इ-सापची इ-कथा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 9 एप्रिल 2018

सदरील कथेशी प्राचीन बोधकथा लेखक इसापशी काहीही संबंध नाही. हा इ-साप हा इ-मेलच्या जमान्यातला आहे व त्याने लिहिलेली कथा ही बोधकथा नसून इ-कथा आहे. इ-कथा म्हंजे एखादी कथा वाचल्यावर वाचकाला ‘ईऽऽऽ’ असे ओरडावेसे वाटेल ती कथा! अशी एक इ-कथा आमच्या वाचनात आली. तीच येथे सांगत आहो. आता ऐकाच! :

सदरील कथेशी प्राचीन बोधकथा लेखक इसापशी काहीही संबंध नाही. हा इ-साप हा इ-मेलच्या जमान्यातला आहे व त्याने लिहिलेली कथा ही बोधकथा नसून इ-कथा आहे. इ-कथा म्हंजे एखादी कथा वाचल्यावर वाचकाला ‘ईऽऽऽ’ असे ओरडावेसे वाटेल ती कथा! अशी एक इ-कथा आमच्या वाचनात आली. तीच येथे सांगत आहो. आता ऐकाच! :

जेहेत्ते कालाचे ठायी एकदा एका रानात खूप मोठा पूर आला. पूर कसला प्रलयच तो! पाण्याचे लोंढे रानावनात धावू लागले. नद्यांनी ठाव सोडला, सागराने भूमी गिळली. गावेच्या गावे उठली आणि जंगलातल्या प्राण्यांची तर हालत बेकार झाली. बिळात पाणी घुसले, गुहेत साचले, झाडेझुडेही वाहून जाऊ लागली. जिकडे तिकडे पुराचे गढूळ पाणी घुसले. लहानमोठे कितीतरी प्राणी, हाती-दाती लागेल, त्या आधाराला धरुन स्वत:चा जीव वाचवू लागले. रानातल्या उंच टेकडीवर एक झाड उभे होते, ते मात्र पुराच्या पाण्याला मुळीच घाबरले नव्हते. निश्‍चलपणे मुळे रोवून ते उभे होते...

‘‘ते पहा झाड...आपण त्याच्यावर सुरक्षित राहू, चला, चला!,’’ पाण्यात पंजे मारत कोल्हा ओरडला. सगळे पोहत पोहत झाडाकडे निघाले. झाडाचा बराचसा डोलारा पाण्याच्या वरच होता. बरेचसे खोड पुरात बुडाले होते.
‘‘थॅंक्‍यू कोल्ह्या, कधी कधी बरा वागतोस लेका!’’ बिबळ्याने चपळाईने उडी मारत एक जाडसर फांदी गाठून काहीश्‍या कृतज्ञतेने म्हटले. 

‘‘कसचं कसचं!’’ झडझडून ओले अंग झाडत कोल्होबा म्हणाले. पण त्या झाडावर आधीच दोन-तीन उंदरांनी मुक्‍काम ठोकला होता. त्या दोन-तीन उंदरांचे गेल्या काही दिवसांत तीन डझन उंदीर झाले होते. पण ते एक असो.
‘‘मियांऊ?’’ मागून आवाज आला. चक्‍क एक भिजलेले मांजर पंजा पुढे करुन बिबळ्यालाच पंजा मागत होते. मांजर पाहून आधी उंदीर जाम दचकले. ही मावशी कुठून आली? बिबळ्याला प्रश्‍न पडला. 

‘‘चू चू...हिला नका घेचू, सर! पुरातून कसेबसे वाचलो ते काय हिच्या नरड्यात जाण्यासाठी? चुको, चुको!! उंदीर चिवचिवले. पण स्वभावाने कितीही बेकार असली तरी शेवटी मावशी आहे, असा विचार करुन बिबळ्याने तिला झाडावर घेतलेच. पाठोपाठ आलेल्या एका कुत्र्यानेही झाडावर जागा मिळवली, तेव्हा मांजरी फिस्कारली : ‘‘हे कुत्तरडं कुठून आलं आता? डोक्‍याला ताप!’’ 

गावातली कुत्री-मांजरी आज रानात इथं एकत्र कशी काय? अशी कोल्होबाच्या मनात शंका आली.

‘‘आज इकडे कुठे टॉमीजी?’’ कोल्होबाने चौकशी आरंभली.
‘‘काय करणार? गावात पाणी घुसलंय...छपरावर बसून होतो रात्रभर...सकाळी एका ओंडक्‍यावरून वाहत रानात आलो. मध्येही ही तुमची मनी भेटली...’’ टॉमीजींनी खुलासा केला. त्यांच्या गप्पा रंगतात तेवढ्यात सळसळत आलेल्या सापाने फांदीला वेटोळे मारून आपला जीव वाचवला. पाठोपाठ एक मुंगूसही चढले.

‘‘अरे, हे काय डोंबोली स्टेशन वाटलं का? कित्तीही गर्दी झाली तरी पब्लिक आपलं चढतंच आहे डब्यात!’’ कोल्होबा भडकला होता. बिबळ्याही चवताळला होता. बोरिवलीत त्यानेही एकदा लोकल पकडणारी माणसे बघितली होती. असे करता करता एकमेकांचे शत्रू असलेले अनेक प्राणी त्या झाडावर चढून बसले. तेवढ्यात एक लाकूडतोड्या पोहोत पोहोत झाडाशी आला.

‘‘घाबरू नका प्राण्यांनो, पूर ओसरला की सगळं नीट होईल...’’लाकूडतोड्या दिलासा देत म्हणाला. 

‘‘तुम्ही हे झाड तोडू नका म्हंजे मिळवली!,’’ मुंगूस म्हणाले.
‘‘नाही तोडणार..,’’ लाकूडतोड्या आश्‍वासन देत म्हणाला,‘‘ हे झाड हरभऱ्याचे आहे!’’
तात्पर्य : हा केवळ एक जुमला होता...प्रत्येक गोष्टीला तात्पर्य असलेच पाहिजे का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang