मराठीचे वरदान विज्ञानाला गरजेचे

अनिल गोरे
रविवार, 7 जुलै 2019

मराठी शब्द कमी अक्षरी, मराठी वाक्‍ये लहान म्हणून मराठी शाळा रोज चार-पाच तास चालवून अभ्यासक्रम परीक्षेआधी संपून उजळणीही होते. इंग्लिश शब्द जास्त अक्षरी, इंग्लिश वाक्‍ये मोठी म्हणून इंग्लिश शाळा रोज सहा ते आठ तास चालवूनही अभ्यासक्रम वेळेत संपत नाही, उजळणी होत नाही.

विज्ञान आणि गणित हे विषय इंग्लिशमधून शिकण्याच्या ताणामुळे बरेच विद्यार्थी विज्ञान शाखा टाळू लागल्याने गेल्या वर्षी महाराष्ट्रात अकरावी विज्ञानाच्या निम्म्या जागा रिकाम्या राहिल्या. तेव्हा मराठी भाषा माध्यमाला प्राधान्य दिल्यास बालवाडीपासून उच्च शिक्षण, संशोधनापर्यंत विज्ञान शिक्षणाचा दर्जा वाढेल.

मराठी शब्द कमी अक्षरी, मराठी वाक्‍ये लहान म्हणून मराठी शाळा रोज चार-पाच तास चालवून अभ्यासक्रम परीक्षेआधी संपून उजळणीही होते. इंग्लिश शब्द जास्त अक्षरी, इंग्लिश वाक्‍ये मोठी म्हणून इंग्लिश शाळा रोज सहा ते आठ तास चालवूनही अभ्यासक्रम वेळेत संपत नाही, उजळणी होत नाही.

इंग्लिश शाळा व मराठी शाळांमधील सेमी इंग्लिश तुकड्यांत विज्ञान, गणिताचे भाषा माध्यम इंग्लिश केल्यापासून विज्ञान, गणितातील संकल्पना समजणे, त्या मनात रुजण्याचे प्रमाण घटले. हे विषय इंग्लिशमधून शिकण्याच्या ताणामुळे विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शाखा टाळू लागल्याने गेल्या वर्षी महाराष्ट्रात अकरावी विज्ञानाच्या निम्म्या जागा रिकाम्या 
राहिल्या. 

बहुसंख्य मराठी शब्द वाचता, ऐकताच संबंधित वस्तू, भावना, संकल्पना, आकार, काळ, वैशिष्ट्ये सूचित करतात. असे सूचक इंग्लिश शब्द कमी आहेत. मराठी लेखन उच्चाराप्रमाणे, तर इंग्लिश लेखन उच्चाराशी विसंगत! या विसंगतीशी लढताना संकल्पना समजण्यासाठीचे चिंतन, मननाला वाव मिळत नाही. मराठी वाक्‍यांत शब्दक्रम मागे-पुढे करूनही वाक्‍य चुकत नाही; म्हणून मराठी वाक्‍ये सहज सुचतात. शब्दक्रम बदलल्यास इंग्लिश वाक्‍य चुकते. लिहिण्या, बोलण्यापूर्वी शब्दक्रम काटेकोरपणे ठरवावा लागत असल्याने इंग्लिश वाक्‍ये रचताना मनावर ताण येतो. उतारे पाठ झाले, तरी विषय नीट न समजल्याने विज्ञान, गणिताची आवड घटते.

दोन भाषांमधील वरील फरकांमुळे मराठीतून जसे लवकर, सहज, सखोल आकलन होते; आशय सहज, वेगाने व्यक्त होतो, तसे इंग्लिशमधून होत नाही. इंग्लिश व्याकरणातील अंगभूत त्रुटींमुळे इंग्लिशमध्ये सहजता नाही.

पूर्वी सेमी इंग्लिश निवडलेल्या काही पालकांना इंग्लिशमधील अंगभूत त्रुटींमुळे विज्ञान, गणित विषय नीट समजले नाहीत. मराठी माध्यमात असेपर्यंत स्वत:ला विज्ञान, गणित नीट समजले असूनही, त्याची आठवण न ठेवता सायन्समधील इंग्लिश शब्द पाठ करायला कॉलेजमध्ये एखादा महिना कष्ट केलेल्यांना वाटले, की असे कष्ट टाळण्यासाठी त्यांच्या मुलांनी विज्ञान, गणित पहिलीपासून इंग्लिशमधून शिकावे. आपल्या अजाण मुलांसाठी माध्यम निवडणे त्यांच्या हातात होते. पण, इंग्लिशमधील त्रुटी दूर करणे त्यांच्या हातात नसल्याने विज्ञान, गणित विषय नीट न समजण्याची स्थिती त्यांच्या मुलांसाठी इंग्लिश माध्यमातही टिकली. इंग्लिशमधील अंगभूत त्रुटींमुळे मुलांना दहावीपर्यंत गणित, विज्ञान समजण्यातील अडथळे, तसेच मुलांच्या मनावरील ताणाकडे पालकांनी दुर्लक्ष केले. अनेक मुलांची विज्ञान शाखेतील अकरावी, बारावी, उच्च शिक्षणातील कामगिरी ढासळत गेली, हे लक्षात घेऊन दहावीपर्यंत विज्ञान, गणित विषयांबाबत इंग्लिशच्या सक्तीमुळे ताण सोसलेले विद्यार्थी पालकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून आता विज्ञान शाखेतील प्रवेशच टाळतात.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, कृषी (PCBA) विषयांसाठी आता मराठी पुस्तकेही मिळतात. अकरावी, बारावी सायन्स मराठीतून शिकता येते. बारावी सायन्स, तसेच ‘नीट’ मराठीतून होते. काही राज्यांत बीएस्सी, एमएस्सी, बीई, फार्मसी अभ्यासक्रम राज्याच्या भाषा माध्यमात शिकता येतात. तमीळ, हिंदीतून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू झाला. महाराष्ट्रातही मराठी भाषा माध्यमाला प्राधान्य दिल्यास बालवाडीपासून उच्च शिक्षण, संशोधनापर्यंत विज्ञान शिक्षणाचा दर्जा वाढेल. पस्तीस विषयांतील मराठी इंग्लिश पर्यायी शब्द www.marathibhasha.org संकेतस्थळावरून वापरून विज्ञानाला मराठीचे वरदान मिळवून देता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Anil Gore on Marathi Language