स्वतंत्र व्यक्तिमत्व, कणखर नेतृत्व

kamala-harris
kamala-harris

अमेरिकेत उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. कणखर वकील, ॲटर्नी जनरल म्हणून काम करताना दाखविलेली स्वतंत्र व्यक्तिमत्वाची चुणूक आणि सिनेटच्या सदस्य म्हणून लक्षणीय कामगिरी यातून त्यांचे नेतृत्व घडत गेले आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भारतीय अमेरिकन आणि कृष्णवर्णीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे. अमेरिकेतील तेरा लाख भारतीय वंशाच्या मतदारांत त्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. वास्तविक कमला या डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उत्सुक होत्या आणि गेले वर्षभर त्यांचे त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. पक्षाने निवड करण्याकरिता ज्या प्राथमिक फेऱ्या होतात, त्यात कमला हॅरिस यांनी बिडेन यांना कडवी झुंज दिली, पण गेल्या वर्षअखेरीस त्यांनी माघार घेतली. त्या सर्व प्रकरणात त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व म्हणून ठसा उमटला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमला यांच्या मातोश्री शामला गोपालन या भारतीय सनदी सेवेतील अधिकाऱ्याच्या कन्या. १९५९ मध्ये त्या अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात संशोधन करण्यासाठी गेल्या. बर्कले विद्यापीठात तेव्हा अनेक सामाजिक चळवळी आकारास येत होत्या. या चळवळीच्या निमित्ताने शामला यांचा जमैकाचे नागरिक डोनाल्ड हॅरिस यांच्याशी परिचय झाला व त्याचे रूपांतर विवाहात झाले. पुढे वीस ऑक्‍टोबर १९६४ रोजी कमलाचा जन्म झाला.

कालांतराने हे दांपत्य विभक्त झाले. नंतर हॅरिस हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तर कमला आणि त्यांची बहीण माया या आईच्या देखरेखीखाली वाढल्या. काही काळ त्यांचे वास्तव्य माँट्रियल येथे होते.

पहिल्या कृष्णवर्णीय ॲटर्नी जनरल
कमला यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात हॉर्वर्ड विद्यापीठातून १९८६ मध्ये बी. ए.ची पदवी मिळविली. सुरुवातीस ओकलॅंड येथील जिल्हा न्यायालयात त्यांनी १९९०- ९८ या काळात काम केले व एक कणखर वकील म्हणून लौकिक मिळविला. गुन्हेगारांना धाक वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. २०१० मध्ये त्या कॅलिफोर्निया राज्याच्या पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय ॲटर्नी जनरल झाल्या. हे काम करताना त्यांनी त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची चुणूक दाखविली आणि तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यालयाच्या धोरणात्मक दबावापुढे न झुकता गैरव्यवहारात हात असलेल्यांविरुद्ध कणखरपणे उभे राहून अशा मंडळींकडून पाच पट अधिक भरपाई मिळविली. २०१४ मध्ये त्यांचा विवाह वकिली करणारे डग्लस इमॉफ यांच्याशी झाला. २०१६ मध्ये त्यांनी अमेरिकी सिनेटची निवडणूक जिंकली.

प्रचाराच्या झंझावातात स्थलांतरित आणि गुन्हेगारीविषयक कायद्यात सुधारणा, किमान वेतनात वाढ आणि स्त्रियांच्या गर्भधारणेविषयीच्या हक्कांबाबत त्यांनी आवाज उठविला. २०१७ मध्ये सिनेटमध्ये कामाला सुरुवात केल्यावर तपास आणि न्यायविषयक निवड समितीवर त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांच्या आकांक्षेने मोठी भरारी घेतली. २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारीच्या रिंगणात त्या उतरल्या. पण २०१९अखेरीस त्यांनी त्या स्पर्धेतून माघार घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक टीकाकारांचा अंदाज होता, की उपाध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना मिळणार नाही. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निवडून आले तर वयाचा विचार करता कमला हॅरिस यांना या वेळच्या उपाध्यक्ष म्हणून काम केल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत फायदा होईल.

सकारात्मक विचारातून निवड
भारताप्रमाणेच अमेरिकेतही उमेदवाराचा वंश, रंग अगर कूळ यांचा विचार होतो असे वाटते. सध्या स्त्रिया, कृष्णवर्णीय, दक्षिण अमेरिकेतील स्थलांतरित, मूळ अमेरिकन हे सरकारमधील व खासगी क्षेत्रात वरिष्ठ जागांवर काम करणाऱ्या गौरवर्णीयांच्या अन्यायाला बळी पडले आहेत, असे पुरोगामी विचारवंतांना वाटू लागले आहे. सुरुवातीच्या उमेदवार निवडीत झालेल्या विरोधानंतर कमला हॅरिस यांचा उपाध्यक्षपदासाठी जो बिडेन यांनी सकारात्मक विचार केला. एका पाहणीनुसार सहा ते आठ उमेदवारांमधून प्रभावी व्यक्तिमत्व, लोकांवर छाप पाडण्याची कला, आक्रमक वक्तृत्व, निधी संकलन क्षमता आदी गोष्टींचा एकत्रित विचार हा कमला हॅरिस यांच्या निवडीस कारण ठरला. कमला या वंशाने निम्म्या भारतीय व निम्म्या आफ्रिकन (जमैकन) आहेत. कॅलिफोर्निया हा अमेरिकेतील सर्वात सधन प्रांत आणि विचाराने प्रागतिक. अशा वातावरणात अर्थशास्त्राच्या नामवंत विद्यापीठातील प्राध्यापक आणि तितक्‍याच तोलामोलाच्या विद्यापीठात कर्करोगावर संशोधन करणारी आई यांची कमला ही मुलगी. त्या दोघांचाही त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com