esakal | भाष्य : अमेरिकी निवडणूक आणि भारत
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेतील बहुवंशीय मतदारवर्गाचे प्रातिनिधिक छायाचित्र.

जागतिक अर्थसत्तेचा तोल आशियाकडे सरकत असल्याने भारताबरोबर चांगले संबंध, ही आता अमेरिकेची गरज होऊन बसली आहे. चीनच्या आर्थिक, लष्करी महत्त्वाकांक्षेमुळे हा कल अधिक ठळकपणे दिसत आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब अमेरिकी निवडणूक प्रचारात उमटलेले दिसते.

भाष्य : अमेरिकी निवडणूक आणि भारत

sakal_logo
By
दीपक करंजीकर

जागतिक अर्थसत्तेचा तोल आशियाकडे सरकत असल्याने भारताबरोबर चांगले संबंध, ही आता अमेरिकेची गरज होऊन बसली आहे. चीनच्या आर्थिक, लष्करी महत्त्वाकांक्षेमुळे हा कल अधिक ठळकपणे दिसत आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब अमेरिकी निवडणूक प्रचारात उमटलेले दिसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत पॉप्युलर व्होट आणि प्रत्येक राज्यांचे ‘इलेक्‍टोर्स’ यांतून अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेसमध्ये त्या त्या राज्याचं किती प्रतिनिधित्व आहे, यावर ‘इलेक्‍टोर्स’चे प्रमाण ठरते.  कॅलिफोर्निया (५५), टेक्‍सास (३८), न्यूयॉर्क (२९), फ्लोरिडा (२९), इल्यनॉय (२०) आणि पेन्सिल्वानिया (२०) ही सहा राज्ये सगळ्यांत मोठी आहेत. अमेरिकेतील प्रत्येक राज्यांत ठराविक मतदार असतात. त्यामुळे राज्ये एका विशिष्ट पक्षाची हक्काची बलस्थाने होतात. काही मोजकी राज्ये नि:पक्षपाती भूमिका घेतात. अशा राज्यांना ‘स्विंग स्टेट्‌स’ म्हणतात. या वर्षीच्या निवडणुकीत फ्लॉरिडा, पेनसिल्व्हानिया, मिशिगन, ओहायो, कॉलोरॅडो, ॲरिझोना, विस्कॉनसिन, जॉर्जिया, आयोवा आणि नॉर्थ कॅरोलिना ही स्विंग स्टेट्‌स आहेत.

राष्ट्राध्यक्षपदासाठीची चुरस यावेळेस मुख्यतः ओहायो, फ्लोरिडा ॲरिझोना, पेनसिल्व्हानिया आणि विस्कॉन्सिन या स्विंग स्टेट्‌समध्ये होईल. यातील तीन स्विंग राज्यातील मूळ भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या साधारणपणे साडेचार लाख आहे आणि ती निर्णायक ठरू शकते. आतापर्यंत झालेल्या सात कोटी मतदानापैकी तब्बल ५८ टक्के मतदान या स्विंग स्टेटमधून झालेले आहे; जे परिणामकारक ठरू शकते. आतापर्यंत पॉप्युलर मतांमध्ये बायडेन यांची नि:संशय आघाडी आहे. पण त्यावर सगळे ठरत नाही हा खरा घोळ आहे.

अमेरिकेतील भारतीय मतदारांची संख्या या निवडणुकीत ५०.४ लाख असेल, असा एक अंदाज आहे. भारतीय मतदार एकगठ्ठा नाही. मागच्या वेळेस बऱ्याच मतदारांनी हिलरी क्‍लिंटन यांना मतदान केले होते. ही निवडणूक अनेक अंगांनी भारतीयांसाठी महत्त्वाची असेल. कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाची उमेदवारी हा त्यातला एक प्रमुख भाग म्हणावा लागेल. उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी काश्‍मीरवर अकारण टिप्पण्या केल्या, त्यामुळे भारतीय मतदार दुखावला गेला. ट्रम्प यांनी मात्र सावध भूमिका घेतली. भारताने ३७० कलम रद्द केल्यावर, ‘सीएए’ जाहीर केल्यावर, अमेरिकी प्रशासनातून कुठेही नाराजीचा सूर त्यांनी उमटू दिला नाही. अमेरिकेत भारतीय मतदार काही कामाचे नसते, तर ट्रम्प यांनी भारतातील हवा खराब आहे, असे वक्तव्य केल्यानंतर बायडेन लगेच भारतीयांच्या बाजूने उभे राहिले नसते.  जागतिक अर्थसत्तेचा तोल आशियाकडे सरकत असल्याने भारताबरोबर चांगले संबंध ही आता अमेरिकेची गरज होऊन बसली आहे. चीनच्या आर्थिक, लष्करी आसुरी महत्त्वाकांक्षेने हे अधिकच सोपे केले आहे. त्यामुळे बायडेन निवडून आले तरी ते पाकिस्तानबद्दल एकदम वेगळी भूमिका घेऊ शकतील, असे वाटत नाही.

ट्‌म्प आक्रमकपणे पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध उभे ठाकले होते; पण मुळात ट्रम्प हा एक भरवसा नसणारा बेबंद माणूस आहे. बायडेन स्थिर आहेत; पण त्यांची निर्णयक्षमता अशक्त आहे. ट्रम्प यांनी आपल्याला अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर पाठिंबा दिला; पण व्हिसासाठी दिला नाही. या गोष्टीचे दूरगामी परिणाम होतील, याचे कारण स्थलांतरित समाजाचे (ज्यात भारतीय जास्त आहेत) अमेरिकी अर्थकारणात मोठे योगदान आहे.

ट्रम्प-मोदी केमिस्ट्री
ट्रम्प-मोदी एक वैयक्तिक केमिस्ट्री आहे आणि त्या दोघांनीही तिचा आपल्या देशातील जनमानसासाठी धोरणीपणे गवगवा केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे त्यांचे सामरिक स्वारस्य आणि तिथल्या कॉर्पोरेट विश्वाचे हितसंबंध यामुळेच मुख्यत्वे ठरते. ट्रम्प यांचे हाऊडी मोदी आणि मोदी यांचे ‘नमस्ते ट्रम्प’ यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण ठरत नसले तरी याचा एक भावनिक परिणाम असतो. निवडणूक हा काही विचारवंतांचा खेळ नसतोच, तिला एक वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा पकडणारा झोका असतो, तो अशा गोष्टींनी हलतो.

भारताबरोबर तत्परतेने केलेला सामरिक सहकार्याचा ‘बेका करार’ यालाही निवडणुकीचा संदर्भ आहेच. ट्रम्प मतदानाच्या आधी एखादी धोका पत्करणारी, युद्धजन्य चालही खेळूच शकतात. तैवानशी अमेरिकेने केलेल्या संरक्षण करारावर चीनने संतप्त प्रतिक्रिया देतांना अमेरिकी युद्ध-साहित्य कंपन्यांवर बंदीची घोषणा केली; पण तैवानवर हल्ला मात्र केलेला नाही, याचे कारण तसे केले तर ट्रम्प  यांच्यामागे जनमत उसळी मारून उभे राहील आणि त्या संघर्षाचा फायदा त्यांना होईल हे चीन जाणून आहे.

शेवटच्या काही दिवसात कोरोनाशिवाय काहीतरी मुद्दा आणण्याचा त्यांचा डाव फसला. एका महत्वाच्या टप्प्यावर त्यांच्या प्रचाराचा वेग मंदावला जो त्यांना महागात पडणार आहे. आता ते बरे झाले असल्याने दुसरा कोणता मुद्दा ते इतक्‍या कमी वेळात प्रचारात आणतात, यावर त्यांचा खेळ अवलंबून आहे. त्याआधी काही काळ ते जे मुद्दे मांडत होते ते असे. एक, रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेची आर्थिक ताकद वाढवेल. दोन, राष्ट्रीय सुरक्षा व तीन कायदा-सुव्यवस्था. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा ऐरणीवर आला होता; पण ट्‌म्प यांनी चलाखीने त्याला कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्याचे वळण दिले.  

बायडेन निवडून आले तर...
बायडेन निवडून आले तर त्यांचे प्रशासन आशियातील भारत- पाकिस्तानकडे एकाच नजरेने पाहील, अशी शक्‍यता व्यक्त केली जाते. डेमॉक्रॅटिक पक्षातील डाव्या गटाच्या दबावाखाली येऊन बायडेन सरकार भारतविरोधी सूर लावेल, ही संभाव्यता नाकारता येत नाही. मात्र बायडेन सत्तेवर आल्यास त्यांचे सरकार अधिक रचनात्मक असेल आणि त्या सरकारचे धोरण धरसोड वृत्तीचे नसेल. शिवाय, व्यापारी तूट कमी करण्यासाठी जंगजंग पछाडणे, कायदेशीर व बेकायदा स्थलांतराला चाप लावणे आणि इराणला एकाकी पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हवामान बदलाच्या जागतिक व्यासपीठावरून माघार घेणे ही जी धोरणे ट्रम्प प्रशासनाने आक्रमकपणे राबवली, त्यांना बायडेन सरकारच्या परराष्ट्र धोरणात प्राधान्य नसण्याची शक्‍यता आहे. बायडेन यांचे वय ७८ आहे. असाही मतप्रवाह आहे, की बायडेन कदाचित चार वर्षे काम करू शकले नाहीत, तर कमला हॅरिस यांना अध्यक्ष म्हणून लोक स्वीकारणार का? याचे कारण हॅरिस यांच्याकडे हिलरी यांच्याइतकी सहानुभूती नाही.कोरोनाने निवडणुकीचे सगळे आयाम बदलले आहेत.

निवडणूकपूर्व चाचण्या उलटसुलट निदान समोर आणताहेत. एक साशंक अशी थरथर सगळीकडे भरून आहे. मतात थोडा जरी इकडेतिकडे फरक पडला तरी निकाल वेगळे लागू शकतात. शेवटच्या आठवड्यात निवडणूक ही भावनांची दुथडी भरून वाहणारी नदी झाली आहे आणि त्यातले माहीर नावाडी तिथे बेगुमान वल्ही मारत आहेत. कोणतेही अंदाज आणि ते व्यक्त करणारे तज्ज्ञ तोंडावर पडू शकतात, अशी स्थिती आहे. ट्रम्प यांनी आपला वाया गेलेला वेळ समाजमाध्यमांतून भरून काढण्याचे नवे खेळ सुरु केले आहेत. त्यामुळेच तर ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये तंत्रज्ञानाच्या विषयावर लेख लिहिणाऱ्या केविन रॉस यांनी एक इशारा दिलाय. ते सांगतात, ‘उदारमतवाद्यांनो ऐका, ट्रम्प पुन्हा निवडून येणार नाहीत, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फेसबुकवर अधिक वेळ घालवून पाहा.’ या अधिकाधिक अवघड होत चाललेल्या चुरशीच्या खेळाकडे जग डोळ्यांची देवळे करून बघते आहे. 
(लेखक साहित्यिक, अभिनेते व जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image