ढिंग टांग : वाघाचे पंजे!

ढिंग टांग : वाघाचे पंजे!

बेटा : (नेहमीप्रमाणे एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (घाईघाईने कागदपत्रे हातावेगळी करत) ओह, वेलकम! बऱ्याच दिवसांनी आलास!
बेटा : (हाताची घडी घालून) झारखंडला गेलो होतो! तिथं इलेक्‍शन आहेत!
मम्मामॅडम : (कामात मग्न) हंऽऽ! कसा झाला दौरा?
बेटा : (खांदे उडवत) नेहमीप्रमाणे... ग्रॅंड सक्‍सेसफुल! (बराच वेळ वाट पाहून) मम्मा, नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाबद्दल तुझं नेमकं काय मत आहे?
मम्मामॅडम : (सात्त्विक संतापानं) हे काय विचारणं झालं बेटा? या विधेयकाइतकं भयंकर दुसरं काहीही नसेल! धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करणारं हे अभद्र विधेयक आहे! असलेच प्रकार करून हे लोक त्यांचा अजेंडा राबवतील आणि देश दुहीच्या खाईत लोटला जाईल! आपल्यासारख्या सेक्‍युलर पक्षांनी याचा होता होईतोवर प्रखर विरोध केला पाहिजे! देशभर आंदोलने केली पाहिजेत! 
बेटा : (शांतपणे) याचा अर्थ तुझा या विधेयकाला विरोध आहे तर! 
मम्मामॅडम : (संयमानं) माझा तर आहेचड; पण तूसुद्धा विरोधातच आहेस!! हो ना?
बेटा : (मान हलवत) अफकोर्स! पण आपल्या काही सहकारी पक्षांना ते मान्य नाही, असं दिसतं!
ममामॅडम : (भिवई उडवत) मग त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल!
बेटा : (आगीत तेल ओतत) उदाहरणार्थ, महाराष्ट्रातले आपले नवे मित्र ऐक्‍कत नाहीएत! त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिलाय!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) ती एक डोकेदुखीच होणारंय! उगीच त्यांच्यासोबत आघाडी केली! 
बेटा : (त्रयस्थपणे) मी आधीच सांगत होतो! तुम्ही ऐकलं नाहीत माझं!!
मम्मामॅडम : (निर्वाणीच्या सुरात) त्यांना ताबडतोब कळवून टाक की बऱ्या बोलानं सेक्‍युलर व्हा! नाहीतर तुमच्या सरकारात आम्ही राहणार नाही! बाहेरून पाठिंबा देऊ फारतर! कळलं?
बेटा : (कोरडेपणाने) मी ऑलरेडी कळवलंय! पण महाराष्ट्रातले आपलेच नेते म्हणायला लागले, ‘‘जाऊ द्या ना साहेब, शिकतील हळूहळू सेक्‍युलरवाद! आमची हातातोंडाशी आलेली मंत्रिपदं जातील!’’ काल त्यांना मी फोन केला आणि जाब विचारला, की मैत्री आमच्याशी आणि पाठिंबा त्यांना? ये नहीं चलेगा!
मम्मामॅडम : (संतापाने) त्यांना म्हणावं, असंच चालू राहणार असेल, तर आम्ही तुमच्या सरकारात बिलकुल सामील होणार नाही! चार-पाच मंत्रिपदांनी आम्हाला काही फरक पडत नाही म्हणावं!
बेटा : (उत्साहात) मी एग्झॅक्‍टली हेच बोललो! ते म्हणाले की डोण्ट वरी! गुस्सा मत करो, हमने पहले पाठिंबा दिया होगा तो क्‍या हुआ? हम अब्बी के अब्बी विरोध जाहीर कर देते हैं! मग तर झालं?
मम्मामॅडम : (दोन्ही हात झटकत) याला काय अर्थ आहे? त्यांचा पाठिंबा आहे की विरोध?
बेटा : (पुन्हा उत्साहात) मी एग्झॅक्‍टली हेच विचारलं! म्हटलं, मिस्टर, एक काय ते बोला! एकदा पाठिंबा द्यायचा, नंतर विरोध आहे म्हणून सांगायचं! आम्ही विश्‍वास कसा ठेवायचा?
मम्मामॅडम : (पुन्हा कुतूहलानं) मग काय म्हणाले ते?
बेटा : (डोळे मिटून) ते म्हणाले, फिकर नॉट! सबकुछ ठीक हो जायेगा! कुणी आम्हाला हिंदुत्त्व आणि राष्ट्रभक्‍ती शिकवू नये!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) म्हंजे?
बेटा : (खांदे उडवत) मी एग्झॅक्‍टली तेच विचारलं! 
मम्मामॅडम : (खचलेल्या सुरात) मग काय म्हणाले ते?
बेटा : (टाळी देत)... ते म्हणाले, ‘‘म्हंजे वाघाचे पंजे!’’ हाहा!! वाघाचे पंजे... लक्षात आलं ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com