esakal | चारपक्षीय वाताहत 
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Political Parties

कायम कलहात रमणाऱ्या महाराष्ट्राने अनेक राजकीय पर्यायांचा विचार एकाच वेळी केला. राज्याच्या राजकीय पर्यावरणात चार- चार पक्ष अवकाश व्यापण्याच्या प्रयत्नांत आहेत आणि प्रत्येक पक्ष आपापली भूमिका स्पष्ट करण्यात अन्‌ अस्मिता जोपासण्याच्या स्पर्धेत आहे; पण त्या टणत्कारात महाराष्ट्राची माघार होते आहे. 

चारपक्षीय वाताहत 

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ ही आपली मिजास नि ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा’ हा आपला अहंकार. अटकेपार झेंडे रोवल्याचा आपल्याला कोण अभिमान! आजवर सर्वाधिक ‘भारतरत्न’ मिळवलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. स्वकीयांना पायदळी तुडवणाऱ्या जुलमी राजवटीला दऱ्याखोऱ्यांच्या आणि मावळ्यांच्या मदतीने झुगारून देणारे रयतेचे राजे शिवाजी आमचे दैवत. उत्तर आणि दक्षिण या भारतातील दोन प्रवाहांची आर्य-द्रवीड संकराची भूमी असलेला महाराष्ट्र प्रगतीतही एकेकाळी आघाडीवर होता. विकासदर सर्वाधिक, दरडोई उत्पन्न हे अन्य राज्यांच्या असूयेचा विषय होते. पण १९९०च्या प्रारंभापासून या राज्याचे भले जरा माघारले आहे. वातावरण संशयग्रस्त झाले आहे आणि प्रगतीचे अपेक्षित पाडाव गाठता येणे जरा दुरापास्त होते आहे. मोठे उद्योगधंदे भूमिपुत्रांच्या लढाईचे कारण देत माघार घेताहेत. मुंबईला ‘एनसीआर’ने मागे टाकले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे मुख्यालय पुण्याहून बंगळूरला सरकले. महाराष्ट्राची प्रगती मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या टापूत अडकली. 

हे सगळे का घडले याबद्दल चिंतन करायचे झाले, तर कायम कलहात रमणाऱ्या महाराष्ट्राने अनेक राजकीय पर्यायांचा विचार एकाच वेळी केला. चार- चार, कधी तर पाच राजकीय पक्षांच्या साठमारीत महाराष्ट्राची जनता नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा, या निर्णयापर्यंत येऊ शकली नाही. १९९०च्या दशकापर्यंत काँग्रेसचा महाराष्ट्रावर एकछत्री अंमल होता. यशवंतराव चव्हाणांच्या बेरजेच्या राजकारणाने शेतकरी कामगार पक्षापासून, तर सुदूर विदर्भातील वसंतराव नाईकांपर्यंत सारे एका सूत्रात बांधले जात होते. ‘ज्ञानकोश’ तयार करण्याचे प्रकल्प कृष्णामाईच्या साक्षीने आकार घेत होते. वसंतदादा पाटील यांच्यासारखा शास्ता धूर्तपणे नंतर साखरेचे राजकारण करत होता. 

दिल्लीकरांना त्याकाळात प्रत्येक राज्यात अस्वस्थ वातावरण निर्माण करण्याची खोड लागली होती. काँग्रेसमध्ये त्यामुळेच दोन तट पडू लागले. १९९५ मध्ये शंकरराव चव्हाणांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही याची काळजी घेतली आणि ती सगळी नाराज मंडळी अपक्ष म्हणून निवडून आली. युतीचे पहिले सरकार या टेकूवर उभे होते.

 काँग्रेसची अशी उपशाखीय वाटचाल सुरू असतानाच जनसंघाची मिणमिणती पणती जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या वाऱ्याने स्थिरावली. शिवसेनाही भूमिपुत्रांच्या लढ्याच्या निमित्ताने पाय रोवत होतीच. या दोन पक्षांनी एकत्र येऊन जे हिंदुत्ववादाचे राजकारण केले आहे, ते आजही ‘तुझे माझे पटेना अन्‌ तुझ्यावाचून होईना’ म्हणत सुरू आहेच. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यानंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणात चार ध्रुव आहेत. शिवसेनेतून उपसेना म्हणून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनीही मध्यंतरी काहीकाळ महाराष्ट्राचे नवनिर्माण करणारा पक्ष मोठ्या ताकदीने सुरू केला. सध्या वंचित बहुजन आघाडी व अल्पसंख्याकांचे राजकारण करणारा ‘एमआयएम’ हा पक्षही चर्चेत आहेच. या पक्षांनी आपापली शक्तिस्थळे थोड्याफार फरकाने राखून ठेवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मिळालेले लक्षणीय यश हे त्यांच्या टापूतले आहे. विदर्भात, मुंबईत विस्तार करण्याचे यश अद्याप अप्राप्य असल्याने महाराष्ट्रातला सर्वांत मोठा पक्ष झाला आहे भारतीय जनता पक्ष. या पक्षाची विस्तारवादी मनोवृत्ती, पाय रोवून उभे राहणारे संघटन काही अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांत यशस्वी होते आहे. या निवडणुकीत अपेक्षेएवढे यश मिळाले असते, तर सहकारी शिवसेनेला हळूहळू अडगळीत टाकण्याचे मनसुबे प्रत्यक्षात आले असते; पण ते घडले नाही आणि आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन केव्हा होणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही निवडणूकपूर्व आघाडी असतानाही सत्तास्थापनेसाठी एकदा तब्बल २१ दिवसांचा वेळ घेतला होता. तीन पायांची दौड कुणालाही दमवते. एकवाक्‍यतेने पुढे जाणे कठीण होते. महाराष्ट्राच्या राजकीय पर्यावरणात तर चार- चार पक्ष अवकाश व्यापण्याच्या प्रयत्नांत आहेत. कुणाला दहा रुपयांत जेवण द्यायचे आहे, तर कुणाला मेट्रोसाठी झाडे कापून तेथे व्यवस्था उभारायची आहे. प्रत्येक जण आपापली भूमिका स्पष्ट करण्यात अन्‌ अस्मिता जोपासण्याच्या स्पर्धेत आहे. त्या टणत्कारात महाराष्ट्राची माघार होते आहे. महाराष्ट्राचा लौकीक त्यामुळे घसरतो आहे; पण ‘मी लहान असलो तरी मुख्यमंत्रीच होईन’ या हट्टात लक्षात कोण घेणार अशी स्थिती आहे.