ढिंग टांग - ढकला आणि ओढा!

Dhing-Tang
Dhing-Tang

सदू : (नेहमीच्या खर्जात फोनवर) जय महाराष्ट्र!
दादू : (अनिच्छेने) जय महाराष्ट्र! कोण बोलतंय?..लौकर बोला, नाव सांगा!
सदू : (खर्ज कंटिन्यू...) दादूराया, मी बोलतोय!
दादू : (अनिच्छा कंटिन्यू) बोला पटापट! मला वेळ नाहीए शिळोप्याच्या गप्पा मारायला!
सदू : (चिडून) मी शिळोप्याच्या गप्पा मारायला फोन केलेला नाहीए! पूरग्रस्तांच्या भयानक पर्वडीकडे तुम्हा लोकांचं लक्ष वेधावं म्हणून केलाय! राज्यकर्ते ना तुम्ही?
दादू : (आढ्यतेने) आमचं लक्ष आहे! कुणी सांगायला नको आम्हाला! ठेवा फोन!!
सदू : (खवचटपणे) का? मेगाभरती चालू आहे वाटतं!!
दादू : (उसळून) तुम्ही का जळता?
सदू : (संयमानं) आम्ही कशाला जळू? महापुरानं तिकडे सगळी वाट लागली आहे! पार दैना झालीये सगळ्याची!
दादू : (ठणकावून) ओसरला पूर आता! ठेवा फोन!!
सदू : (आणखी संयमानं) जनजीवन सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे! दोन महिन्यांवर निवडणुका आल्या आहेत! मी म्हणतो, एवढं काय अडलंय? पुढे ढकला ना निवडणुका!!
दादू : (थक्‍क होत) आँ?
दादू : (आणखी थक्‍क होत) आँ...आँ?
सदू : (वैतागून) आँ काय आँ? एवढं आश्‍चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? बऱ्या बोलानं निवडणुका पुढे ढकलायला सांगा तुम्ही!! नाहीतर परिणाम वाईट होतील!!
दादू : (भानावर येत) आश्‍चर्य आहे, खरंच आश्‍चर्य आहे!! महापुराचं संकट आलेलं असताना निवडणुकांचा विचार डोक्‍यात येतोच कसा?
सदू : (सात्त्विक संतापाने) येतोच कसा म्हंजे? एवढं मोठं संकट आधी निस्तरायला नको? निवडणुका काय पुनर्वसनापेक्षा महत्त्वाच्या आहेत?
दादू : (खोट्या कौतुकानं) दादरमध्ये बसून काय काय समजतं तुला सदूराया! कम्माल आहे तुझी!!
सदू : (चवताळून)...आणि तुम्ही बांदऱ्यात बसून पुराची मजा बघताय का? धिक्‍कार आहे तुम्हा लोकांचा!! पूरग्रस्तांना पाठवलेल्या मदतीच्या पाकिटांवरसुद्धा जाहिराती करणारे तुम्ही ! पुराच्या पाण्यात पोहत पोहत प्रचार करणारे तुम्ही!! तुम्ही...तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नये!! 
दादू : (शांतपणे) अंगावर शिंतोडा तरी उडाला का रे तुझ्या पावसाचा? महापूर कसा दिसतो, हे लांबून तरी पाहिलंस का?
सदू : (नेहले पे दहला...) तुमच्या बांदऱ्यातून दिसला का सांगलीचा पूर? 
दादू : तुमच्या डोक्‍यात सदानकदा निवडणुकीच्या विचारांचा महापूर आलेला असतो ना! आमचं तसं नाही!! आमची माणसं मदतकार्यात राबतायत उन्हातान्हात!
सदू : (सर्द होत) उन्हातान्हात? पाऊस पडतोय तिथं मिस्टर! उन्हं कुठून येणार?
दादू : तेच म्हणत होतो मी! आमचे कार्यकर्ते पावसापाण्यात राबतायत! तुमच्यासारखं उंटावरून शेळ्या हाकत नाही आम्ही! म्हणे, निवडणुका पुढे ढकला! कॅहीत्तरीच तुझं!! 
सदू : (चिडून) तुम्ही निवडणुका पुढे ढकलणार नसाल, तर...तर आम्ही बहिष्कार घालू!
दादू : (कुत्सितपणे) फू:!! ऐकेल कुणीतरी!! लोकांनी ऑलरेडी घातलाय तुमच्यावर बहिष्कार! आठवा गेली निवडणूक!!
सदू: (दरडावून) दादूराया... पर्सनल होण्याचं कारण नाही हां! आधीच सांगून ठेवतोय!!
दादू : (समजूत घालत) बाबा रे! निवडणुका येतात नि जातात, हारजीत होतच असते, हे कोणी म्हटलं होतं? 
सदू : (वाद घालत) कोणी म्हटलं होतं?
दादू : (डोळे मिचकावत) आपलंच वाक्‍य आहे! नेमेचि येणाऱ्या निवडणुकांना कशाला घाबरायचं? तुम्ही म्हणायचं ‘ढकला’, आम्ही म्हणायचं ‘ओढा!!’ चालू द्यात!! कोरडं राहून जितकं जमतंय तितकं राजकारण करावं माणसानं!! काय कळलं? जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com