ढिंग टांग : प्रेरणेचा वाघ!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मा. नानासाहेब फडणवीस यांसी, काल रात्री डिस्कवरी च्यानलवर आपल्या आदरणीय नमोजींचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा कार्यक्रम पाहिलात का? पाहिला असेलच. देशातील कोट्यवधी लोकांनी तो बघितला. मी तर बोलून चालून पडलो महाराष्ट्राचा वनमंत्री! मला तो बघणे भागच होते. त्या कार्यक्रमात आदरणीय नमोजींनी तात्पुरता भाला बनवून दाखवला.

मा. नानासाहेब फडणवीस यांसी, काल रात्री डिस्कवरी च्यानलवर आपल्या आदरणीय नमोजींचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा कार्यक्रम पाहिलात का? पाहिला असेलच. देशातील कोट्यवधी लोकांनी तो बघितला. मी तर बोलून चालून पडलो महाराष्ट्राचा वनमंत्री! मला तो बघणे भागच होते. त्या कार्यक्रमात आदरणीय नमोजींनी तात्पुरता भाला बनवून दाखवला. डोंगीतून नदी पार केली. मुसळधार पावसात भिजले आणि कढीलिंबाचे पाणीसुद्धा प्यायले!! हे थोरच होते. त्या कार्यक्रमामुळे आदरणीय नमोजी ह्यांच्याबद्दलचा आदर वाढला. आदर वाढायला खरे तर आता मनात अगदी जागाच उरली नव्हती. एका मराठी मनात किती आदर मावणार याला काही लिमिट? पण ते असो.

आदरणीय नमोजी ह्यांनी जिम कॉर्बेटच्या जंगलात सर्व्हायव्हलिस्ट बेअर ग्राइल्ससोबत अनोखे जंगल पर्यटन केले. ते बघून थक्‍क झालो. ‘या कार्यक्रमातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले,’ असे उद्‌गार नंतर ग्राइल्सने काढले. तेही स्वाभाविकच होते. त्यांचे ते धाडस बघून मला वेगळीच प्रेरणा मिळाली आहे. ऐका!

‘वाघ आणि माणूस’ ह्या नावाचा कार्यक्रम दोन भागांत दूरदर्शनसाठी करावा, अशी माझी कल्पना आहे. प्रचंड टीआरपी मिळेल, याची ग्यारंटी आहे. मी बेअर ग्राइल्सची भूमिका निभावेन आणि तुम्हाला घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात जाईन! तिथे ताडोबाचा जलाशय आहेच, शिवाय गरज पडली तर अंधारी नदीसुद्धा आहे.

आपणही छोट्या डोंगीतून रिव्हर क्रॉसिंग वगैरे करू. मी तुम्हाला वाघबिघ दाखवीन!! ते सारे आपण चित्रित करू. तुम्ही पहिल्या भागात असाल आणि दुसऱ्या भागात मी आपले बांदऱ्याचे परममित्र मा. उधोजीसाहेब यांना नेईन! (पण हे युती टिकली तरच हं!) कशी वाटली माझी आयडिया? कृपया कळवावे. 
आपला नम्र. सुधीर्जी मुनगंटीवार, वनमंत्री.
ता. क. : हा कार्यक्रम साधारणत: इलेक्‍शनच्या आधी प्रक्षेपित करावा, असे वाटते. कळवा. सु. मु.
* * *
प्रिय सुधीर्जी, चंद्रपूर किंवा ताडोबाला ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चा देशी कार्यक्रम करणे, ही कल्पना स्तुत्य आहे. पण त्यात मी नको, मा. उधोजीसाहेब नकोत आणि बेअर ग्राइल्सच्या भूमिकेत तुम्ही नकोच नको!! हा कार्यक्रम चांगला असला तरी डेंजरस आहे. महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी असताना स्वत: जीव धोक्‍यात घालून वाघासमोर उभे राहावे, हे मला पटत नाही. दुसरे म्हणजे काठीला चाकू लावून त्याचा भाला तयार करण्याची कला माझ्याकडे नाही. तुमच्याकडेही नसावी!! डोंगीत बसणे किती अवघड असते, हे तुम्हालाही वेगळे सांगायला नको. हल्ली मी प्लॅस्टिकच्या खुर्चीतही जरा जपूनच बसतो!! डोंगीतून कसले नदी पार करताय? अंधारी नदीत मगरी आहेत, असे मला कळले आहे. 
राहता राहिले कढीलिंबाचे पाणी! एकवेळ मी काठीला चाकू लावून भाला बनवीन. काटक्‍या तासून बाणसुद्धा बनवीन. डोंगीतून अंधारी नदीच्या उगमापर्यंत जाण्याची माझी तयारी आहे, पण कढीलिंबाचे पाणी प्यायला लावू नका!! प्लीज!! 
आपण आदरणीय नमोजींसारखे धाडशी नाही आणि तुम्ही बेअर ग्राइल्ससारखे ऊर्जावान नाही. त्यामुळे हा विचार काढून टाका. कार्यक्रम बघून काही प्रेरणा मिळालीच असेल तर आणखी झाडे लावा. तो निरुपद्रवी प्रकार आहे. हा विषय पुन्हा काढू नये, ही विनंती. 
आपला. नानासाहेब फ.
ता. क. : तुमची कल्पना आमचे परममित्र मा. उधोजीसाहेब यांच्या कानावर घातली. त्यांनी ‘नीट ऐकू येत नाही’ असे सांगून फोन ठेवलान!! जे काही थोडेफार ऐकू आले, ते लिहिण्यासारखे नाही. असो. फ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang