esakal | पर्यटनातून काढू आनंदाचे ‘पीक’
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism

पर्यटनाचे अनोखे दालन

  • राज्यात ८०० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे
  • शेतकऱ्यांचाही उत्साही सहभाग  
  • शेतीतील अर्थकारणाला आधार देऊ शकणारा उपक्रम 
  • संस्मरणीय अनुभव घेण्याची शहरवासीयांना संधी.
  • लवकरच राज्याचे सर्वंकष धोरण

पर्यटनातून काढू आनंदाचे ‘पीक’

sakal_logo
By
धनंजय सावळकर

जागतिक पर्यटन संघटनेमार्फत १६ मे हा दिवस ‘कृषी पर्यटन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सध्या ‘कोरोना’च्या साथीमुळे सर्वच क्षेत्रे संकटात आली आहेत. याचा मोठा फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तरीही ‘कोरोना’चे संकट आटोक्‍यात आल्यानंतर कृषी पर्यटनाला निश्‍चितच चांगले दिवस येतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या ‘कोरोना’च्या साथीमुळे सर्वच क्षेत्रे संकटात आली आहेत. याचा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. ‘कोरोना’चे संकट संपल्यानंतर हे क्षेत्र हळूहळू उभारी घेण्याचा निश्‍चितच प्रयत्न करेल; पण या सर्वांमध्ये कृषी पर्यटनाला मोठा वाव असणार आहे. ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी दक्षता म्हणून पुढील मोठा काळ लोकांना गर्दी टाळण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एकांत असलेले, गर्दी नसलेले पर्यटन करण्याकडे लोकांचा कल असेल. यासाठी लोकांसमोर अर्थातच कृषी पर्यटनाचा सुलभ पर्याय उपलब्ध असेल. ‘कोरोना’चा मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे भविष्यात कृषीउत्पन्न, पशुपालन याबरोबरच ‘कृषी पर्यटन’ हा पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना आधार देणारा ठरू शकणार आहे.     

सन २००८ पासून जागतिक पर्यटन संघटना १६ मे हा दिवस ‘कृषी पर्यटन दिवस’ म्हणून साजरा करते. कृषिप्रधान भारतात आणि महाराष्ट्रातही हा दिवस साजरा केला जातो. अमेरिका, जपान, इटली यासारख्या देशात यापूर्वीच फार्म टुरिझम व रूरल टुरिझम / कन्ट्रीसाईड टुरिझम या नावाने कृषी पर्यटन नावारूपाला आले आहे. तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, इस्राईल यासारख्या छोट्या देशांतही ही संकल्पना चांगलीच रुळलेली आहे.

दिवसेंदिवस शहरीकरण वाढत चालले असले, तरी प्रत्यक्षपणे वर्षानुवर्षे शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, वाहतूक कोंडीचा, मॉल संस्कृतीचा, संगणकीय मनोरंजन साधनांचा व एकंदरीतच धकाधकीच्या नागरी जीवनमानाचा कंटाळा आलेला असतो. अशावेळी वीकेंडला शहरापासून दूर, एखाद्या खेडेगावात निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निवांतपणे राहावे, शेतीशी निगडित बाबींत मन रमवावे, असे वाटते. अशा विचारप्रक्रियेतूनच कृषी पर्यटनाचा जन्म झाला आहे.

ग्रामीण संस्कृतीची ओळख
नेहमीच्या पठडीतील पर्यटनस्थळांना भेटी देण्यापेक्षा अनुभव समृद्ध (एक्‍सपिरियेन्शल टुरिझम) पर्यटनाकडे अलीकडच्या पिढीचा कल वाढू लागला आहे. यामुळेच साहसी व कृषी पर्यटनात वाढ होताना दिसते आहे.

कृषी पर्यटनामुळे ग्रामीण संस्कृतीची ओळख व निसर्गाशी तादात्म्य राखण्याचा अनुभव पर्यटकांना देता येतो. झाडाखाली पंगत जेवण, बैलगाडीतून फेरफटका, विहिरीत पोहोणे, गोठ्यात गाईचे दूध काढणे, वाहत्या ओढ्यात पाय सोडून बसणे, फळबागेत स्वतः फळे तोडणे असे अनेक अनुभव पर्यटकांना घेता येतात. काही हौशी कृषी पर्यटन केंद्रचालक तर पर्यटकांना शेजारच्या खेड्यात नेऊन कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम यासारखे उपक्रमही दाखवतात. सायंकाळी त्यांना भजन, पोवाडा, लावणी, आदिवासी नृत्य यासारख्या लोप पावत चालेल्या कलांचे दर्शन घडवतात. असा मनोरंजनाचा अनुभवही पर्यटकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतो.

सामाजिक व आर्थिक पैलू 
कृषी पर्यटनाचे सामाजिक व आर्थिक अंगही उत्साहवर्धक आहे. डेअरी, कोंबडीपालन, शेळीपालन यासारखाच कृषी पर्यटन हा पूरक व्यवसाय म्हणून नावारूपास येत आहे. कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा हा व्यवसाय आहे. मुक्कामाच्या रूमचे भाडे, जेवणाचे बिल, तसेच परत जाताना पर्यटक खरेदी करत असलेला शेतमाल असे तिहेरी उत्पन्नाचे स्रोत कृषी पर्यटनात आहेत. शेती किफायतशीर होत नसली, तरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होऊ शकणारा हा उपक्रम आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असलेल्या भागात हा व्यवसाय जाणीवपूर्वक राबविणे आवश्‍यक आहे. 

केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास आज रोजी ८०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे अस्तित्वात आहेत. नाशिकमध्ये वाढत असलेले वाईन टूरिझम, विदर्भातील संत्रा, कोकणातील आंबा, डहाणूची चिक्कू बाग असे अनेक उपक्रम ही कृषी पर्यटनाचीच विविध अंगे आहेत. अनेक उपक्रमशील, कल्पक शेतकरी यासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्र सरकारही शेती विभागाच्या विविध योजना अशा केंद्रांवर राबविण्यास तयार आहे. त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना अन्नसुरक्षा प्रशिक्षण, प्रभावी व्यवस्थापन प्रशिक्षण व ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने सर्वंकष धोरण आखले जात आहे. एकंदरीतच आगामी काळात कृषी पर्यटनाचे भवितव्य उज्वल आहे, हे निश्‍चित.
(लेखक राज्य सरकारच्या पर्यटन खात्याचे सहसंचालक आहेत.)

loading image