पृथ्वीच्या इतिहासातील ‘मेघालय पर्व’

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 31 जुलै 2018

आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा नवीन तक्ता नव्या माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला.  त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा नवीन तक्ता नव्या माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला.  त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

पृथ्वीच्या जन्मापासून आत्तापर्यंतच्या साडेचार अब्ज वर्षांत, विविध कालखंडांत नद्या, हिमनद्या, समुद्रतळ, वाळवंटे, गुहा यात विविध प्रकारचा गाळ गाडला गेला किंवा अडकून पडला. त्या त्या कालखंडातील खडक, खनिजे, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष आणि जीवाष्म गाळाच्या विविध थरांत बंदिस्त झाले. आज उत्खनन करताना किंवा भूकंप, महापूर, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीनंतर, पूर्वी गाडल्या गेलेल्या अशा गोष्टी पुन्हा दिसू लागतात. रेडिओ कार्बन, थर्मोल्युमिनिसन्स, पॅलिओ मॅग्नेटिझम अशा कालमापनाच्या अनेक पद्धती वापरून त्यांचे भूशास्त्रीय वय ठरविले जाते.

ज्या थरात त्या गोष्टी सापडल्या त्यावरून त्या काळातील भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि भूशास्त्रीय पर्यावरणाबद्दल निष्कर्ष काढले जातात. यातूनच पृथ्वीच्या सगळ्या इतिहासाची पुनर्निर्मिती केली जाते.
आंतरराष्ट्रीय स्तरविज्ञान आयोग (इंटरनॅशनल स्ट्रॅटीग्राफी कमिशन) ही आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय संघटनेशी निगडित संस्था पृथ्वीचा स्तररचनेतून प्राप्त झालेला इतिहास महाकल्प (इरा), कल्प (पिरियड) आणि पर्व (इपॉक) अशा कालगणनेत मांडण्याचे कार्य करते. या आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा (क्रोनोस्ट्रॅटीग्राफी) नवीन तक्ता नवीन माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब.

भारतातील प्रदेशाच्या नावावरून कालगणना श्रेणीतील कालखंडास संबोधण्याची ही पहिली वेळ! भूशास्त्रीय कालगणना श्रेणीतील विविध कालखंड विभागात पृथ्वीच्या जन्मापासून आतापर्यंत घडत आलेल्या निरनिराळ्या भूवैज्ञानिक घडामोडींचा संशोधनाअंती समावेश केलेला असतो.

भूखंडनिर्मिती, भूखंडवहनाचा कालखंड, रूपांतर, हिमयुगे त्यांच्या घटनाक्रमानुसार यात दाखविलेल्या असतात. त्या त्या कालखंडातील प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश करून अनुक्रमीय भूरचनाही दिलेली असते. 

अवसादीय किंवा गाळाच्या खडकातील थरांचा अभ्यास म्हणजे अवसाद स्तर विज्ञान. या दोन्हींचा यासाठी उपयोग केला जातो. पृथ्वी पृष्ठाखालील विविध स्तरांतील जीवाष्मांच्या साह्याने ते थर कोणत्या भूशास्त्रीय कालखंडात निर्माण झाले असावेत, ते ठरवून त्यावरून प्राचीन पर्यावरणीय इतिहासाची पुनर्रचना केली जाते. स्तरात आढळणाऱ्या जीवाष्मांच्या साह्याने जो अभ्यास केला जातो, त्यास जैव स्तर विज्ञान म्हटले जाते. पृथ्वीवरील जिवांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी स्तररचना विज्ञानाचा खूपच उपयोग होतो. कोणते जीव केव्हा जन्माला आले, केव्हा नष्ट झाले त्याचाही यातून शोध घेता येतो. भूशास्त्रीय कालगणनेचा अनुक्रम हा स्तररचना विज्ञानातूनच नक्की करण्यात येतो. स्तर विज्ञानात कालानुक्रम महत्त्वाचा.

जवळजवळच्या दोन स्तरांतील विसंवाद, त्यातील सीमारेषा व ज्या प्रक्रियेतून ते स्तर बनले त्यांचे स्वरूप अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासातून प्राचीन पर्यावरणाचा उलगडा करता येतो. पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या सगळ्या भूशास्त्रीय काळाची भूवैज्ञानिकांनी निरनिराळ्या कालखंडात विभागणी केलेली आहे. ही विभागणी प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा चार प्रमुख महाकल्पात किंवा अजीव (अझोइक), प्रागजीव (प्रोटेरोझोइक), पुराजीव (पॅलिओझॉइक), मध्यजीव (मेसोझोइक) आणि नवजीवन (कायनोझोइक) अशा नावांनीही केलेली आहे.

भूशास्त्रीय कालगणनेनुसार साडेचार अब्ज वर्षांपासून म्हणजे पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या कालखंडाची महाकल्प (इरा), कल्प (पिरिअड) आणि युग (इपॉक) अशा काळात विभागणी केलेली आहे . सध्या आपण ज्या कालखंडात राहत आहोत, त्याला होलोसीन कालखंड म्हटले जाते. होलोसीन म्हणजे ‘नूतनतम’. या सध्या चालू असलेल्या भूशास्त्रीय कालखंडाची सुरवात ११ हजार ७०० वर्षांपूर्वी, पृथ्वीवरच्या शेवटच्या हिमयुगानंतर झाली, असे मानण्यात येते. याच कालखंडाच्या शेवटच्या म्हणजे गेल्या काही दशकांच्या, मनुष्याच्या प्राबल्यामुळे महत्त्वाच्या बनलेल्या काळास आंथ्रपोसीन म्हणजे ‘मनुष्याचा कालखंड’ म्हणावे अशा तऱ्हेची सूचनाही नुकतीच पुढे आली आहे. मनुष्यप्रभावाची सगळी लक्षणे गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मृदेच्या स्तरात आढळणाऱ्या अवसादात बंदिस्त झाली असून, त्यातून या कालखंडाची नेमकी सुरवात केव्हा झाली ते ठरविता येईल, असे अभ्यासकांना वाटते. आज १९५०नंतरचा काळ हा खऱ्या अर्थाने ‘मनुष्याचा कालखंड’ मानावा, यावर एकवाक्‍यता दिसते आणि म्हणूनच ‘मेघालय पर्व’१९५०च्या आधी ४२०० वर्षे असे असावे, असेही सुचविण्यात आले आहे!  

भारतातील मेघालयमधील ‘मावमलु’ या चुनखडकातील गुहेत तयार झालेल्या लवणस्तंभांच्या  (स्टॅलेक्‍टाइट) अभ्यासातून महत्त्वाच्या जागतिक घटनांचा उलगडा झाला. या गुहेतील संशोधनानुसार असे लक्षात आले, की ४२०० वर्षांपूर्वी जगभरात अचानक मोठा दुष्काळ पडला, तापमानात घट झाली आणि त्यामुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या.

जगाने दुष्काळाचे हे संकट २०० वर्षे सोसले. इजिप्त, ग्रीस, सीरिया, पॅलेस्टाईन, मेसोपोटेमिया याचबरोबर सिंधू खोरे आणि चीनमधील यांगत्सेचे खोरे इथल्या संस्कृती जास्त बाधित झाल्या. या सर्व ठिकाणांची शेतीप्रधान संस्कृती जवळजवळ नामशेष झाली. समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीवर असलेल्या या गुहेतील चुनखडकात तयार झालेल्या लवणस्तंभातील अवसादांच्या पृथक्‍करणातून हा निष्कर्ष काढता आला म्हणून होलोसीन कालखंडाच्या ४२०० वर्षे ते आजपर्यंतच्या कालखंडाला ‘मेघालय पर्व’ असे नाव देण्यात आले. याच वेळी होलोसीन या नूतन काळाची विभागणी ग्रीनलॅंडियन (११७०० ते ८३०० वर्षांपूर्वीचा काळ), नॉर्थग्रिपिअन (८३०० ते ४२०० वर्षांपूर्वीचा काळ) आणि मेघालयन (४२०० ते आजपर्यंतचा काळ) अशी नक्की करण्यात आली. हे तिन्ही कालखंड समुद्रतळावरील व सरोवरातील गाळ, हिमनद्यांतील आणि हिमनगातील बर्फ व ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी लवणस्तंभांतील कॅल्साइट खनिजांचे थर यावरून सुनिश्‍चित करण्यात आले आहेत. अकरा हजार ७०० वर्षांपूर्वी ग्रीनलॅंडियन काळात मिळालेले तापमानवाढीचे पुरावे, ८३०० वर्षांपूर्वीच्या नॉर्थग्रिपिअन काळातील आत्यंतिक थंडीचे पुरावे आणि मेघालय काळातील ४२०० वर्षांपूर्वीचे महादुष्काळाचे अनेक पुरावे अशा अवसादात मिळाले. मेघालय पर्वात, चीनकडून मध्य आशियाकडे व भारतातील मेघालय प्रदेशाकडे मोठी मानवी स्थलांतरे झाली असावीत, असाही निष्कर्ष काढणे शक्‍य झाले. या दुष्काळाचे पुरावे जगातील इतर ठिकाणच्या भूअवसादात आणि प्राचीन पुरातत्त्व ठिकाणीही सापडतात. ‘मेघालय’ पर्वात जगभरात समुद्र आणि वातावरणातील अभिसरण चक्रात मोठ्या हालचाली होऊन हवामानबदल घडून आले. याचे पुरावे जगात इतरत्र अनेक ठिकाणी अवसादांच्या थरात, प्राणी, वनस्पती यांच्या जीवाश्‍मांत आणि रासायनिक समस्थानिकांत साचून राहतात. त्यांचे कालमापन करून त्या वेळच्या पर्यावरणाचे नेमके वर्णन करता येते. ग्रीनलॅंडियन आणि नॉर्थग्रिपिअन काळातील कालमापन सीमा बर्फाच्या साठ्यात साचून राहिलेल्या जीवाश्‍मांमुळे नक्की करता आली, तर मेघालयातील गुहेत लवणस्तंभांतील उपलब्ध जीवाश्‍मांच्या साह्याने ४२०० वर्षांची सीमा ठरवता आली.  पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या इतिहासात ‘मेघालय पर्व’ पहिले असे भूशास्त्रीय पर्व आहे, की जे जागतिक पातळीवरील हवामान बदलांमुळे होऊन गेलेल्या सांस्कृतिक घटनांशी संबंधित आहे आणि म्हणूनच त्याला भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत इतके महत्त्व आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr. shrikant karlekar