वैशिष्ट्ये केवळ कागदावरची नसून प्रत्यक्ष युद्धातही त्यांची उपयुक्तता कसास लागलेली आहे. सीरिया, अफगाणिस्तान आणि लिबियातील अनेक महत्त्वांच्या मोहिमांमध्ये ‘राफेल’ने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘राफेल’ खरेदीबाबत कराराची प्रक्रिया सुरू होती.

जवळपास एक दशक ही प्रक्रिया सुरू होती. जानेवारी २०१२ च्या अखेरीस भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली. भारतीय हवाई दलात सहभागी होण्यासाठी ‘राफेल’ प्रमुख स्पर्धक होता. भारताला ६३ अतिरिक्त विमानांसह एकूण १२६विमाने पुरविण्याची ‘मीडियम मल्टीरोल कॉम्बॅक्‍ट एअरक्राफ्ट’ (एमएमआरसीए ) ही निविदाही त्याने यशस्वीरीत्या पार पाडली होती. मात्र, याबाबत पुढील महत्त्वाच्या हालचाली वेगाने झाल्या नाहीत, असे दिसते. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१५च्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारतासाठी पूर्णपणे बांधणी झालेली विमाने खरेदी करण्याची ठरविले. तब्बल चौदा हार्डपॉईंट्‌स असणाऱ्या या विमानाचा पल्ला जवळपास ३७०० किलोमीटर आहे. ते आवाजाच्या दुप्पट वेगाने प्रवास करू शकते. अशा प्रकारच्या लढाऊ विमानाचे सामर्थ्य रडारच्या नजरेतून चुकण्यात नसते. मात्र, ‘राफेल’मध्ये यापेक्षा काही चांगल्या गोष्टी असून त्यामुळे रडारला ते टिपता येत नाही. 

भारताच्या एकूण युद्धक्षमतांचा विचार करून त्या दृष्टीने या विमानाकडे पाहायला हवे. चीन व पाकिस्तानबरोबर एकाचवेळी संघर्षाची शक्‍यता लक्षात घेऊन भारताने नेहमीच त्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानबरोबरील १९७१च्या युद्धात आणि कारगिलमधील संघर्षात अनमोल कामगिरी बजावली. आत्तापर्यंत तरी भारताने हवाई दलाचा युद्धाचे अस्त्र म्हणून फारच मोजका वापर केला आहे. हवाई दल हे प्रहारक्षमता कमाल पातळीपर्यंत वाढवता येणारे दल असते. उंची आणि वेग ही त्याची फार मोठी बलस्थाने आहेत. अलीकडच्या काळात पारंपरिक युद्धात हवाई दलाचा वापर करण्याकडे अतिशय नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. मात्र बालाकोट ‘सर्जिकल स्ट्राइक’मधून भारताने या पारंपरिक विचारात आता आमूलाग्र बदल केला असल्याचे सिद्ध होते.

पारंपरिक युद्धात कोणत्याही आव्हानांचा सामना करायचा असेल तर हवाई दलाकडे अष्टपैलू लढाऊ विमाने असणे गरजेचे आहे. त्यासाठी दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यापासून अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या विमानांची आवश्‍यकता असते. या सर्व कसोट्या ‘राफेल’ यशस्वीरीत्या पूर्ण करते. या लढाऊ विमानात अतिशय चांगले रडार आणि मागोवा घेणारी सेन्सर यंत्रणाही आहे. ती आपले लक्ष्य अचूकपणे ओळखून क्षेपणास्त्रांना त्याप्रमाणे योग्य दिशा देते. ‘राफेल’ वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्रांमध्ये ‘मिका’, ‘मेटेओर’, ‘स्काल्प ईजी’ आणि ‘हॅमर’ आदी प्रमुख क्षेपणास्त्रांचा समावेश होतो. भारतीय बनावटीचे ‘ब्राह्मोस एनजी’ हे क्षेपणास्त्रही या विमानांमधून शत्रूचा अचूक वेध घेऊ शकते. या सर्व क्षेपणास्त्रांमधील यंत्रणा प्रत्यक्ष युद्धादरम्यान एकाचवेळी  वेगवेगळ्या भूमिका बजावू शकतात आणि कोणत्याही संघर्षात अतिशय उपयुक्त ठरू शकतात. 

अर्थात केवळ अद्ययावत उपकरणे, यंत्रे युद्धात विजय मिळवून देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. खरे तर या यंत्रामागे असणाऱ्या माणसांमुळे युद्ध जिंकले किंवा हरले जाते. ही मानवी शक्ती अतिशय निर्णायक ठरते, हेही लक्षात घ्यायला हवे. एवढ्या वर्षांत भारतीय हवाई दलाच्या जवानांनी आपली हिंमत, निर्धार दाखवून दिला आहे. आता ‘राफेल’सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानाच्या बळावर ते गगनाला गवसणी घालतील, यात शंका नाही. खरे तर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’चा समावेश होणे, ही काळाचीच गरज होती. मात्र भारतातील प्रसारमाध्यमांनी विशेषतः इलेक्‍ट्रॉनिक वाहिन्यांनी ज्याप्रकारे ‘राफेल’च्या आगमनाचे वार्तांकन केले, तो निश्‍चितच काळजीचा विषय ठरतो. राष्ट्रीय सुरक्षेचा विषय एखाद्या टीव्हीवरच्या मालिकेप्रमाणे मांडणे हे देशाच्या हिताचे नाही. थिल्लरपणे मांडण्याचा हा विषय नाही.

‘राफेल’सारख्या अत्याधुनिक आणि विश्वासार्ह लढाऊ विमानाची खरेदी करणे, ही एक गोष्ट झाली, तर त्यामुळे आपण जणू काही चीन किंवा पाकिस्तानविरुद्धचे युद्धच जिंकल्याच्या थाटात या घटनेचे प्रक्षेपण करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. या क्षमतांबद्दल बढाया मारताना मर्यादांचे भान राखायला हवे. कोणतेही युद्ध ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असते आणि त्यासाठी आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवायला हवेत. हवाई दलाला लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची मंजुरी आहे. मात्र, सध्या हवाई दलाकडे केवळ तीस तुकड्या आहेत. हवाई दलामध्ये ३६ राफेल विमानांचा समावेश झाल्यावर आणखी फक्त दोन तुकड्या वाढतील. त्यामुळेच माध्यमांचा हा भडकपणा व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य नाही. त्याचप्रमाणे, आपल्याकडे ‘राफेल’ आल्यामुळे आपण आता चीनला घाम फोडू शकतो, हाही निव्वळ भाबडेपणा  आहे, हे नीट समजून घेण्याची गरज आहे. ड्रॅगनची उपाधी मिरवणाऱ्या चीनविरुद्ध बहुविध धोरणांची, तसेच अनेक आघाड्यांवर तयारी करण्याची गरज आहे आणि हवाई दलाचे बळकटीकरण हा त्याचा फक्त एक भाग आहे. ‘राफेल’च्या समावेशाचे स्वागत करायलाच हवे, मात्र त्याचा  गाजावाजा आणि उच्चरवात केलेला प्रचार अनावश्‍यक ठरतो. 
(लेखक सामरिक विश्‍लेषक आहेत.)
(अनुवाद - मयूर जितकर)

Edited By - Prashant Patil