ग्रंथसंस्कृतीच्या जोपासनेची सव्वाशे वर्षे

आनंद हर्डीकर
02.58 AM

महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वात ज्या अनेक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यात ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चाही समावेश आहे. तिचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळा व पारितोषिक वितरण आज (ता. ५) पुण्यात होत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.

महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वात ज्या अनेक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यात ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चाही समावेश आहे. तिचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळा व पारितोषिक वितरण आज (ता. ५) पुण्यात होत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.

इंग्रजी अमदानीत महाराष्ट्रातील पेशवाईच्या अस्तानंतर समाजाच्या सर्व स्तरांत नैराश्‍याचे वातावरण पसरले होते. त्यामुळे आलेली मरगळ दूर करण्याचे प्रयत्न १९व्या शतकाच्या उत्तरार्धातच सुरू झाले. विलायती शिक्षणपद्धतीचा प्रभाव पडून तिकडचे ज्ञान आपणही मिळवायला हवे, ही इच्छा बळावली आणि नव्या राजवटीच्या चौकटीत राहून देशी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करणारे न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासारखे द्रष्टे सुधारक पुढे आल्याने संस्थाजीवनाचा पाया घातला गेला.

 ‘प्रार्थना समाज’, ‘सार्वजनिक सभा’, ‘पुणे नगर वाचन मंदिर’, ‘वेदशास्त्रोत्तेजक सभा,’ ‘वसंत व्याख्यानमाला’, ‘वक्तृत्वोत्तेजक सभा’ यांसारख्या विविध लोकोपयोगी संस्था स्थापन करण्यात आणि त्यांची जोपासना करण्यात न्या. रानडे यांनी घेतलेला पुढाकार घेतला. त्यांनी न्यायमूर्ती म्हणून केलेले कार्य सर्वश्रुत आहे; पण मुंबई विद्यापीठातील मराठीचे शिक्षक, सरकारी अनुवादक आणि पेशवाईतल्या दक्षिणा निधीतून १८५१नंतर दिल्या जाणाऱ्या मराठी अनुवादासाठीच्या प्रोत्साहनपर पारितोषिकांचे परीक्षक, अशा तिहेरी भूमिकेतून त्यांनी केलेले काम फारसे प्रकाशात आलेले नाही. जनसामान्यांत ज्ञानजिज्ञासा अधिकाधिक निर्माण व्हावी म्हणून देशी साहित्याची निर्मिती वाढायला हवी, हे त्यांच्या लक्षात आले. स्वतंत्रपणे अध्ययन, संशोधन करून मग पुस्तके लिहिणे सध्या शक्‍य नसले, तरी पाश्‍चिमात्य ग्रंथांचे सरस अनुवाद मराठीत उपलब्ध व्हावेत म्हणून प्रयत्न करायला हवेत, हे जाणून रानडे यांनी १८७८मध्ये ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी’ ही संस्था स्थापली. ग्रंथनिर्मितीपासून स्वस्तात वितरणापर्यंतच्या सर्व बाबींचा विचार करून संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केली. प्रारंभी त्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.

तथापि, हळूहळू वर्गणीदारांची संख्या रोडावत गेल्याने पाच-सहा वर्षांतच संस्था बंद झाली. पण खचून न जाता रानडे यांनी १८८४मध्ये मुंबईतल्या ‘दक्षिणी भाषेत पुस्तके प्रसिद्ध करणारी मंडळी’ या लांबलचक नावाच्या बंद पडलेल्या संस्थेचा जीर्णोद्धार केला. ‘डेक्कन व्हरनॅक्‍युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ असे तिचे मूळ इंग्रजी नाव. त्या संस्थेजवळ पूर्वीची चार हजार रुपये रक्कम शिल्लक होती. ती नव्या संस्थेकडे वर्ग करण्यात यावी, असे ठरवून न्या. रानडे यांनी १८९४ मध्ये पुण्यातल्या काही विद्वान मित्रांशी चर्चा केली आणि त्याच इंग्रजी नावाने पुण्यात नवी संस्था स्थापन केली. १८७८मध्ये लोकहितवादी त्यांच्या मदतीसाठी धावले; या वेळी मात्र डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्यापासून बाळ गंगाधर टिळक यांच्यापर्यंत आणि ‘ज्ञानप्रकाश’कर्ते हरी नारायण आपटे यांच्यापासून प्रा. चिं. ग. भानू यांच्यापर्यंत चक्क २५ मंडळी एकत्र आली होती. प्रशासन, शिक्षण, न्यायदान, वैद्यकीय सेवा वगैरे विविध क्षेत्रांतील त्या सर्व मान्यवरांनी डॉ. भांडारकरांकडे अध्यक्षपदाची सारी सूत्रे सोपवली. ते त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. पुढे सुमारे तीस वर्षे तेच या संस्थेचे मुख्य पालक राहिले. 

मराठीत प्रकाशित होणाऱ्या अनुवादित आणि स्वतंत्र पुस्तकांचे दोन परीक्षकांकरवी मूल्यमापन करून घ्यायचे, त्यांचे एकमत झाले नाही, तर तिसऱ्या जाणकाराचे मत मागवायचे आणि विचारार्थ येणाऱ्या पुस्तकांना द्यावयाच्या उत्तेजनपर पारितोषिकांबाबतचा होकारार्थी किंवा नकारार्थी निर्णय घ्यायचा, हे प्रारंभीच ठरविण्यात आलेले सूत्र नेहेमीच पाळले गेले. ज्या ग्रंथांना या संस्थेने उत्तेजनपर पारितोषिके दिली,

त्यांची संख्या आणि त्यापेक्षाही त्यांची गुणवत्ता एवढी मोठी आहे, की मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांची स्वतंत्र नोंद व्हायला हवी. प्रारंभापासूनची अनेक परीक्षणे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करून घेतलेली असल्याने आणि सुदैवाने संस्थेतील ग्रंथप्रेमी कार्यकर्त्यांनी मूळ पुस्तकांप्रमाणेच तीही नीट जपून ठेवलेली असल्यामुळे समीक्षकांसाठी मोठा ऐतिहासिक ठेवा उपलब्ध आहे, ही समाधानाची बाब.

न्या. रानडे यांची मार्मिक प्रस्तावना लाभलेल्या पेशवे दफ्तरातील ५० हजार पत्रांमधील निवडक  पाच हजार पत्रांचे संकलन असणारे नऊ खंड संस्थेला कायमच भूषणावह ठरले. काही ग्रंथप्रेमी दानशूरांकडून साह्य मिळवून नव्याने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांना उत्तेजन देण्याचे काम संस्थेने चिकाटीने सुरू ठेवले आहे.

डॉ. भांडारकर यांच्यानंतर श्रीमंत मालोजीराव नाईक-निंबाळकर, रॅंग्लर डॉ. गणेश सखाराम महाजनी, न्या. यशवंत विनायक चंद्रचूड, डॉ. प्र. ल. गावडे यांच्यासारख्या मान्यवरांपासून आजमितीला अध्यक्ष असणारे डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्यापर्यंत अनेक व्यासंगी, विद्वान या संस्थेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आले, हे सर्व मराठी भाषाप्रेमी नागरिकांचे भाग्यच म्हणायला हवे. सुमारे ४० वर्षे निरपेक्षपणे या संस्थेच्या कार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळणारे कै. श्री. ना. ऊर्फ भाऊसाहेब चाफेकर यांचा उल्लेख आवश्‍यक आहे. असे निरलस सेवाभावी कार्यकर्ते संस्थेला लाभत गेले, हे संस्थेचे सुदैव असले; तरी या संस्थेला सरकारकडून, दानशूर व्यक्तींकडून आणि नागरिकांकडूनही भरीव सहकार्य मिळायला हवे. स्वतःच्या मालकीच्या भव्य वास्तूत जवळचा खजिना नीट मांडून ठेवण्याचे जे स्वप्न सध्याच्या कार्यकारिणीने जोपासले आहे; त्याची पूर्तता अशा सहकार्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात व्हावी, ही सदिच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article anand hardikar