अग्रलेख :  सुरांचा पिंपळ!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

एखाद्या शारदीय रात्री नभांगणातील रत्नखचित तारकांचे पुंज पाहून मन नि:शब्द होते किंवा ज्ञानोबारायाची एखादी विराणी ऐकतानाही देहमन अगदी कातर होऊन जाते. देवघरातील निरांजनाची मंद वात एकटक पाहताना मनावरची काजळीच क्षणार्धात उडून जावी, तसे काहीसे घडते.

एखाद्या शारदीय रात्री नभांगणातील रत्नखचित तारकांचे पुंज पाहून मन नि:शब्द होते किंवा ज्ञानोबारायाची एखादी विराणी ऐकतानाही देहमन अगदी कातर होऊन जाते. देवघरातील निरांजनाची मंद वात एकटक पाहताना मनावरची काजळीच क्षणार्धात उडून जावी, तसे काहीसे घडते. हा क्षण अभिजाताच्या स्पर्शाचा. जगण्याच्या उसाभरीत क्‍वचित कधी असे क्षण हाताला लागतात. त्या क्षणांना नित्याच्या धबडग्याची पत्रास नसते. ‘हवे-नको’चे यमनियम नसतात. लौकिकाचे लागेबांधे नसतात. हे असले क्षण कुठल्या तरी वेगळ्याच प्रांतातून अवतरतात बहुधा. अनिर्वचनीय आनंदाचे निधान बनून जाणाऱ्या या क्षणांना सुखाचा परिमळू असतो...आणि लता मंगेशकरांचा अद्वितीय स्वर असतो.

लतादीदी नव्वद वर्षांच्या झाल्या हा एक निव्वळ उपचारांचा मथळा आहे. आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा क्‍लिष्ट सिद्धान्त दीदींच्या वयोमानाला लागू होत नाही. लतादीदी नावाचा एक स्वर चंद्रभागेसारखा अव्याहत झुळुझुळू वाहणारा प्रवाह आहे. त्याला आदि नाही, अंत नाही. त्याचे कॅलेंडरी कालखंड पाडायचे ते आपल्यासारख्या मर्त्य जीवांच्या सोयीसाठी. लतादीदींचा स्वर कालातीत आहे. त्या स्वरप्रवाहात वाहणारे आपण सारे जीव आहोत, इतकेच खरे आहे. वास्तविक दीदींबद्दल इतक्‍या महानुभावांनी लिहून ठेवले आहे, की त्यांना आणखी कुठल्या विशेषणांनी गौरवायचे? साक्षात सरस्वतीची उपमा ज्यांच्यासाठी अनेकांनी देऊन ठेवली, त्या दीदींच्या गौरवासाठी आणखी वेगळा शब्दभार कोठून वाहून आणायचा? त्यासाठी प्रतिभावान पूर्वसूरींचीच उसनवारी करावी लागणार. तेव्हा तो मार्ग सोडूनच दिलेला बरा.

आपल्या कॅलेंडराच्या हिशेबानुसार नव्वद सुरेल वर्षे पृथ्वीतलावर कंठणाऱ्या या स्वरलतेने गेली तब्बल पाऊणशे वर्षे भारतीय स्वरवेड्यांना रिझवले. लतादीदींचा स्वर हा हरेक भारतीय मनाचा अंत:स्वर आहे. आपल्या छोट्या, छोट्या आयुष्यांतील मोजक्‍या अनिर्वचनीय क्षणांना याच स्वराने कायमचे कोंदण दिले. खरं म्हणजे यासाठी आपण त्यांचे कृतज्ञ असले पाहिजे. लता मंगेशकर या गारुडाने भारतीय मनाच्या कुपीत असे काही घर केले आहे की, त्यांचा स्वर हा त्यांचा उरला नाहीच, तो अवघ्या देशाचा झाला. माध्यमांच्या कल्लोळात आज कितीतरी प्रकारचे आवाज आणि सूर ऐकू येत असतात. जाळपोळ, राजकारण, युद्ध, शेअर बाजाराचे हेलकावे, चर्चा, वितंडवाद, स्पर्धा, विक्री अशा विविधांगी कल्लोळात मन उद्विग्न होते. जगणे म्हणजे हे असेच का, असा प्रश्‍न पडता पडताच अचानक हाताखांद्यावर प्राजक्‍ताचे टप्पोरे फूल पडावे, तसा लतादीदींचा सूर अवतरतो आणि आपल्या जगण्याला नवी उमेद आणि अर्थ देऊन जातो. आजही तरुणाईचे गाण्यागिण्यांचे रिॲलिटी शोज असोत किंवा सियाचीनच्या बर्फाळ थंडीत पहाऱ्याला बसलेला सरहद्दीवरचा जवान असो, लोकल ट्रेनला लोंबकळलेला चाकरमानी असो, किंवा विमनस्कपणे स्वपदे उचलत रस्त्यातून हिंडणारा एखादा भणंग असो. सर्वत्र सामावून, भिनून गेलेला असतो तो लतादीदींचा अलौकिक स्वरच. हा स्वर महाराष्ट्राच्या कुशीत वाढला, फुलला याचा सह्याद्रीलादेखील अभिमान वाटावा. 

वयाच्या चौदाव्या वर्षी मास्टर दीनानाथांचा वारसा घेऊन आलेल्या लता मंगेशकर नामक मुलीने बघता बघता दाही दिशा जिंकल्या आणि आपले सुरांचे साम्राज्य स्थापित केले. या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही; पण सकाळ मात्र उजाडते. किंबहुना पुढले सारेच प्रहर या स्वरसम्राज्ञीच्या हुकमेहुकूम चालतात. या सूरस्थानाच्या महाराणीला मिरवावे लागत नाही. राणीला तसेही मिरवावे लागत नाहीच, मिरवतात त्या दासी! दीदींच्या कारकिर्दीतच अनेक प्रतिलता, डिट्‌टो लता, सेम टू सेम लता अवतरल्या. पण त्या साऱ्या मूळ स्वराच्या हललेल्या फोटो कॉप्या होत्या, हेही लक्षात आले. संगीताच्या क्षेत्रात इतकी तंत्रक्रांती होऊनही आज लतादीदींचा सूर दशांगुळे उरला आहे, यातच सारे काही आले. अभिजाताच्या प्रती निघत नसतात आणि आवृत्त्याही. अर्थात लतादीदींची नक्‍कल कोणी करू नये, असे नाही. दिग्गजांचे अनुकरण हा विद्येचा एक मार्ग असतोच. पण दीदींसारख्या गायिकेकडे ‘मंझिल’ म्हणून पाहिले की फसगत ठरलेलीच. 

हल्ली इव्हेंटचा जमाना आहे. विविधतेने विनटलेल्या आपल्या अठरापगड देशातील समूहांना एकसंध जोडणारे काहीही दिसले की मन हरखून जाते. तो एकसूत्रीपणा हाच साऱ्या देशाचा ध्यास बनून जातो. त्यासाठी भलभलते इव्हेंट करण्याची लाट आहे. पण एकट्या लतादीदींच्या सुराने तर गेली पाऊणशे वर्षे पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि बंगाल वगैरे घट्ट बांधून ठेवला आहे. एकजिनसी देशासाठी आणखी कोणते जिवंत सूत्र हवे? लतादीदींचा स्वर हे निर्मळ देवटाक्‍याचे पाणी आहे. कधीही न आटणारे, तृषार्ताला तृप्त करणारे जीवनदायी देवटाके. त्याला वय नसते. असलाच तर एक कृतज्ञतापूर्वक हात जोडण्याची संधी देणारा आणखी एक दिवस तेवढा असतो. ज्ञानोबारायांच्या अंगणात सोन्याचा पिंपळ होता, म्हणतात. महाराष्ट्र सारस्वताच्या अंगणात लता मंगेशकर नावाचा एक सुरांचा पिंपळ  आहे. या पिंपळाची सळसळ अशीच अव्याहत होत राहो, ही सदिच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial article Lata Mangeshkar Birthday Special