पहाटपावलं : आग सोमेश्वरी...

Mrunalini-Chitale
Mrunalini-Chitale

मनावर येणाऱ्या ताणाचं नेमकं कारण कळू शकलं, तर तो दूर करणं कसं शक्‍य होतं, या संबंधीचा हा अनुभव डॉ. प्रतीक्षा हिच्या ‘बायपासला पर्याय’ या पुस्तकाचं शब्दांकन करताना आलेला. शरद हा हृदयविकाराचा रुग्ण.

अलीकडे त्याची तक्रार होती, की अंघोळीला गेलं, की त्याला अंजायनाचा त्रास होतो. अंजायना म्हणजे हृदय कमकुवत झाल्यामुळे छाती, पाठ, मान अशा ठिकाणी वेदना होणे. शरदची अवस्था इतकी नाजूक नव्हती, की अंघोळीची हालचाल सहन होऊ नये. त्याचा आजार आता आटोक्‍यात होता. तो व्यवस्थित कामावर जात होता. व्यायाम करत होता. फक्त अंघोळीच्या वेळी त्याला त्रास जाणवायचा. तो घाबरून सॉर्बिट्रेटची गोळी घ्यायचा.

आठवड्यातून तीन-तीन वेळा ‘ईसीजी’ काढून घ्यायचा. तपासण्याअंती त्याचा आजार बळावला नसल्याची खात्री पटल्यावर डॉक्‍टरांनी त्याला समुपदेशकाकडे पाठवलं. समुपदेशकाशी चर्चा झाल्यावर निष्पन्न झालं ते असं, की तो अंघोळीला जाण्यापूर्वी त्याच्या बायकोनं सर्व कपडे जुळवून ठेवण्याची पूर्वीपासूनची पद्धत होती. हृदयविकाराचा त्रास सुरू होण्यापूर्वी कपडे जागेवर नसतील, तर तो बायकोवर भयंकर चिडायचा. परंतु आता क्षुल्लक गोष्टींवरून न चिडण्याविषयी डॉक्‍टरांनी त्याला बजावलं होतं. काही महिने बायकोनेही तो लहानसहान बाबींवरून चिडू नये म्हणून काळजी घेतली. वर्ष-सहा महिन्यांनी तिच्या कामात ढिलाई पडायला लागली.

डॉक्‍टरांनी ‘चिडायचं नाही,’ असं सांगितलं असल्यामुळे कपडे जागेवर नसले तरी आरडाओरडा करणं त्यानं बंद केलं.

थोडक्‍यात, चिडण्यावर म्हणजे ताणावर नियंत्रण ठेवायचं याचाच ताण येऊन त्याला अंजायनाचा त्रास सुरू झाला. याबाबत त्याच्या मनानं केलेली अंघोळ नि जागेवर कपडे असणं/नसणं याची सांधेजोड इतकी टोकाला गेली की आपण का चिडतो याचा विसर पडून केवळ अंघोळीची वेळ झाली की त्याला ताण येऊ लागला. सौम्य प्रकारचा ताण आला तरी स्ट्रेस हार्मोन्सची निर्मिती होऊन शरीरांतर्गत काही बदल होतात. त्यातील एक बदल म्हणजे स्नायू आकुंचन पावतात. त्यामध्ये हृदयाचे स्नायूही असतात. ते आकुंचन पावल्यामुळे त्याला सौम्य वेदना जाणवायची. हृदयवेदनेबाबत अतिसंवेदनशील झाल्यामुळे हा अंजायनाचा त्रास आहे, असं समजून तो कमालीचा अस्वस्थ व्हायचा. समुपदेशकाशी बोलताना हळूहळू या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. अंघोळीला जाताना रोजच्या रोज आपले कपडे आपण घेऊन जाण्याचा सल्ला समुपदेशकाने दिला. हळूहळू त्याचा त्रास कमी झाला. अंजायनाचं कारण अंघोळ नसून, त्यामागची पार्श्वभूमी होती, हे कारण वरवर पाहिलं तर हास्यास्पद वाटू शकतं, परंतु ताणतणावाच्या चक्रात गुरफटल्यावर साध्यासाध्या गोष्टींचा अन्वयार्थ लावणं कसं अवघड होऊन बसतं याचं हे चपखल उदाहरण; ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ या म्हणीचा प्रत्यय देणारं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com