ढिंग टांग : किंगपिन!

ब्रिटिश नंदी
Friday, 23 August 2019

रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. कोर्टाच्या पायरीवरुन आरोपी ऊर्फ किंगपिन, हातोहात पळाल्याची खबर आली, आणि आमच्या तपास यंत्रणेचे धाबे दणाणले. एवढ्या सुरक्षारक्षकांना चकवून किंगपिन पळालाच कसा? भूमीत गडप झाला की अस्मानात उडाला?

रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. कोर्टाच्या पायरीवरुन आरोपी ऊर्फ किंगपिन, हातोहात पळाल्याची खबर आली, आणि आमच्या तपास यंत्रणेचे धाबे दणाणले. एवढ्या सुरक्षारक्षकांना चकवून किंगपिन पळालाच कसा? भूमीत गडप झाला की अस्मानात उडाला? किंगपिनला अदृश्‍य होण्याची तिबेटी कला येत असेल का? अचानक अंतर्धान पावलेल्या किंगपिनला आता शोधायचे कुठे? सारी यंत्रणा एकमेकांना विचारू लागली...

आता कुठे शोधायचे किंगपिनला? असा सवाल वरिष्ठांना त्यांच्या वरिष्ठांनी केला असता दोघांनाही अनुक्रमे सवाल आणि जबाब धड न देता आल्याने प्रकरण अखेर त्यांच्याही वरिष्ठांकडे गेले. वरिष्ठांच्या वरिष्ठांनी त्यांना (म्हंजे वरिष्ठांना) विचारले की ‘किंगपिन पळालाच कसा?.. पकडा त्याला!’’ वरिष्ठांनी वरिष्ठांच्या आदेशाबरहुकूम पडत्या फळाची आज्ञा स्वीकारत आपल्या कनिष्ठांना विचारले, ‘‘किंगपिन पळालाच कसा...धरा त्याला!’’ वरिष्ठांच्या आज्ञेबरहुकूम कनिष्ठांनी त्यांच्या कनिष्ठांना विचारले, ‘किंगपिन पळालाच कसा...झडपा त्याला!’’ कनिष्ठ तर काय हुकुमाचेच ताबेदार, त्यांनी आपल्या कनिष्ठांना तेच सांगितले. कनिष्ठांनी त्यांच्याहीपेक्षा कनिष्ठ असलेल्या आम्हाला सांगितले, ‘‘किंगपिन पळालाच कसा...खेचा त्याला!’’ येथे आम्ही कामाला लागलो. पुढले रामायण पुढीलप्रमाणे -
‘किंगपिन म्हंजे काय?’’ या कोड्यापासून आम्ही तपासकार्याला सुरवात केली. शब्दकोश धुंडाळला असता विविध अर्थ मिळाले. ‘यंत्रातील महत्त्वाचा मोठ्या आकाराचा खिळा अथवा बोलट’ हा अर्थ वाचल्यावर मात्र आम्ही शब्दकोश घाईघाईने मिटला!! 

सदरील किंगपिनने कोर्टातून बाहेर पडतानाच (पक्षी : कोर्टाच्या पायरीवरच) अदृश्‍य झाला असला तरी त्याच वेळी त्याच्या घराच्या दिशेने भरधाव गेलेल्या एका मोटारीत तो असावा, असा कयास आम्ही बांधला. ते खरे ठरले. परंतु, घराकडे गेलेल्या मोटारीत किंगपिन नव्हताच, असे मागाहून कळाले.

किंगपिनच्या घरातील सर्व कोपरे व फर्निचर तपासले असता संशयित वाटणारा एकही बोलट अथवा खिळा न आढळल्याने तपास यंत्रणा (हातातील पाने व पक्‍कड हालवत) परतल्या. परिणामी, वरिष्ठांच्या वरिष्ठांनी वरिष्ठांना पुन्हा फैलावर घेतले. वरिष्ठांनी वरिष्ठांच्या समोर खालमानेने उभे राहूनते सारे ऐकून घेतले.

‘तुमच्या असल्या ढिलेपणामुळेच तपासयंत्रणा खिळखिळी झाली आहे! एक साधा खिळा तुम्हाला सापडूं नये?’’ वरिष्ठांच्या वरिष्ठांनी चिक्‍कार ऐकवले. किंगपिन सांपडला नाही, तर वरिष्ठांचे वरिष्ठ हाती लागेल त्या बोलट अथवा खिळ्याने वरिष्ठांचे हाल हाल करतील, हे ओळखायला वेळ लागला नाही.

पुन्हा एकवार किंगपिनच्या शोधात माणसे बाहेर पडली. रात्र वैऱ्याची होती व काळोखाचीही! शहरातील गल्लीबोळ धुंडल्यानंतरही किंगपिनचा ठावठिकाणा लागला नाही. तपास अधिकाऱ्यांच्या चपलांचे खिळे निसटले पण व्यर्थ! तपासयंत्रणा हवालदिल झाल्या. तपास यंत्रणांचे एक वेळ ठीक, पण टीव्हीक्‍यामेरावाल्यांचा तर होशच उडाला. किंगपिनचा शोध आपणच लावू, अशा ईर्षेने टीव्हीवाले अहोरात्र धावाधाव करीत होते. रात्र संपली, दिवस उजाडला, पण किंगपिन अथवा बोलट अथवा महत्त्वाच्या खिळ्याचा मागमूसदेखील नव्हता. अखेर सायंकाळी अचानक किंगपिन प्रकट झाला! कोठून अवतरला? कधी अवतरला? आपल्याला कसा दिसला नाही? अशा अनेक सवालांनी हैराण झालेल्या तपास अधिकाऱ्यांनी किंगपिनला धरण्यासाठी धाव घेतली. 

तपास अधिकाऱ्यांचे एक पथक किंगपिन असलेल्या घराकडे गेले. घराचे गेट बंद होते. वरिष्ठांचे वरिष्ठ वरिष्ठांना म्हणाले- ‘‘मारा उडी, धरा त्याला’’ वरिष्ठांनी कनिष्ठांना सांगितले- ‘‘मारा उडी, पकडा त्याला’’ कनिष्ठांनी कनिष्ठांना फर्मावले- ‘‘मारा उडी, उखडा त्याला’’...शेवटी आम्हीच उडी मारून गेट ओलांडले. गेटला कडी नव्हतीच. तेथे एक लांबलचक खिळा आडवा घालण्यात आला होता. तो उपसून आम्ही ओरडलो- ‘सांपडला, किंगपिन सांपडला’!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang