अग्रलेख : हरियानातील सत्ताखेळ!

अनंत बागाईतकर
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

‘अब की बार, ७५ पार!’ अशी घोषणा दिलेल्या भाजपला हरियानातील सत्ता राखण्यासाठी आमदारांची फोडाफोड करावी लागली नसली, तरी दुष्यंत चौताला यांच्याशी तडजोड करण्याची वेळ आली आहे.

भारतीय राजकारणाला ‘आयाराम, गयाराम!’ या संज्ञेची देणगी देणाऱ्या हरियानात २०१४ मध्ये प्रथमच मिळालेली सत्ता कशीबशी टिकवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे! १९६७ मध्ये हरियानातील हसनपूर मतदारसंघातील आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात तीन वेळा पक्षांतर करून, ‘सत्तेसाठी काहीही’ असा पायंडा पाडला होता. अर्थात, या वेळी मनोहरलाल खट्टर यांचे राज्य राखण्यासाठी भाजपला आमदारांची फोडाफोड करावी लागली नसली, तरी बरीच तडजोड करावी लागली आहे. दुष्यंत चौताला यांच्या नेतृत्वाखालील नवजात जननायक जनता पार्टीचे दहा आमदार मदतीला धावून आल्याने भाजपची सत्ता कायम राहिली आहे. मात्र, त्यासाठी भाजपने आता जी किंमत मोजली आहे, ती केवळ चौताला यांना द्याव्या लागलेल्या उपमुख्यमंत्रिपदापुरतीच नाही, तर खट्टर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्यापूर्वी, तिहार तुरुंगात असलेले त्यांचे पिताश्री अजय चौताला यांची १५ दिवसांसाठी का होईना ‘फर्लो’वर मुक्‍तता करण्याचा निर्णय घेणे संबंधित यंत्रणेला भाग पडले आहे. तरी, दुष्यंत यांचे आजोबा ओमप्रकाश चौताला मात्र अद्याप गजाआडच आहेत. एक मात्र खरे, की दुष्यंत यांच्या पक्षाने मिळवलेल्या या विजयामुळे हरियानात प्रदीर्घ काळ सत्तेच्या वर्तुळात दबदबा निर्माण करणारे चौताला कुटुंब दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा भागीदार म्हणून का होईना सत्तेच्या रिंगणात आले आहे. हे सारेच अजब, तसेच अतर्क्‍यही आहे आणि ‘पार्टी वुइथ डिफरन्स’चा डिंडिम वाजवत ‘चाल, चलन और चारित्र्य’ यांची भाषा करणाऱ्या भाजपच्या शिरपेचात भ्रष्टाचार शुद्धीकरणाचा आणखी एक तुरा खोचणारे आहे!

हरियाना विधानसभेचे निकाल जाहीर झाले, तेव्हा ९० सदस्यांच्या सभागृहात भाजपला ४० जागांपर्यंतच मजल मारता आली. महाराष्ट्रात ‘अब की बार, २२० पार!’ अशी घोषणा प्रचारात देणाऱ्या भाजपने हरियानातही ‘अब की बार, ७५ पार!’ असा नारा दिला होता. महाराष्ट्राप्रमाणेच हरियानातही ‘आम्हाला कोणी विरोधक नाही आणि आता दोनतृतीयांश बहुमत मिळते की तीनचतुर्थांश की चारपंचमांश, एवढाच काय तो प्रश्‍न आहे!’ अशा गमजा भाजपचे नेते मारत होते. प्रत्यक्षात मतदारांनी त्यांचे स्वप्न धुळीस मिळवताना, खट्टर यांना साधे बहुमतही दिले नाही. निवडणुका जाहीर झाल्यापासून हरियानात काँग्रेसमध्ये माजलेल्या बेदिलीला सोनिया गांधी यांनी वेळीच लगाम घातला असता, तर काँग्रेसच्या हाती हे राज्य येऊ शकले असते. पण, तसे झाले नाही आणि काँग्रेसला ३१ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पदार्पणातच दहा आमदार निवडून आणणाऱ्या दुष्यंत चौताला यांच्याकडे सत्तेची चावी गेली. मात्र, त्यानंतर सत्तासंपादनासाठी भाजपने केलेल्या खेळास हरियानात एका तपापूर्वी गाजलेल्या शिक्षकभरती गैरव्यवहाराची किनार आहे. हा गैरव्यवहार उजेडात आल्यानंतर तेथे राजकीय भूकंप झाला आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला व त्यांचे पुत्र अजय चौताला यांना अखेर तिहार तुरुंगात जावे लागले. ओमप्रकाश चौताला हे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे चिरंजीव आहेत, तर दुष्यंत हे पणतू! ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, की भाजपने किती मोठी किंमत सत्ता राखण्यासाठी मोजली आहे, हे लक्षात येऊ शकते. आता हरियानात पुन्हा सत्तेवर आलेल्या खट्टर सरकारवर दुष्यंत चौताला यांचा दबाव पुढेही कायम राहणार आणि त्यापायी शिक्षकभरती गैरव्यवहार चौकशीचे काय होणार, तेही उघड आहे.

अर्थात, या साऱ्या राजकीय खेळामुळे भाजपचे पितळ उघडे पडले आहे. महाराष्ट्रातही सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचे आरोप असलेल्या काहींना निवडणुकीच्या तोंडावर थेट भाजपमध्ये दाखल करून घेण्यात आले होते. तेव्हा झालेल्या टीकेनंतर आमच्याकडे ‘धुलाई मशिन’ आहे, अशा फुशारक्‍या भाजप नेत्यांनी मारल्या होत्या. त्याला महाराष्ट्र व हरियानातील जनतेने मतदानातून चोख उत्तर दिले आहे. आपला पराभव होऊ शकत नाही, अशी धुंदी भाजपला पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशामुळे चढली होती. आता भाजपला या दोन राज्यांतील मतदारांच्या कौलामुळे एकुणातच आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. २०१४ पासून भाजपने आपल्या पक्षाचे रूपांतर केवळ निवडणुका जिंकून देणाऱ्या यंत्रणेत केले आहे. त्याला या दोन राज्यांतील जनतेने फटका दिला आहे. असाच फटका राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील जनतेने दिला होता. त्यापासून भाजपने काही बोध घेतला नाही. आता तरी हरियानात सत्तेसाठी कराव्या लागलेल्या तडजोडींनंतर भाजप काही चिंतन करतो काय, ते बघायचे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article haryana election politics 2019