esakal | ढिंग टांग : चौकशीनंतरची चौकशी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

दादू : (बिचकत) हलोऽऽ...सदूरायाऽऽऽ..!
सदू : बोल, दादू! एवढ्या सकाळी फोन का केलास?
दादू : (ओल्या आवाजात) बरा आहेस ना? तब्बेत वगैरे?
सदू : (सहजच) बरा आहे की! का?
दादू : (सहानुभूतीने ओतप्रोत) झोप लागली का नीट?
सदू : (आळस देत) कचकावून झोपलोय! रात्री साडेनवाला जो झोपलो तो आत्ता तुझ्या फोनच्या रिंगने उठलो!

ढिंग टांग : चौकशीनंतरची चौकशी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दादू : (बिचकत) हलोऽऽ...सदूरायाऽऽऽ..!
सदू : बोल, दादू! एवढ्या सकाळी फोन का केलास?
दादू : (ओल्या आवाजात) बरा आहेस ना? तब्बेत वगैरे?
सदू : (सहजच) बरा आहे की! का?
दादू : (सहानुभूतीने ओतप्रोत) झोप लागली का नीट?
सदू : (आळस देत) कचकावून झोपलोय! रात्री साडेनवाला जो झोपलो तो आत्ता तुझ्या फोनच्या रिंगने उठलो!
दादू : (जपून पावलं टाकत) थोडे भिजवलेले बदाम खा हो! शक्‍ती येत्ये!!
सदू : (नाक मुरडत) शी:!! भिजवलेले बदाम? नको!! मला खारवलेले आवडतात!!
दादू : (विचारपूस करत) अंग दुखत असेल नं?
सदू : (आळोखेपिळोखे देत) दुखतंय थोडं, पण तेवढं चालायचंच! दमलो होतो जाम!
दादू : (भावाच्या मायेनं) सांभाळ हो तब्बेतीला! तब्बेत धडधाकट असेल तर अशा शंभर इडीपीडा...आपलं ते...सॉरी हं...इडापीडा आल्या तरी बेहत्तर!
सदू : (संशयानं) मला काय धाड भरलीये?
दादू : (गडबडीने) अरे, सहज चौकशी करत होतो!!
सदू : (शहरात) चौकशी? कशाला?
दादू : (मायेने) थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या तब्बेतीची चौकशी करु नये का...अं?
सदू : (सुस्कारा सोडत) हं...मग ठीक आहे! हल्ली चौकशी म्हटलं की...नक्‍को वाटतं!! काल नऊ तास नुसती चौकशीच चालली होती!
दादू : (मायाळू सुरात) खूप टेन्शन आलं असेल ना तुला सदूराया? मलाही वाटत होतं की मीसुध्दा इडी कार्यालयाच्या फूटपाथवर उभं राहून दिवसभर तुझी वाट पाहावी!!
सदू : (शिष्टपणाने) धन्यवाद!
दादू : (थेट विषयाला हात घालत) नऊ तास काय केलं रे?
सदू : (वैतागून) गेल्या गेल्या त्यांनी विचारलं, ‘‘चहा घेणार का?’’ मी म्हटलं, ‘‘तासाभरानं जेवायचीच वेळ होईल!’’ मग त्यांनी कॉफी मागवलीन!!
दादू : (अविश्‍वासानं) काहीही हं सदूराया!
सदू : (चेकाळून) मग मी जेवणाचा डबा मागवला! गुरुवार होता म्हणून साबुदाणा खिचडी, काकडीची कोशिंबीर वगैरे! आणि हो, राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजीही होती!! आम्ही सगळ्यांनी मिळून डबा खाल्ला!!
दादू : (आश्‍चर्यानं थक्‍क होत) पळ!!
सदू : (ओठांचा चंबू करत) खोरोच!...पळ कॉय?
दादू : (हिरमोड होत्साता) तुम्ही खरंच साबूदाणा खिचडी खाल्लीत? आणि का-क-डी-ची कोशिंबीर?
सदू : (बेधडकपणे) अफकोर्स!
दादू : (अज्जिबात विश्‍वास न ठेवता) ह्या:! अशी कुठे इडीची चौकशी असते का? मोठ्या भावाला थापा मारतोस ना?
सदू : (आणखी एक लोणकढी देत) एका अधिकाऱ्याने माझी स्वाक्षरीसुद्धा घेतली! म्हणाला, मी तुमचा फॅन आहे!! म्हणाला की मी कंपाउंडची भिंत ओलांडून तुमच्या घरी येणार होतो! पण तुम्हीच आलात!! आता बोल!!
दादू : (विचारात पडत) मला वाटलंच होतं की या चौकशीतून काहीही निघणार नाही म्हणून! पण खरंच का रे हे इडीवाले कंपाउंडची भिंत ओलांडून येतात?
सदू : (घाबरवत) दिल्लीत चिदंबरमसाहेबांचं काय झालं ते टीव्हीवर पाहिलंस नं?
दादू : (उडवून लावत) ते सीबीआयवाले होते! त्यांना सवय असते!!
सदू : (नेहलेपे देहला देत) इडी काय, सीबीआय काय, सध्या एकूण एकच!
दादू : तुला काहीच प्रश्‍न विचारले नाहीत?
सदू : (सहजपणे) विचारले ना?
दादू : (उत्सुकतेनं) काय विचारलंन नेमकं?
सदू : (एक डेडली पॉज घेत) त्यांनी एकच प्रश्‍न तीनदा विचारला- ‘ते दादूसाहेब तुमचे कोण?’

loading image
go to top